साधारण एप्रिल-मे हे महिने मायदेशातल्या माझ्या भाचरांचा सुट्टीचा काळ म्हणून थोडं सुट्टीसारखं माझ्याही अंगात येतं...यावर्षीही थोडं-फ़ार तसंच....अगदी आत कुठेतरी काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटतं तरी ते कुणाला दाखवायचं नाही म्हणून ब्लॉगवरच्या पोस्टमध्येही भरलेल्या पेल्यासारखं सगळं चांगल्या आठवणींना साठवतेय...पण तरी काहीतरी राहिलंय....
मी शाळेत असेपर्यंत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वगैरे परीक्षा आटपली की निकालाची फ़ार वाट पाहायचे...म्हणजे मला कधी निकालाची "तशा" अर्थाने वाट पाहायला लागली नाही किंवा शाळेत चांगल्या मार्कांनीच पास व्हायचे म्हणून भाव मारायलाही निकालाच्या दिवसाची प्रतिक्षा नसायची. तर एकदा निकाल लागला की माझ्या शिक्षक आई-वडीलांना सुट्ट्या लागायच्या आणि मग आम्ही सगळी मावसभावंडं आजोळी जमायचो आणि ते परत यायचो शाळा सुरू व्हायच्या एक-दोन दिवस आधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात...
जशी काही कुटुंबात डेंटिस्ट, गायक, वकिल अशी लोकांची घराणी दिसतात, तसंच काहीसं शिक्षकी पेशा हा माझे आई आणि बाबा दोघांच्या घराण्यात आम्ही भावंडांनी ती प्रथा मोडेपर्यंत होता. माझ्या दोन मावशा, एक काका,माझ्यापेक्षा वयाने जास्त मोठे असणारे तीन आत्येभाऊ, दोन चुलतभाऊ, सहा मामेबहिणी, दोन माम्या शिवाय मामेमावशा आणि मामेमामापण शिक्षक...(हुश..होपफ़ुली मी सगळ्या शिक्षकांना कव्हर केलंय..आणि नसेल तर वर घराणं हा उल्लेख आहेच). तसंच आईच्या आईचं, म्हणजे आज्जीचं माहेर आणि सासर एकाच गावात म्हणजे माझ्या आजोळी. त्यामुळे मे महिन्यात तमाम शहरात राहणार्या समस्त मावशा आणि त्यांची मुलं या एकाच गावात मुक्कामाला असत..गाव तरी किती मोठं? हजारेक वस्तीचं पण नसेल..तर आम्ही सर्व तब्बल एक महिना एकत्र हुंदडणे, नदीवर डुंबायला जाणे आणि सुट्टीतले इतर तुंबड्या लावायचे उद्योग करत असू. मे महिना आणि दिवाळी या दोन्ही सुट्ट्यांना माझ्या आठवणीत अमर करायचं श्रेय "मासवण" या पालघर तालुक्यातील माझ्या आजोळाला जातं.
तर हा "तुंबड्या लावणे" शब्द खरा करायचे बरेच उद्योग आमच्यातल्या मुलांनी केले आहेत आणि आम्ही मुलींनी अर्थातच त्यांना बाहेरून पाठिंबा आणि मग ओरडा झाल्यावर पळ काढणे हे रीतरसपणे केलंय..एकदा मागच्या वाड्याच्या मागे एक शेत होतं तिथे आदिमानवाच्या काळातलं दगडावर दगड आपटून आग कशी लावावी, याच्या प्रात्यक्षिकात सगळा पेंढाच जळायला निघाला होता आणि आधीच पाणीटंचाई असलेल्या त्या गावात सकाळी हजारो खेपा करून नेहमी पाणी भरून जाणार्या काकींचे सगळे कष्ट एका क्षणात ते पाणी तिथे ओतण्यात गेले होते. त्यानंतर मध्येमध्ये आम्हीपण छोट्या कळशा घेऊन विहिरीवरून कधीकधी पाणी आणायला सुरूवात केली होती.
