इतक्यात आमच्याकडे एक (किंवा एकदाचा) "बोस" आला(की आली???)...गेली बरीच वर्षे आपण बोस घेऊया बोस घेऊया म्हणून (अर्थातच) नवरा मागं लागला होता...त्यासाठी बोसच्या आउटलेटमध्ये त्याचा डेमो पहा, मग मला पटवण्यासाठी ’अगं, तू बोसला नाही म्हणतेस म्हणजे एका भारतीय कंपनीला नाही म्हणते...हे बोस म्हणजे आपले सुभाषचंद्र कसे बोस? तसेच कोलकोतावाले..बघ विचार कर’ ही आर्जवंही झाली होती...त्यांच्या लकी ड्रॉमध्ये कार्ड टाक असले उद्योगही करुन थकलो. याचा हट्ट काही संपेना आणि मग माझं "जाऊदे रे खूप महाग आहे..शिवाय त्यांचा डेमो फ़क्त त्यांच्या त्या विशिष्ट डिव्हीडिसाठीच छान वाटतो" असली आणि नवनवीन कारणं देऊन त्याला मागं सारणं आणि त्याचं पुन्हा पुन्हा हट्ट करत राहणं हे सुरुच होतं...
मग आम्ही घर घेतलं तेव्हा नेमकं लिव्हिंग रुमला टिव्ही ठेवण्याच्या जागेच्या अनुषंगाने आतून सराउंड साउंड सिस्टिमसाठी वायरिंग वगैरे सगळं तयार होतं फ़क्त तशा सिस्टिमची (किंवा याच्या भाषेत "बोस"ची) कमी होती...फ़क्त यावेळी ’स्वतःचं घर’ या मुदलातच खूप पैसे खर्च झाल्याने मग पर्यायच नाही म्हणून त्यातल्या त्यात स्वस्त सोनीची एक सिस्टीम आमच्या घरी आली..मग कधीही सराउंड साउंडवाले चित्रपट पाहताना गाडी डावीकडून उजवीकडे जाण्याचा आवाज यासारखे साउंड इफ़ेक्ट (माझ्यामते) व्यवस्थित ऐकू येत असले तरी ’अगं, बोस असता तर अजून छान ऐकायला आलं असतं’, अशा हृद आठवणी येतच आणि मग काही सुचलं नाही तर आपण भारतात परत जायच्या आधी (म्हणजे कधी????-इति मी) घेऊ, तिथे जास्त महाग पडते वगैरे गप्पा चालायच्या..मी काय आता लग्नाला काही वर्षे झाल्यावर जो सराईत कान असतो त्याने ऐकून दुसर्या आणखी सराईत कानाने ते सोडून देई...आणि ही असली संभाषणं अगदी इतक्यात घर सोडून ओरेगावात आलो तरी सुरुच होतं...(आणि अर्थातच माझं ए.का.ऐ.दु.का.सोडून देणंही)
आणि त्यादिवशी त्याने चक्क मला विचारलं नाहीतर सांगितलं, "मी बोस घेतलीय..." बापरे हा पण आता सराईत नवरा कॅटेगरीत गेला वाटतं..मी उडालेच...किंमत विचारायची माझी हिंमत झाली नाही...मी फ़क्त आवंढा गिळत "खरंच??" प्रश्न (कम राग) चिन्ह...."अगं जवळजवळ ३० % कमीला पडलीय़" "जूनी(इsssssssssss जरा ताणूनच)???" उत्तरादाखल "म्हणजे हो आणि नाही" बापरे हे काय नवंच?? कारण इथे जुनं सर्रास घेतलं जातं पण ही(म्हणजे आमचे ’अहो’) तुपाशी खाणारी कॅटेगरी इतक्या सहजी जूनी भानगड घेणार नाही हे मला साधारण माहित होतं...पण आजकाल वैताग घालवायचा असेल तर मी कमीत कमी प्रश्न विचारते म्हणजे मग न विचारल्या प्रश्नांची उत्तरंही आपसूक मिळतात...असो..
