काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीने इतक्यात झालेल्या हिंदी सारेगमप मध्ये एका स्पर्धकाने गायलेल्या "हाय रामा"ची लिंक पाठवली होती.ती पाहात असताना मनातल्या मनात मूळ हाय रामा वाजायला लागलं आणि "रंगिला रे" आणि "तनहा, तनहा" प्रमाणेच हेही आशाताईंचं असं उगीच मनात आलं. म्हणजे हा आवाज थोडा वेगळा आहे असा काही विचारही करत नव्हते तोच तिथे स्क्रीनसमोर "स्वर्णलता" असं गायिकेचं नाव समोर आलं. आता अगदी प्रत्येक गाण्यातली कलाकार मंडळी ओळखण्यात मी पटाईत आहे अशातला भाग नाही. पण तरी हे नाव आपण कधीच नोंद केलं नाही हे मात्र लगेच जाणवलं.
रंगिला चित्रपट आला तेव्हा मी डिप्लोमा करत होते. प्रत्येक चित्रपट पाहायची ऐपतही नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे रंगिलाच्या प्रोमोजमध्ये उर्मिलाला ज्याप्रकारे दाखवण्यात यायचं ते निदान तेव्हाच्या काळात तरी बापरे वगैरे वाटूनही तो चित्रपट बाहेर जाऊन पाहाणं झालं नाही. अर्थात नंतर मग कधीतरी केबलवर यथावकाश पाहिला. शिवाय आमिर आवडत असल्याने मनातल्या मनात तो पाहायची इच्छाही होतीच. त्यावेळी आमच्या वर्गमित्रांचा एक ग्रुप होता त्यांनी मात्र आवर्जून हा चित्रपट फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो पाहून "हाय उर्मिला" वगैरेही केलं होतं. अर्थात याची गाणी मात्र भरपूर गाजली होती. रेडिओवर सकाळच्या साडेआठ ते साडेनऊच्या वेळात ती येत आणि चित्रहारमध्येही.त्यामुळे माझ्या बर्यापैकी लक्षात राहिली होती.
मला रंगिलाची सगळी गाणी अगदी अजूनही आवडतात. त्यातल्या त्यात हाय रामाबद्दल सांगायचं तर त्याआधीची "पायलिया झनकाई" ही बंदिश हरिहरनजींनी इतक्या नजाकतीने गायलीय की या गाण्यानंतर या बंदिशीमुळे माझ्या मनात त्यांच्यासाठी खास स्थान निर्माण झालं. नंतर सारेगमच्याच मंचावर ते जज म्हणून असताना बहुतेक एका स्पर्ध्याने हीच बंदिश त्यांच्यासमोर गायल्यावर त्यांनी त्याचं मनमुराद कौतुक केलं होतं आणि पुन्हा त्यांच्या आवाजात त्या मंचावर ती बंदिश ऐकताना भान हरपलं होतं.
वर म्हटल्याप्रमाणे या बंदिशीपाठोपाठ येणारा मदभरा आवाज मला आपसूक आशाताईंचाच वाटायचा. माहित नाही का कदाचीत तेव्हा इंटरनेट नव्हतं म्हणून असेल किंवा माझ्याकडे टेपरेकॉर्डर किंवा सिडी प्लेयर नसल्यामुळे कव्हरवर कलावंत वाचणं झालं नसावं, मी असं गृहितच धरलं होतं की या आशाताई आहेत म्हणून. तर त्यादिवशी हे गाणं पाहताना स्वर्णलताचं नाव पाहून सहज या कलावंताचा मागोवा घ्यावासा वाटला. शिवाय दिग्गज ए आर रहमान सारख्या संगीतकाराकडे गायला मिळायचं भाग्य असणारी ही व्यक्ती कोण आहे याचीही उत्सुकता होतीच.
हे असे शोध घेणं आता मायाजालामुळे फ़ारच सहज शक्य झालं आहे. त्यामुळे लागलीच स्वर्णलताचं विकीचं पान मी उघडलं. तिथे उजवीकडे died 12th September 2010 (age 37) हा उल्लेख पाहून मात्र मला एकदम कसंतरी झालं.अवघी १९८७-२०१० या काळातली अनेक भाषांतली जवळजवळ ७००० गाण्याची कारकिर्द. त्यात एक नॅशनल अवॉर्डदेखील प्राप्त. किती सुंदर आवाज, गायकी आणि ज्याने हे दिलं त्याने तिला इतक्या लहान वयात श्वासाच्या त्रास देऊन परत माघारी बोलवूनही घेतलं. म्हणजे ज्या श्वासावर कंट्रोल ठेऊन इतकी सुंदर गायली नेमका त्यातच दगा. किती दुर्दैवी योगायोग असं नकळत मनात आलं. त्यानंतर उरलं गाणं ऐकताना हा स्वर इतक्या लवकर हरवल्याचं सारखं वाईट वाटत राहिलं.
खरं सांगायचं तर मला रंगिला चित्रपटाची सगळीच गाणी आवडतात. ए.आर. ने त्याच्या स्टाइलने खूप छान काम केलंय आणि सर्वच गायकांनी या गाण्यांना योग्य न्याय दिला आहे. त्यात "हाय रामा" गाणंही आवडतं, ती आवडणारी बंदिश या पलिकडे त्याला काही आठवण नव्हती. असायचं काही कारणही नव्हतं. पण त्यादिवशी सहज म्हणून एका कलावंताची माहिती मिळवायला गेले आणि अर्ध्या मैफ़िलीतून गेलेली ही स्वर्णलता माहित झाली. खरं तर इतकं मदभरं गाणं पण इथून पुढे मला उगाच चुटपूट लावून जाणार. यापुढे कधीही कुठच्याही मैफ़िलीत हे गाणं ऐकलं तर आठवेल ती फ़क्त स्वर्णलता आणि तिचं हे अकाली जाणं.
स्वर्णलताचं विकीपेज इथे आहे.