"लेपाळे" या एका झाडाच्या छोटी पपईसारख्या दिसणार्या फ़ळांची बी बदामासारखी लागते म्हणून खा खा खाऊन मला कायमचं वर जायची वेळ आली होती. शिवाय नुस्तं ओकार्या आणि परसाकडे लागून काय खाल्लं याची दाद आई-बाबांना न लागू द्यायचा उद्योग मी आणि एका मामेबहिणीने केल्यामुळे रात्रीच्या वेळी आजीकडच्या गड्याबरोबर मला पाठुंगळीला नदीपल्याड असणार्या सरकारी दवाखान्यात न्यायला लागलं होतं...तिथली नर्स त्यानंतर जितकी वर्षे तिथे होती कधीही मला किंवा आई-बाबांना पाहिलं की त्या घटनेची आठवण करून द्यायची ("लब्बाड कुठली", असं मी तेव्हा मनात म्हणायचे)
या आणि इतर काही कटू आठवणी सोडल्या तर गावात राहायची धमाल आणि भावंडाबरोबर एकत्र राहिल्यामुळे जुळलेले नातेसंबंध हे जे आजच्या पिढीतल्या प्रत्येकालाच मिळत नाही ते मला सहजी लाभलं होतं. आमच्या वयानुसार मामे आणि मावस भावंडाच्या ज्या जोड्या तेव्हा ठरल्या होत्या त्या अजूनही कायम आहेत. म्हणजे देश बदलला तसं प्रत्यक्ष संबंध कमी झाले पण माझी जोडी असणारी मावसबहिण आणि मी भेटलो, फ़ोन केला की अजूनही तशाच बडबड करत राहतो..अगदी पुर्वीसारखं घसा बसेपर्यंत...हे एक घसा बसायचं आणि काटा लागायचं (तेही जोडीने) आमच्यावेळी खास होतं....मामी सेफ़्टीपिनने काटा काढून द्यायची आणि मग मावशी त्यावर गरम केलेलं एक निवडुंगासारखं झाडाचं खोड की पान असे ते लावता लावता दोघींना एकदमच लेक्चर द्यायची. तसंही हे सगळे शिक्षक असल्याने लेक्चर द्यायची त्यांना आणि आम्हाला ते ऐकायची सवयच होती...:)
माझ्या एका मावशीचं सासर आजोळहून थोडं जवळ होतं, पालघरमध्येच मनोरजवळ. ती मावशी असेपर्यंत त्यांच्या घरी जाणं हा एक आमच्या सुट्टीतला खास कार्यक्रम असे. म्हणजे आदल्या दिवसापासून "उद्या बांधणला जायचं" असं बाबा बोलले की एकदम कल्ला व्हायचा. तिची आंबा आणि चिकुची वाडी होती आणि थोडी शेती. मे महिन्यात तिच्या घरी गावठी हापूस आणि चिकू वर माळ्यावर पिकत असायचे. त्या दिवसांत ते आणि घरची मोठी जांभळे, मनोरच्या बाजारात ती विकायला पाठवत आणि अर्थात आम्हाला खायलाही मिळत.माझ्या लहानपणीची खरीखरी भातुकली खेळायला देणारी म्हणून ही मावशी सगळ्या मुलांमध्ये खूप लाडकी होती. या मावशीच्या आंबा आणि चिकुच्या वाडीत तीन दगडांची चुल करून माझ्या मोठ्या बहिणी मावशीने दिलेल्या पीठाची छोटी छोटी घावणं करत. विहिरीजवळ एक मोठं जांभळाचं झाड होतं. विकण्यासाठी रीतसर जाळ्यामध्ये गडी लोकं जांभळं उतरवण्याच्या आधी दगड मारून किंवा पडलेली जांभळं आम्ही लहान बहिणी गोळा करून आणायचो..मुलं पण काहीबाही मदत करत नाहीतर खुशाल विहिरीत पोहायला जात..
माझी जवळजवळ सगळी मावसभावंडं या मावशीच्या वाडीतल्या विहिरीत वरून उड्या मारून आणि कंबरेला सुकडी बांधून पोहायला शिकली. आम्हा मावस आणि मामे बहिणींच्या जोड्या मात्र आजोळी, सूर्या नदीत...बाबा किंवा काकांच्या देखरेखीखाली हात पाय मारायला...सगळ्याच नीट नाही शिकलो. कदाचीत मुली असल्यामुळे नंतर बंधनं येतात..लहानपणीच नदीत शिकून घेतलं तर बरं...नंतर मग नदीवर जायचं ते बहुदा पाय सोडायला किंवा मावशांनी जोर केला की मग सगळी एकत्र डुंबायला. अर्थात गावातली वस्ती इतकी कमी आणि सगळीच नात्यातली असल्याने भिती नव्हती म्हणा पण घरातली मोठी मंडळी आम्हाला कुणी त्रास देणार नाहीत याची खात्री बाळगत असावेत असं वाटतं....
मग नदीवरून परत येताना वाटेत लागलेल्या करवंदांच्या जाळीत जाऊन करवंद खायची...येताना चुलीसाठी वाटेत पडलेल्या काटक्या गोळा करून त्याचं आपल्या वाट्याचं सरपण आणायचं की आजी आणि मामी पण खूश..मग मामीच्या हातच्या तांदळाच्या हातभाकरी चहाबरोबर खाऊन उरलेला दिवस उंडारायला परत मोकळे...मला माझ्या मामीला जात्यावर दळताना आजही आठवतं. त्या गावात मामाच्या घरासमोरच चक्की येईपर्यंत माझ्या मामीने आम्हा सर्व भाचे आणि कुटुंबीयांसाठी लागणारं दळण मावशांसोबत बसून दळलंय हा विचार करताना आता खरं तर मला कससंच होतंय...
