रजा घ्यायची ही काही पहिलीच वेळ नाहीं. पण याआधी निदान थोडंफार तरी ब्लॉग प्लनिंग केलेलं आठवतंय. यावेळी मात्र कसला झपाटा आल्यागत मी वागत होते असं आता मागे वळून पाहताना माझं मलाच ़वाटतंय.
डिसेंबरमध्ये घर बदल आणि मायदेश दौरा यात जेमेतेम चार दिवसांचं अंतर होतं. त्याआधी आणि नंतरची धावपळ, वेगाने झपाटलेल्या मला थोडं थांबायला हवं होतं का? अर्थात काहीवेळा नियती तिचं वेग नियंत्रणही कार्यरत करत असावी बहुतेक.मुंबईतल्या चौथ्या दिवसाच्या अनुभवाने मी स्तब्ध झाले..कुठेतरी आपण थांबायला हवं असं रहेजाच्या आय.सी.यु.च्या बाहेर बसलेल्या मला वाटलं.
याआधी कधीही मी मायदेशात गेले की भेटीगाठींचा भरगच्च कार्यक्रम करत असते.मुंबईच्या आणि थोडं बाहेरच्या माझ्या सगळ्या आप्तेष्ट, मित्रमैत्रीणींना प्रत्यक्ष भेटण्यासाठी मी जमेल तितकं आउट ऑफ द वे टाइपही जुळवणुका त्यात असत. यावेळी त्यातल्या कित्येक भेटी मी फक्त फोनवरून केल्या. अगदी जीवाभावाची दोन दशकांपे़क्षा जास्त जुनी मैत्रीही फोनवरच. जे मी आरामात इथुनही करू शकते.
अर्थात याचा अर्थ इतकंही काही गंभीर करत होते असाही नाही. फक्त वर म्हटल्याप्रमाणे वेग कमी केला आणि थोड्याफार प्रमाणात प्रायरिटीज बदलल्या.
आता परत आल्यावरचे नेहमीचे सुन्न (की शांत?) दिवस. गेल्या महिन्यातले भले-बुरे अनुभव आठवताना त्यातले काही ब्लॉगवर मांडलेही जातील. कुठलं पहिलं लिहून मोकळं व्हायचं, सुखद की क्लेशदायक? की आहे ते तसंच पर्सनल स्पेस म्हणून कुठल्याशा कप्प्यात ठेऊन द्यायचं याचा विचार करत ही बर्याच दिवसानंतरची पोस्ट अवेळी लिहितेय.
अगदी आत्तापुरता सांगायचं तर सवय तुटलेले इथले थंडीचे दिवस आणि परत आल्यानंतरपासून रोज टिपूस गाळणारं आकाश. जणू काही पुन्हा सगळं पावसालाच सांगायचं..........