तर शेवटी हा नवाच बोस घरी आला आणि वरील भानगडीची उकल झाली. ही सिस्टिम म्हणजे त्याचा बास, पाच स्पिकर्स सगळं त्याच्या मूळ बॉक्समध्ये आणि मॅन्युअल तर उघडलेलंही नाही...नक्की स्वस्त पडली नं रे?? का बरं विकली असेल?? अशी प्रश्नचिन्हं मनात घेऊन मी होतेच, तेवढ्यात याने सांगायला सुरुवात केली..ही सिस्टीम ज्याची आहे त्याचा डिव्होर्स झाला आणि सेटलमेन्टमध्ये घर त्याच्या बायकोला गेलं आणि त्यात व्यवस्थित माउंट केलेली याने घेतलेली बोस त्याची त्याच्या कस्टडीत आली...कस्टडी हा मुद्दाम वरीजीनल श्टोरीतला तसाच ठेवला आहे..आतापर्यंत मला मुलांची कस्टडी माहीत होती पण नवर्यांच्या राज्यात साउंड सिस्टीम पण पोर या कॅटेगरीतच मोडणार म्हणा..असो..तर ही सेटलमेन्ट होईस्तोवर पठ्याने स्वतःच्य नव्या घरी सगळं इंटरनल वायरिंग इ. करुन नवा बोस घेऊनही टाकला होता आणि इथे जुन्या घरात असलेल्या बायकोला सगळं छान सेट केलेल्या त्या सिस्टिमला द्यायला बहुधा जीवावर आलं होतं...होता होता तिने मूळ सिस्टीम तशीच ठेवली आणि याला कॉम्पेन्सेशन म्हणून तशीच दुसरी सिस्टीम घेऊन दिली...आता ही नवी सिस्टीम घेऊन हा काय करणार म्हणून त्याने ती मिळेल त्या किमतीला विकली....काय देश आहे....एकतर भांडतात, वेगळं होतात, त्यात मग अशा वस्तूंवरचं प्रेम, हक्क जे काही असतं त्यातल्या भानगडीत पैशाची (आणि खरं तर वस्तूंचीही) नासाडी करत राहतात...आपण पडलो देशी बनावटीचे...भांडलो तरी एकत्र राहून परत कशावर किती खर्च करायचा म्हणत राहतो आणि मग कधी तरी नशीबाने होतं, ’दोघांच भांडण आणि तिसर्याचा लाभ’ किंवा सुधारीत भाषेत ’गोर्यांच भांडण आणि देशींचा लाभ’.....
मनातल्या आठवणींचा गुंता तसाच ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या डोकं वर काढतातच...त्यातल्या काहींचा गुंता इथे येऊन सोडवतेय.....
Thursday, July 29, 2010
Friday, July 16, 2010
आठवणीतलं घरगुती पावसाळी खाद्यजीवन....
मे महिना सुट्टीचा म्हणून आवडीचा म्हणायचा तर शेवटाला एकदम भाजून निघाल्यासारखं व्हायचं आणि सगळ्यात जास्त वाट पाहिली जायची ती पावसाची...तोही (तेव्हा) वेळेवर यायचा आणि मातीच्या धुंद वासानं वेडं करायचा..शाळेचं दप्तर पाठंगुळीला आणि हातात छत्री असलं भिजरं ध्यान मग पावसात मुद्दाम वाटेतल्या डबक्यामध्ये अडखळायचं...रेनकोट कधी स्वतःसाठी घेतला नाही पण दप्तरावर रेनकोट घातलेली मुलं पाहताना का कुणास ठाऊक त्यांची उंटासारखी बाकदार पाठ पाहिली की हसायला यायचं.हळुहळु गवतफ़ुलं उगवायला लागली की शाळेतही रुळणं व्हायचं आणि पाऊसही तोवर आपलं बस्तान चांगलं बसवून असे. गावाबाहेर कुठं जाणं झालं की हिरवा आसमंत, हिरवे डोंगर, सगळंच कसं हिरवं आणि ताजं...