तर असं घरगूती आणि कायम पेटती असणार्या चुलीत शिजलेलं जेवण खाऊन आम्ही पत्ते, नवा व्यापार, नाव-गाव-फ़ळ-फ़ुल आणि असंख्य खेळ खेळलोय. "डब्बा ऐसपैस" हा एक सगळ्यात आवडता गेम..हो गेम कारण कुणाचा गेम करायचा असेल त्याच्यावर राज्य आलं की मग ते घालवायचंच नाही असं खेळलं की मग कुणीतरी एक जाम रडलं की घरातलं मोठं माणूस, बहुदा ती मामीच असे, येऊन ओरडून आमचा डब्बाच गुल करून टाकत....:)
रविवार आला की खास गावठी कोंबडीचं जेवण आणि त्याबरोबर भाकरी असा बेत असे. मावशीकडे गेलं की हक्काचा आमरस आणि पुरी. इतर दिवशी मामी आणि मावशा जे काही ठरवून करतील ते..पूर्ण सुट्टीत जमेल तेव्हा या सर्वजणी ठरवून एक दिवस पापड करत. त्यावेळी सगळ्या चिल्लरपार्टीकडे ते पापड वाळत घालणे, त्याची राखण करणे आणि संध्याकाळी ते परत आणून मग घरी न्यायच्या ड्ब्ब्यामध्ये सुकलेल्या पळसाच्या पानात घालून ते ठेवणे यात एक दोन दिवस जात. पापडाच्या लाट्यानी छोटे पापड करायला मला तेव्हा आवडत आणि मग करता करता हळूच कुणाचं लक्ष नसलं की एक लाटी पोटात...सगळीच गम्मत...चिकवड्या इ.ही केल्या जात. पण पापडात जितकी मी आणि माझ्या मावसबहिणीची जोडी रस घेई इतर गोष्टींमध्ये नाही. फ़क्त मावशीकडे लोणच्यासाठी वाळवलेल्या कैर्यांवर आमचा जाम डोळा असे. एकेवर्षी सर्व मावसभावंडांनी मिळून मावशीला ताटातली एकही कैरी मिळू दिली नव्हती आणि त्यानंतर त्या सगळ्यांनी मिळून आम्हाला जे लेक्चर दिलं त्याने आम्हाला जरब बसल्यासारखं निदान दाखवावं तरी लागलं..उगाच नंतर त्यांनी तो राग आमरस किंवा आमच्या नदी किंवा बंधार्यावर जाण्यावर काढला तर.....मामाच्या वाड्यातल्या चिंचेचे कोवळे कोंब काढून त्याची तिथलाच एखादा दगड पाण्याने धुवून साफ़ सफ़ाई करून केलेल्या चटणीत माझे दोन मावसभाऊ पण आम्हाला साथ देत.
मी सातवीत गेले त्या सुट्टीत माझी मावशी त्या वर्षीच्या निकालाच्याच दिवशी गेली. तिच्या त्यावेळी दहावीत गेलेल्या माझ्या मावसभावाने फ़ोडलेला हंबरडा मला मी त्यावेळी इतकी लहान असतानाही आजही आठवतो..त्यानंतर तिच्या तेराव्याला तिच्या सासरच्या गावी गेलो ते आजतागायत मी पुन्हा तिथे गेलेच नाही...न कळता एक गाव असंच संपलं.... :(
त्यानंतरही आजोळी आम्ही जातच राहिलो. प्रत्येक सुट्टीत आपल्या बहिणीची आठवण काढून हळव्या झालेल्या माझी आई, मावशी आणि मामा/काकांना पाहायचो. नंतर दुःखाचे कढ सर्वांसमोर काढायचं कमी झालं. आम्ही भावंडं आमच्या बालसुलभ वयाने एकत्र यायची मजा घेत राहिलो...आज्जी गेल्यावरही मामा-मामींनी तिची कमी कधी जाणवू दिली नाही..मी आणि माझी मावसबहिण एकत्र जायचाही प्रयत्न अगदी नोकरी लागेस्तोवर करायचो....
मे महिन्यांत तिथे पाणी कमी असायचं पण सगळ्या नातेवाईकांचा प्रेमाचा पूर दाटलेला असायचा...आणि गरमीचं काय तेव्हाही गरमच असणार पण गावचा वारा खात हुंदडणारे आम्ही कधी गरमीच्या कुठल्या आजाराने आजारी पडलो नाही..."गावची हवा चांगली असते", असं आई नेहमीच म्हणते. तसंही असेल कदाचित.....
खरं तर मे आणि एकंदरीतच सुट्टीतल्या आठवणींवर लिहावं असं मला ब्लॉग लिहायला घेतला तेव्हापासून वाटत होतं...आणि ठरवून असं नाही पण बरोबर त्या वेळेवर गेले काही वर्षे ते कधीच झालं नाही...आणि आता हा "मे" मी या आठवणींशिवाय राहूच शकत नाहीये...:(
बघता बघता हाही मे संपेल आणि तो संपता संपता मी शाळेत असतानाच्या घालवलेल्या अनेक सुट्टींच्या आठवणींनी मला विषण्ण करून जाईल....म्हणजे नेहमी चांगल्या आठवणी आल्या की कसं प्रसन्न वाटतं पण यावर्षी नाही वाटणार...कारण मावशी गेल्यानंतर या आठवणी ज्या घराशी, कुटूंबाशी निगडीत आहेत तो माझा मामाच नाही.....मला वाटतं गेले दोन महिन्याचा हाच एक सल असावा....:(