कॉलेजमध्ये असताना एका डायरीत आवडीची वाक्य लिहून ठेवायचे त्यातलं लक्षात राहिलेलं एक म्हणजे "दुःख माणसाला अंतर्मुख करतं. ते समोरच्याचं आपल्याशी असलेलं नातं अधीक दृढ करतं". कॉलेजच्याच आठवणीत रमायचं तर दादरला वजा करणं कठीण. मागेही लिहून झालंय. प्रत्येकवेळी दादरला कुठेही फ़िरायचं, वावरायचं तर एक अनामिक सावली नेहमी आपलं म्हणजे माझ्यासारख्या मराठी माणसाचं संरक्षण करते असं नेहमी वाटायचं.
गेले काही वर्षे देशाबाहेर असले तरीही दादरची आठवण आली की ती सावली पुन्हा आधार द्यायची. प्रत्येक ट्रिपमध्ये जाणीवपुर्वक शिवाजी पार्कला मारलेली फ़ेरी त्या कधी न भेटलेल्या सावलीचा आधार नेहमीच दाखवायची. ऑनलाइन दादरबद्दल कुठेही काहीही वाचलं की जसं दादरचे रस्ते, गल्ल्या आठवतात तसंच आपसूक आठवतं ते दादरला असलेलं त्या सावलीचं संरक्षण. खरं तर राजकारणात पडायचा शूरपणा न दाखवू शकणार्या माझ्या पिढीच्या कुठच्याही मराठी तरूण वा तरूणीला हक्कही नाही आहे त्या सावलीकडे बोट करून दाखवायचा कारण ते नसते तर आम्हाला डोकं वर काढायला निदान मुंबईत तरी संधीच मिळाली नसती.
त्यावेळी तर माझं कॉलेजही पन्नास टक्के एका विशिष्ट राज्यातल्या लोकांसाठी आरक्षीत; कारण संस्था त्या लोकांची. त्यामुळे काय तुम्ही घाटी असं कुणीही येता जाता आम्हाला सुनावू शकलं असतं पण दादरचा दरारा त्यांचे शब्द गिळून टाकत होता. आम्ही आपल्या परीने ताठ मानेने आमच्याच राज्यात राहत होतो.
आणि हे सगळं असंच असणार..पुन्हा आपण जाऊ तेव्हाही ती सावली आपल्यासाठी तशीच असणार हे जणू काही गृहीत धरलं असतानाच दिवाळीला शंकेची पाल मनात चुकचुकली. त्यादिवशी खरं तर आदल्या दिवशीचा पाऊस पाहताना पुन्हा एकदा अंधारून येताना वाटलं की संपतंय सगळं आणि अचानक सूर्य पुन्हा थोडा वेळ दिसला. पुन्हा बातम्या तपासल्या आणि असं काही नाहीये आणि होईल अजुनही, आधुनिक वैद्यकशास्त्र वगैरे वगैरे आठवलं. आणखी एक दिवस सूर्यही पुन्हा तसाच आला आणि मग ते गृहीत धरणं बरोबर होतं असंच मनातल्या मनात म्हटलं. पण आमच्या शुक्रवारी रात्री उशीराने झोपलो तरी शनिवारी अवेळीच जाग आली..बाहेर खूप अंधारुन आलं होतं. धाय मोकलून आकाश रडत होतं...वर्तमानपत्र न वाचताच ताईला फ़ोन केला आणि तिने म्हटलं "हो अगं ते गेले".
कधी नव्हे ते बातम्यांच्या चॅनेलचं ऑनलाइन स्ट्रिमिंग पाहायचा प्रयत्न केला आणि माहित नाही का डोकंच बधीर झालं. इतका मोठा आधार गेल्याची भावना सगळ्यांमध्ये असेल असं वाटावं तिथे ओरडून ओरडून काहीतरी बडबड सुरू होती. मला त्या भुंकण्यातलं एक अक्षरही कळण्यासारखं नव्हतं पण कळत इतकंच होतं, की बरेच दिवसांनी लांडग्यांना भक्ष्य मिळालं आहे आणि तिथेच काही तरसं ओरडताहेत. लांडगे आणि तरसं यांना काय कळणार की शांतपणेही खाता येतं. प्रसंग कुठला आणि तुम्ही कधी भुंकायचं याला काही अर्थच नव्हता.
कधी कधी वाटतं की ते दूरदर्शनचे दिवस खरंच बरे होते. एकदा दुखवटा आला की खरंच दुःख निदान अंतर्मुख होऊन त्या माणसाचं आपल्याशी असणारं नातं स्पष्ट तरी करता येतं. आणि त्या निमित्ताने होणार्या शांततेने खरंच त्या आत्म्याला शांतीपण लाभत असेल. हजारो चॅनेल्स आपल्याला पाहायला मिळताहेत ही नक्की आपली प्रगती की वैचारीक अधोगती?
माझं मौन मी माझ्यापाशीच ठेऊन ते स्ट्रिमिंग बंद करून टाकलं. त्यानंतर उरले ते नुसते विचार. दुसर्या दिवशी रेकॉर्डेड अंतयात्रा पाहताना माझ्या लाडक्या दादरला इतक्या शोकाकूल अवस्थेत मी कधीच पाहिलं नव्हतं.. ही सोय नसती तर हे अंत्यदर्शन खरंच मला झालं नसतं. आणि ज्या प्रकारे ते आपली मराठीवर अपलोड केलंय त्याने त्यात कुठलाही व्यत्यय येत नव्हता. बहुतेक म्हणून असेल आता निदान दुःखाने अंतर्मुख व्हायची सोय तरी झाली होती.
आधीचा आदला दिवस जे काही जाणवलं नव्हतं ते पद्मजाताईंनी "बहुत जनांचा आधारू" म्हटल्यावर इतकं जाणवलं की डोळ्यातून पाण्याच्या धारा सतत वाहू लागल्या. मी आणि माझा नवरा, दोघं, त्या पूर्ण वेळेत एकदाही एकमेकांशी नजर देऊन बोललो नाही. माझ्याइतकंच तोही रडतोय हे मला त्याचे डोळे न पाहता दिसत होतं. काय असेल हे नातं अशा एका मोठ्या व्यक्तिमत्वाशी की जे त्यांच्या जाण्यानंतर आम्हाला दादरपासून इतक्या लांब असतानाही जाणवतंय?
आज पुन्हा एकदा इथे अंधारून आलंय आणि तुफ़ान पाऊस पडतोय.मला नक्की कशाचं वाईट वाटतंय मलाच कळत नाहीये. खरंच दुःख माणसाला अंतर्मुख करतं. ते समोरच्याचं आपल्याशी असलेलं नातं अधीक दृढ करतं.... आणि इथे सांगायचं तर ते नातं लक्षात येईस्तोवर इतका उशीर झालाय की आता काहीच करता येणं शक्य नाही असं उगीच वाटतं.
ईश्वर त्यांच्या मृतात्म्याला शांती देवो आणि त्यांच्या नजीकच्या व्यक्तींना यातून सावरायचं बळ याउपर माझ्यासारखी एक मराठी व्यक्ती काय मागणं मागणार त्या कर्त्याकरवित्याकडे?
अपर्णा,
१९ नोव्हें.२०१२.