अशाच पावसात वटसावित्रीला आईबरोबर गेलं की मिळणारे ते छोटे आंबे चोखतानाची मी मला आठवते...मिळतात का ते छोटे, फ़क्त चोखूनच खाता येतील असे आंबे आजकालही? त्या ओटीतला फ़णसाचा गराही खूप आवडायचा. आणखीही बरंच काही असायचं पण भर पावसात खाल्ला जाणारा हा आंबा...अहाहा! काय वर्णावं त्याचं रुप आणि चव...
श्रावणाच्या सुरुवातीलाच आई-बाबांचा एक नेहमीचा संवाद घडे. आई नेहमी पहिले पाच दिवस तरी कडक असं म्हणायची पण मग जसजसे तिचे एक-एक उपवास यायचे तसं मग ’सगळा गॅस धुवायला लागतो’ किंवा ’तुम्ही खा. मला सारखं केस धुवायला होत नाही’ अशी लंगडी कारणं देऊन शेवटी श्रावण घरात पाळला जाईच. नेहमीचे गुरुवार करणार्या आईचे सुरु व्हायचे श्रावणी सोमवार आणि शनिवारचे तसंच वेगवेगळ्या सणांचे उपवास. श्रावणातले उपवास चारच्या सुमारास सोडायचे असा काही नियम आहे का माहित नाही पण आई मात्र अशी चारच्या आसपास जेवायची. फ़्लॉवर-वटाणा भाजी, तळलेले पापड आणि अळूवडी यांना या जेवणात हमखास मान असे. प्राथमिकला असेपर्यंत तर मलाही श्रावणी सोमवार आणि शनिवारी शाळेला अर्धा दिवसाची सुट्टी असे. त्यामुळे आईने जेवणाला सुरुवात करेपासून मी तिच्यासोबत काही छुटकू-मुटकू गोष्टी करत नाहीतर नुस्तं तिचं निगुतीने अळूवड्यांची पानं वाळणं पाहात राही. आणि मध्ये मध्ये तोंडातलं पाणी आवरत; कारण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय पापडाचा तुकडाही मिळत नसे..श्रावणातल्या जेवणाची ती न्यारी चव नंतर कॉलेजजीवनापासून कधी आलीच नाही असं वाटतं.
श्रावणघेवडा हे नावच कसं श्रावणाची आठवण ताजी करतो, यासारख्याच वाल इ. सारख्या अनेक शेंगाभाज्या, मक्याची कणसं बाबा नेहमी घरीच उकडून खायला द्यायचे त्यामुळे बाहेरचं काही चटकमटक खायची गरजच पडली नाही...अर्थात अधुनमधुन मक्याचं भाजलेलं कणीस यायचंच घरी आणि तेही तितक्याच आवडीने खाल्लं जाई. पावसाळ्यात मी माझ्या मामाची पण उत्कंठेने वाट पाही कारण मामीने वाड्यात लावलेली काकडी आणि आणखी काही भाज्यांची चव न्यारीच असे...मोठ्या पण कोवळ्या काकडीला आमच्याकडे "मिणी काकडी" म्हणत आणि सर्दी झालेली असली तरी आईची नजर चुकवून बाबा हळूच मला एखादा तुकडा तरी देत...
