आजचं वर्तमानपत्र हे उद्याची रद्दी असते असं म्हटलं तर.....तर कशाला ते तसंच आहे म्हणा...तर अशाच एका रद्दीत एक पान मिळालं....टराटरा फ़ाडायचे पण कष्ट घेणार नव्हते तरी एक वाक्य टोचलंच...."अनेक ब्लॉगलेखक वा लेखिका ‘मनातलं’ लिहूनलिहून जनातलं काही बोलतच नाहीत- स्वत:बद्दलच बोलणं सुरू असतं त्यांचं. त्यामुळे प्रतिसादही ओळखीपाळखीतून येतात. स्वत:च्या किंवा स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करण्याचा हेतूच अनेक ब्लॉगांमधून दिसत राहातो." आणि त्याच्या आधीचं जरा जास्त...."अनेकजणींचे ब्लॉग आज ‘दुपारच्या मासिकां’ची उणीव भरून काढतात"...बरं हे तारे तोडणारे महाशय/महाशया कोण हे कळण्याचं काही कारण नव्हतंच...रद्दीला जसा भाव नसतो तसंच रद्दीच्या कागदांना मालकही नसतो म्हणे...डायपरला प्रसिद्धी मिळायच्या आधी असं म्हणतात की रद्दीला जास्त भाव होता..कारण लहान मुलांच्या घरातली लोकं ती विकत नसत...मग दुकानदार रद्दीची वाट बघत बसायचे....म्हणून रद्दीचा भाव पुर्वी फ़ार जास्त होता म्हणे.....
असो काही संबंध लागतोय?? नाही न....या आणि अशाच प्रकारचे संबंध नसलेले लेख वाचायचे असतील तर वाचायलाच हवा फ़ेकसत्ता....हो मला जाम आवडलंय हे नाव...जरी बाकीच्या सदरांसाठी आवडत असलं तरीही जाणून-बुजून ब्लॉगर्सना उकसवायचा नवा उद्योग (खरं तर धंदा म्हणायचा मोह आवरतेय) सुरू केल्यामुळे फ़ेकसत्ता हेच नाव बरं वाटतंय....खरं तर मला जे काही सांगायचं होतं ते बर्यापैकी माझ्या मित्र ब्लॉगरने इथे सांगितलंय....(बरं केलंस बाबा नाहीतर आता रद्दीच्या लिंका कुठे शोधु बाबा....तू तुझ्या लेखात सगळं लिंकुन ठेवलंस ना...हाबार्स...)
मग मला काय लिहायचंय...काहीच नाही...याच निमित्ताने मला फ़क्त जाहिरात करायची संधी मिळतेय माझ्याच ब्लॉगची आणि तिचा वापर मी पुरेपुर करणार आहे...तेही स्वतःच्याच ब्लॉगवर....तसंही ब्लॉगहीट्स मिळायला आम्हा सर्व ब्लॉगर्सकडे मराठीब्लॉग्ज डॉट नेट आहेच की....त्यासाठी तरी रद्दीत जाणार्या वर्तमानपत्रांकडे जायची वेळ आली नाहीये....
तसं या ब्लॉगचं कौतुक/उल्लेख इ. वर्तमानपत्रात झालेत आणि त्याची योग्य दखल ब्लॉगर म्हणून उजव्या बाजुला आहेच....पण इथे कुणी भेदभाव करत नसताना वरचा तो स्त्री ब्लॉगर म्हणून झालेला शेळका उल्लेख सगळ्याच स्त्रीयांसाठी मला तरी खटकतोय आणि "ओळखीपाळखींचं" आणखी एक गलिच्छ वाक्य नाही म्हटलं तरी वाकुल्या दाखवतंय...
शिवाय असे रद्दी लेख लिहिणार्यांना ब्लॉग कसे वाचावे हेही शिकवायची संधी मिळतेय...एक स्त्री म्हणून मलातरी असं वाटतं की सुधारणेला सगळीकडे वाव असतो...अगदी नाठाळ मुलही आई बरोबर वठणीवर आणू शकते...अरे देवाने आम्हाला तसंच बनवलंय...म्हणून इतके दिवस पाहत बसले होते की या सदरात नक्की काय चालणार आहे....आता त्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरूवात केलेच आहेत तर होऊन जाऊ दे...
ह्म्म्म तर काय म्हणायचं होतं मला...हं...मनातलं....ब्लॉगर मग तो स्त्री असो की पुरूष का ब्लॉग लिहितो हे कळायचं असेल तर त्याची पहिली पोस्ट वाचा...कदाचीत तुम्हाला कळेल की त्याला/तिला हा ब्लॉग का सुरू करायचा आहे...
माझ्याबाबतीत म्हणाल तर मी इथे स्पष्ट म्हटले आहे की मला गप्पा मारायच्या आहेत...काय हरकत आहे?? फ़क्त पेज थ्री लोकांच्याच आयुष्याबद्दल गप्पा मारता येतात किंवा आदर्श राजकारण्यांबद्दल?? आमच्या साध्या-सोप्या-सरळ आयुष्यात काही होणारच नसतं का जे आम्ही मांडू शकतो??? स्वकीयांचं जीवनच तर आम्ही अनुभवतो नं मग लिहिलं त्यातल्या आपल्या आवडीवर ...केलं कौतुक भातुकलीच्या संसाराचं...किंवा मला आजोबा नाहीत म्हणून परदेशात भेटलेल्या एका आजोबांवर
लिहिले चार शब्द ....बरं हे जाऊदे माहीत आहे मला मी काहीच करू शकणार नाहीये मी त्या शेतकर्यांसाठी पण जर त्यांचं दुःख माझ्या मनाला भिडलं आणि लिहिले मी चार मोडकेतोडके शब्द...हो आवडतात मला मी साजरे करायची ते सण आणि त्याबद्दलचे माझे अनुभव लिहिले मी .........लहानपणापासून गाणी ऐकतेय...आहेत त्याच्या आठवणी आणि मांडते त्या मी इथे ....हवी होती मलाही एक गोड बाहुली ती नाही मिळाली म्हणून दिला मी संदेश.....कुठे बिघडलं???
