असं म्हणतात, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये...यामागे काही वेगळा अर्थ असावा का असं कधी कधी उगाच वाटतं आणि मग एखादी प्रचंड हादरा देणारी घटना घडून जाते...कधी आपण त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असतो कधी दुरून..पण तगमग तीच...दूर असलं की जास्त विचार,जास्त काळजी आणि शरम पण...त्यानंतर आणखी एकदा पुन्हा तशीच घटना घडते आणि मग आपण मागे मागे जातो ...प्रत्येक वेळचे संदर्भ शोधायचा प्रयत्न करतो...घडलेल्या घटनेचे घाव ताजे असतील तर ही मागे जायची तगमग आणखी वाढते...
सुरुवात होते ती आत्ता ताज्या असलेल्या घटनेचे दुरून पाहिलेले रूप..बापरे इतकं सारं घडून गेलं आणि मी काय करत होते...
तो अख्खा दिवस कामात लक्ष लागत नाही, आपले माहितीतले सगळे ठीक आहेत न आणि अशाच चौकश्या...आणि नाहीत ओळखीचे पण म्हणून काय झालं त्यांचंही एक कुटुंब आहे, आयुष्य आहे, इच्छा सगळं सगळं आहे.......चौकटी मोडताहेत...त्याचं दु:ख दाटून येतंय....आठवडा होतोय.......आणि सगळं जवळ जवळ तसच...विस्कळीत....पुन्हा कधीही काहीही होणार हे माहित असलं तरी न थांबलेलं...न बदलेलं....
लताचा दर्दभरा स्वर उगाच या वातावरण दाटून राहिला आहे असं वाटत राहतं...
दर्द से मेरा दामन भर दे या अल्ला...
फिर चाहे दिवाना कर दे या अल्ला..
मग पुन्हा आधीची वेळ, लख्ख आठवणीतली........मागच्या वेळी तर अगदी समोरच सगळं घडलं....आपण काय करू शकलो??? काहीच नाही....त्याआधी... पुन्हा दूर...जवळचा मित्र ती गाडी चुकल्यामुळे वाचला....आपण काय करू शकणार आहोत??? काहीच नाही...हे विचार आहेत की छळ सुरु आहे मनाचा स्वत:शी....लताचा सूर एक आर्त मागणी करतो आणि हा छळ वाढतो...
मैने तुझसे चांद सितारे कब मांगे
रोशन दिल बेदार नजर दे या अल्ला...
त्याआधीची वेळ पहिलीच होती अशी स्वत: तिथे नसण्याची....लताच्या सुराची बेचैनी जास्त वाढते.....
सूरजसी एक चीज तो हम सब देख चुके
सचमुच की अब कोई सहर दे या अल्ला...
त्याआधी जायचं तर एक मोठीच मालिका.....एक दोन ठिकाणी स्वत:ही असू शकलो असतो.....नव्हतो म्हणूनचा निश्वास नाही पण हे असं मागे मागे जाणं आता झेपत नाहीये....धाप लागतेय.....गुदमरायला होतंय.....शेवटी कुणाचाही असला तरी जीवच तो ....तो जायची वेळ अशा प्रकारे का यावी त्यांच्यावर....
नदीचं मूळ, ऋषीचं कुळ नकोच शोधायला....हे सगळं का सुरु झालं???नकोय काही कारणं....थांबवा हे सगळं...आसमंत भारून ठेवलेला लताचा स्वर आता ठाम वाटतोय...
या धरती के जख्मो पर मरहम रख दे
या मेरा दिल पथ्थर कर दे या अल्ला.................................................