अनेक पालेभाज्या लालमाठ, चवळी आणि पालघर, तानसा अशा ठिकाणच्या जंगलात आपोआप उगवलेली ’करटोली’ सारखी फ़ळभाजी अशा अनेक पावसाळी भाज्या खायची मजा हवी असेल तर त्यासाठी पावसाळ्याची वाट पाहायलाच हवी....पण श्रावण आणि एकंदरित माझ्या पावसाळी खाण्यावर कळस चढला तो शेवळ्याच्या आमटीने.. शेवळे ही पण एक रानभाजी फ़क्त पावसाळ्यातच मुंबईत जवळजवळ सर्वत्र मिळते. मला वाटतं आदिवासी लोकं जंगलात जाऊन गोळा करुन त्यांच्या छोट्या जुड्या करुन विकतात.ही साफ़ करणं एक कला आहे नाहीतर सगळी भाजी खाजरी होऊ शकते शिवाय खाज कमी करण्यासाठी यात काकड म्हणून एक आवळ्यासारखं फ़ळ असतं त्याचा रस घालतात. माझी एक मावशी आमच्या घरापासुन साधारण रिक्शाच्या अंतरावर राही. माझा श्रावण घरात जरी पाळला जायचा तरी एखादा रविवार या मावशीकडे गेलं की तिने केलेले मासे पाहून माझा श्रावण पाळण्याचा उत्साह एका मिनिटांत गळून जाई..असो...आमच्याकडे पहिली आमटी केली त्यावेळेस काहीतरी करुन आई त्या दिवशी मावशीला बोलवे किंवा सरळ एक वाटी आमटी पाठवून तरी देई. मग त्यानंतर त्या जेव्हा भेटत त्यावेळी आमटीच्या चवीबद्द्ल एक परिसंवाद घडे. बहुधा त्याच्या आसपास केलेल्या मावशीच्या आमटीला अम्मळ खाज आलेली असे किंवा असंच काही आणि मग माझी ’आमटी एक्सपर्ट आई” तिला काकडाचा रस जास्त घाल किंवा थोडी चिंच-गूळ घाल अशा टीपा देई. आता हे लिहिताना उगाच भरुन आलंय की चवीचा हा ठेवा मी फ़क्त खाण्यापुरताच मनात ठेवलाय. पण हे असे बर्याच जणांना माहितही नसलेले पदार्थ आता शिकायला हवं असंही वाटतंय...(किती बदलतेय मी? असं माझे वर्गमित्र नक्की म्हणतील हे वाचलं तर असो...)
आमच्याकडे एक स्वतःची वाडी करणारे काका चांगली भाजी असली की घरी घेऊन यायचे. त्यांच्याकडची हळदीची पानं आली की मग आई पातोळे करी..मला तो प्रकार विशेष आवडत नसे पण चवबदल म्हणून खाणं व्हायचं...एकंदरित शाकाहारी खाण्याचे इतके प्रकार असायचे की मांसाहाराला तात्पुरतं विसरता यायचं.
जसे हे दोन उपास तसंच श्रावणात येणारे सणही श्रावण आवडायचं महत्वाचं कारण असावं. नागपंचमीला नागपूजा, लाह्या, तर नारळी पौर्णिमेला नारळी-भात आणि कधीतरी समुद्रात जाऊन नारळ अर्पण करणं; नंतर गोपाळकाल्याला दहीहंडी लागली की मग ती फ़ुटेपर्यंत मान मोडेस्तोवर गॅलरीतल्या धक्याला रेलून पाहात राहणं सारंच एकापेक्षा एक सरस. आणि मग एखाद्या सुरेल मैफ़िलीच्या शेवटची भैरवी तसा येणारा पोळा म्हणजेच श्रावण अमावास्या.लहान असताना कुमारीकेचा मान म्हणून शेजारच्या काही काक्याही आधीच सांगुन ठेवत संध्याकाळी यायला आणि आईचीही तयारी सुरु असे. तांदळाची खीर आणि पुरी असं हातात घेऊन देवापुढे बसून कोण आलेय ते न पाहता फ़क्त डोक्यावरुन मागे वाटीचा हात नेत विचारायचं "अतिथी कोण?" उत्तर अर्थातच "मी" आणि मग ती खीर-पुरी खाऊन पुढच्या खीर-पुरीसाठी तयार. कुठे गेलं हे सारं? असा विचार करत असतानाच मागच्या वर्षी आईचं श्रावणात माझ्याकडे असणं मला पुन्हा त्या श्रावणात घेऊन गेलं आणि काय चालंलय या दोघींचं असा विचार माझा लेक करेस्तोवर शिरा-पुरीची वाटी त्याच्या हातात होती.