जास्त मी मी वाटतंय ???हो असू शकेल...पण त्यात फ़क्त कुणालातरी मला हे असं वाटतंय..तुमच्याकडेही काही शेअर करण्यासारखं आहे का बास इतकाच हेतू आहे...कुठेही अहंकार नाहीये....
बरं मी मी चं राहुदे...स्वकीयांच्या जीवनाशैलीची अपरिहार्यता जर एखाद्या सव्वीस जानेवारीला आठवली तर ते रद्दीत जाणार नाहीये...प्रत्येक सव्वीस जानेवारीला निदान एक तरी जण हे वाचुन जातो.....(हो दुपारच्या वेळीच)
देशाबाहेर असलो तरी देशात मराठीसाठी एखादा कौशल त्यासाठी काही करत असेल तर वाटते आत्मीयता आम्हालाही मग त्याने त्याच्यावर आपलं कौतुक केलं तर तेही ओळखीतुनच का??
तुझं नाही माझं नाही..लांब तिकडे इराणमध्ये कुणी स्त्री बंदी म्हणून डांबली जाते त्या अनुभवांच एक पुस्तक निघतं...कुणी दुपारी वाचू नये की काय??
एका दुपारी माझ्यादारावर टकटक करून माझ्या डोळ्यात अंजन घालणारी माझी शेजारीण माझ्या ब्लॉगवर येऊन जर आणखी चार माणसांच्या डोळ्यातही तेच अंजन घालू शकली तर त्यांच्या दुपारी काय कोमेजणार आहेत??? एका हळव्या क्षणी त्याच्या बॅकपॅकबद्द्ल वाटतं लिहावंस...काय करणार?? आवडतात मराठीतले काही कार्यक्रम..म्हणतो आम्हीही मस्त..मस्त..मस्त ..निदान असंबद्ध परीक्षण करून त्यांचं डोकं तरी फ़िरवत नसू आम्ही.......
खरं सांगु का या रेटने तर माझ्या ब्लॉगमधल्या कितीतरी पोस्टांचं महत्व मी या पोस्टमध्ये पटवून आणखी जाहिरात करू शकते..पण मुद्दा तो नाहीये.....आणि मुख्य हे मी दुपारी लिहित नाहीये...मला या जगातल्या दुसर्या कुठल्याही स्त्रीसारखं घरची, हापिसची, पोराबाळांची, मी या व्यतिरिक्त स्वतःसाठी करत असलेल्या अनेक गोष्टींची कामं पण आहेत..आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या १४२ फ़ॉलोअर्सना आणि सगळ्याच वाचकांना याची गरज नाहीये.....काय आहे आमचं गणित कच्चं असेल पण भाषा पक्की आहे..ती आणखी पक्की व्हावी म्हणून आमच्या भाषेत आम्ही लिहितो....हे लिखाण आणखी काही वर्षांनी बाकी कुणाला नाही तर निदान स्वतःला जबरदस्त आवडणार आहे याची निदान आज माझ्या ब्लॉगची जाहिरात करताना मी तरी सांगणार आहे....
कारण ही रद्दी नाहीये..यातल्या प्रत्येक पोस्टला काही न काही संदर्भ आहे...आणि इथे आलेल्या प्रत्येक कमेंटला अर्थ आहे....त्या त्या व्यक्तीची भावना आहे..आणि सगळ्यात मुख्य हे सारं माझं आहे..माझिया मनाचं आहे....मला कोणासाठी लिहावं लागत नाही...कुणी ते दुपारी वाचतंय का संध्याकाळी याची चिंता करावी लागत नाही...माझ्या स्वकीय/परकीय जे काय असेल त्या लोकांसाठी मी कदाचीत फ़ार काही करू शकत नसेन..पण जर त्याबद्द्ल मी काही लिहून थोडा-फ़ार अवेअरनेस निर्माण करू शकले तर त्याचं समाधान मला नक्कीच असेल...सगळ्यात मुख्य ते समाधान मिळवताना मला दुसर्या कुणाचेही पाय खेचून खेकडेगिरी करावी लागत नाही....
खरं तर एकमेकांचं कौतुक करूनच तर आम्ही ब्लॉगर लिहायला शिकलो नाहीतर इतकी वर्षे वर्तमानपत्रे वाचून ती नित्यनियमाने रद्दीत जातच होती की!!! त्याने ना कुणाच्या दुपारी स्पेशल झाल्या ना कुठल्या आदर्श गोष्टी व्हायच्या थांबल्या.....आणि सगळ्यात महत्वाचं न कुणाला मराठी ब्लॉगिंग करावंसं वाटलं...त्यामुळे रद्दीतले कागद वाचण्यापेक्षा माझंच लिखाण वाचते आणि म्हणते जय हो ब्लॉगिंग....