श्रावण संपल्याचं काही वाईट वाटायच्या आतच गणपती येत त्यामुळे मग सगळ्या आसमंतातच आरत्यांचा आवाज आणि उदबत्तीचा वास भरून राहिलाय का असं वाटे. माझी आणखी एक मावशी विरारला राहायची. ती असेपर्यंत तिच्या घरचा दीड दिवसांचा गणपती म्हणजे आमचा घरचा गणपती असल्यासारखं असायचं. चलतचित्राने सुशोभित केलं जाणारं गणपतीचं मखर, हटकरांची शाडूची मूर्ती (डोळे हे यांचं वैशिष्ट्य), जागरण आणि आरत्यांमध्ये दशावताराची आरती आणि अर्थातच प्रसादापासून जेवणापर्यंत केला जाणारा वेगळा खाद्यपदार्थांचा घाट ही या उत्सवाची पाच मुख्य बोटंच म्हणायची. माझी आई धरुन पाच बहिणींमध्ये सुगरणपणाचा मान जर कुणाला द्यायचा असेल तर फ़क्त याच मावशीचा विचार करता येईल. अगदी मटण चॉपपासुन ते बासुंदीपर्यंत सगळे पदार्थ करणे आणि त्याहीपेक्षा जास्त प्रेमाने ते खाऊ घालणे हे आमच्या नातलगांमध्ये करणारी ही एकमेवच. गणपतीला तिच्या हातचे मुगाचे लाडू आणि उकडीचे मोदक छान की अळूवडी आणि प्रत्येक जेवणातल्या तर्हेतर्हेच्या भाज्या, मे महिन्यात खपून केलेले पापड-लोणची छान याचा विचार न करता ते खाणं हेच उत्तम. शिवाय जागरण हा म्हणजे विरंगुळा आणि खाद्य संस्कृतीचा परमोच्च बिंदु. मावशी असेपर्यंत तिने कायम स्वहस्ते केलेला एखादा नवा, वेगळा पदार्थ आणि चहा-कॉफ़ी असे तर आजकाल बाहेरून ऑर्डर देऊन खायची रेलेचेल केली जाते. तिच्या मागे त्याच उत्साहाने गणपती उत्सव साजरा करणारा माझा मावसभाऊही प्रत्येक वर्षी मखराची कल्पकता तर कलाकार असल्याने जपतोच पण जागरणासाठी येणार्यांची सोय संगीताची साथ करणारा एखादा वादक बोलावुन आणि जिव्हा तृप्त करणारा आचारी समोर वडे तळून देतोय किंवा चाट बनतेय या सर्वांची सोय करतो. खरंतर फ़क्त या गणपती उत्सवावर एक वेगळी पोस्ट होईल.दीड दिवसांचा गणपती गेल्यावर मखरासमोरच्या फ़ळांचा एकत्रित केलेला प्रसाद म्हणजे तर काय देवाचीच कृपा. त्यात खाल्ल्या जाणार्या नारळ, टरबुज, खरबुज, पेरु, संत्री अशा अनेक फ़ळांनी एकमेकांच्या साथीने त्यांची चव द्विगुणीत केली असते असं मला नेहमीच वाटतं..अगदी थोडंसं कडवट तुरट असं ग्रेपफ़्रुटही आपण खाल्लं हे नंतरच कळतं..आणि या सर्वाला थोडासा उदबत्तीचा किंवा कापराचा असा तो मिक्स प्रसादी वास असतो दीड, पाच, सात की अकरा दिवसांचा मुक्काम हेही सांगून जातो.
गणपती गावाला गेले की मात्र जरा हळवं वाटे..पावसाळाही अनंत चतुर्दशीला बहुधा याच कारणासाठी हजेरी लावे. यानंतरचा पाऊस म्हणजे बोनस. पडला तर पडला नाहीतरी काही हरकत नाही...आणि खरं तर नंतर येणार्या घटस्थापनेच्या दृष्टीने तो न पडला तर बरंच असंच सगळ्यांना वाटतही असेल...सण आणि त्यानिमित्ताने होणारी खाद्ययात्रा काही इथे संपणारी नसते पण तरीही पावसाळ्याचे गेले तीन-साडेतीन महिने केलेली खादाडी आणि विशेष करुन शाकाहारी खादाडी माझ्या वार्षिक खाद्यजीवनात फ़ारच मोलाचं स्थान ठेऊन आहे...गेले कित्येक वर्षे तसे पावसाळे आले नाहीत किंवा मन तृप्त होईस्तोवर ती शेवळ्याची आमटी, उकडलेल्या शेंगा, अळूवड्या, उकडीचे मोदक, प्रसादाची एकत्रित फ़ळं खाणं झालं नाही असं ही पोस्ट लिहून झाल्यावर वाटतंय आणि थोडं उदासच व्हायला होतंय..पण तरीही या अमोल खाद्यठेव्याचा गेली अनेक वर्षे आपण भाग होऊ शकलो हेही नसे थोडके....
सर्व छायाचित्रे मायाजालावरुन साभार

पावसाळ्यात काही काही चविष्ट गोष्टी आणखी चविष्ट लागतात...कुणाही सर्वसामान्याप्रमाणे माझंही मत कांदाभजींना तोड नसली तरी मोड आलेल्या वालाची आमटी, भात आणि भाजलेला उडदाचा पापड हे अप्रतिम त्रिकुट ज्याने पावसात खाल्लं असेल त्याच्या तोंडात आत्ताही त्या चवीने पाणी येईल. मग लगोलग आषाढ आला की पावसाची सवय शरीराला बाहेरुन झालेली असली तरी पोट मात्र हमखास बिघडायचं आणि धर्मानं ख्रिश्चन असले तरी आमचे नेहमीचे डॉक्टर त्या पोटाला आषाढी लागली की काय? म्हणून मग थोडा ताबा ठेवायचा सल्ला देत. कसंबसं आषाढ अमावास्येपर्यंत तग धरायचं आणि गटारीला सगळं सामिष मनसोक्त खायचं. आषाढ कधी एकदा जातो असं व्हायचं आणि त्याचं कारण ही "आषाढी"ची पळापळ आणि गटारी नसे, तर नंतर येणारा श्रावण.मला मुंबईतला पावसाळा आवडतो की श्रावण? असं कधीतरी गणित मांडायला हवं..पण तरी खात्री आहे मला श्रावणाला जास्त मार्क मिळणार ते.
श्रावणाच्या सुरुवातीलाच आई-बाबांचा एक नेहमीचा संवाद घडे. आई नेहमी पहिले पाच दिवस तरी कडक असं म्हणायची पण मग जसजसे तिचे एक-एक उपवास यायचे तसं मग ’सगळा गॅस धुवायला लागतो’ किंवा ’तुम्ही खा. मला सारखं केस धुवायला होत नाही’ अशी लंगडी कारणं देऊन शेवटी श्रावण घरात पाळला जाईच. नेहमीचे गुरुवार करणार्या आईचे सुरु व्हायचे श्रावणी सोमवार आणि शनिवारचे तसंच वेगवेगळ्या सणांचे उपवास. श्रावणातले उपवास चारच्या सुमारास सोडायचे असा काही नियम आहे का माहित नाही पण आई मात्र अशी चारच्या आसपास जेवायची. फ़्लॉवर-वटाणा भाजी, तळलेले पापड आणि अळूवडी यांना या जेवणात हमखास मान असे. प्राथमिकला असेपर्यंत तर मलाही श्रावणी सोमवार आणि शनिवारी शाळेला अर्धा दिवसाची सुट्टी असे. त्यामुळे आईने जेवणाला सुरुवात करेपासून मी तिच्यासोबत काही छुटकू-मुटकू गोष्टी करत नाहीतर नुस्तं तिचं निगुतीने अळूवड्यांची पानं वाळणं पाहात राही. आणि मध्ये मध्ये तोंडातलं पाणी आवरत; कारण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय पापडाचा तुकडाही मिळत नसे..श्रावणातल्या जेवणाची ती न्यारी चव नंतर कॉलेजजीवनापासून कधी आलीच नाही असं वाटतं.
श्रावणघेवडा हे नावच कसं श्रावणाची आठवण ताजी करतो, यासारख्याच वाल इ. सारख्या अनेक शेंगाभाज्या, मक्याची कणसं बाबा नेहमी घरीच उकडून खायला द्यायचे त्यामुळे बाहेरचं काही चटकमटक खायची गरजच पडली नाही...अर्थात अधुनमधुन मक्याचं भाजलेलं कणीस यायचंच घरी आणि तेही तितक्याच आवडीने खाल्लं जाई. पावसाळ्यात मी माझ्या मामाची पण उत्कंठेने वाट पाही कारण मामीने वाड्यात लावलेली काकडी आणि आणखी काही भाज्यांची चव न्यारीच असे...मोठ्या पण कोवळ्या काकडीला आमच्याकडे "मिणी काकडी" म्हणत आणि सर्दी झालेली असली तरी आईची नजर चुकवून बाबा हळूच मला एखादा तुकडा तरी देत...
अनेक पालेभाज्या लालमाठ, चवळी आणि पालघर, तानसा अशा ठिकाणच्या जंगलात आपोआप उगवलेली ’करटोली’ सारखी फ़ळभाजी अशा अनेक पावसाळी भाज्या खायची मजा हवी असेल तर त्यासाठी पावसाळ्याची वाट पाहायलाच हवी....पण श्रावण आणि एकंदरित माझ्या पावसाळी खाण्यावर कळस चढला तो शेवळ्याच्या आमटीने.. शेवळे ही पण एक रानभाजी फ़क्त पावसाळ्यातच मुंबईत जवळजवळ सर्वत्र मिळते. मला वाटतं आदिवासी लोकं जंगलात जाऊन गोळा करुन त्यांच्या छोट्या जुड्या करुन विकतात.ही साफ़ करणं एक कला आहे नाहीतर सगळी भाजी खाजरी होऊ शकते शिवाय खाज कमी करण्यासाठी यात काकड म्हणून एक आवळ्यासारखं फ़ळ असतं त्याचा रस घालतात. माझी एक मावशी आमच्या घरापासुन साधारण रिक्शाच्या अंतरावर राही. माझा श्रावण घरात जरी पाळला जायचा तरी एखादा रविवार या मावशीकडे गेलं की तिने केलेले मासे पाहून माझा श्रावण पाळण्याचा उत्साह एका मिनिटांत गळून जाई..असो...आमच्याकडे पहिली आमटी केली त्यावेळेस काहीतरी करुन आई त्या दिवशी मावशीला बोलवे किंवा सरळ एक वाटी आमटी पाठवून तरी देई. मग त्यानंतर त्या जेव्हा भेटत त्यावेळी आमटीच्या चवीबद्द्ल एक परिसंवाद घडे. बहुधा त्याच्या आसपास केलेल्या मावशीच्या आमटीला अम्मळ खाज आलेली असे किंवा असंच काही आणि मग माझी ’आमटी एक्सपर्ट आई” तिला काकडाचा रस जास्त घाल किंवा थोडी चिंच-गूळ घाल अशा टीपा देई. आता हे लिहिताना उगाच भरुन आलंय की चवीचा हा ठेवा मी फ़क्त खाण्यापुरताच मनात ठेवलाय. पण हे असे बर्याच जणांना माहितही नसलेले पदार्थ आता शिकायला हवं असंही वाटतंय...(किती बदलतेय मी? असं माझे वर्गमित्र नक्की म्हणतील हे वाचलं तर असो...)
आमच्याकडे एक स्वतःची वाडी करणारे काका चांगली भाजी असली की घरी घेऊन यायचे. त्यांच्याकडची हळदीची पानं आली की मग आई पातोळे करी..मला तो प्रकार विशेष आवडत नसे पण चवबदल म्हणून खाणं व्हायचं...एकंदरित शाकाहारी खाण्याचे इतके प्रकार असायचे की मांसाहाराला तात्पुरतं विसरता यायचं.
जसे हे दोन उपास तसंच श्रावणात येणारे सणही श्रावण आवडायचं महत्वाचं कारण असावं. नागपंचमीला नागपूजा, लाह्या, तर नारळी पौर्णिमेला नारळी-भात आणि कधीतरी समुद्रात जाऊन नारळ अर्पण करणं; नंतर गोपाळकाल्याला दहीहंडी लागली की मग ती फ़ुटेपर्यंत मान मोडेस्तोवर गॅलरीतल्या धक्याला रेलून पाहात राहणं सारंच एकापेक्षा एक सरस. आणि मग एखाद्या सुरेल मैफ़िलीच्या शेवटची भैरवी तसा येणारा पोळा म्हणजेच श्रावण अमावास्या.लहान असताना कुमारीकेचा मान म्हणून शेजारच्या काही काक्याही आधीच सांगुन ठेवत संध्याकाळी यायला आणि आईचीही तयारी सुरु असे. तांदळाची खीर आणि पुरी असं हातात घेऊन देवापुढे बसून कोण आलेय ते न पाहता फ़क्त डोक्यावरुन मागे वाटीचा हात नेत विचारायचं "अतिथी कोण?" उत्तर अर्थातच "मी" आणि मग ती खीर-पुरी खाऊन पुढच्या खीर-पुरीसाठी तयार. कुठे गेलं हे सारं? असा विचार करत असतानाच मागच्या वर्षी आईचं श्रावणात माझ्याकडे असणं मला पुन्हा त्या श्रावणात घेऊन गेलं आणि काय चालंलय या दोघींचं असा विचार माझा लेक करेस्तोवर शिरा-पुरीची वाटी त्याच्या हातात होती.
श्रावण संपल्याचं काही वाईट वाटायच्या आतच गणपती येत त्यामुळे मग सगळ्या आसमंतातच आरत्यांचा आवाज आणि उदबत्तीचा वास भरून राहिलाय का असं वाटे. माझी आणखी एक मावशी विरारला राहायची. ती असेपर्यंत तिच्या घरचा दीड दिवसांचा गणपती म्हणजे आमचा घरचा गणपती असल्यासारखं असायचं. चलतचित्राने सुशोभित केलं जाणारं गणपतीचं मखर, हटकरांची शाडूची मूर्ती (डोळे हे यांचं वैशिष्ट्य), जागरण आणि आरत्यांमध्ये दशावताराची आरती आणि अर्थातच प्रसादापासून जेवणापर्यंत केला जाणारा वेगळा खाद्यपदार्थांचा घाट ही या उत्सवाची पाच मुख्य बोटंच म्हणायची. माझी आई धरुन पाच बहिणींमध्ये सुगरणपणाचा मान जर कुणाला द्यायचा असेल तर फ़क्त याच मावशीचा विचार करता येईल. अगदी मटण चॉपपासुन ते बासुंदीपर्यंत सगळे पदार्थ करणे आणि त्याहीपेक्षा जास्त प्रेमाने ते खाऊ घालणे हे आमच्या नातलगांमध्ये करणारी ही एकमेवच. गणपतीला तिच्या हातचे मुगाचे लाडू आणि उकडीचे मोदक छान की अळूवडी आणि प्रत्येक जेवणातल्या तर्हेतर्हेच्या भाज्या, मे महिन्यात खपून केलेले पापड-लोणची छान याचा विचार न करता ते खाणं हेच उत्तम. शिवाय जागरण हा म्हणजे विरंगुळा आणि खाद्य संस्कृतीचा परमोच्च बिंदु. मावशी असेपर्यंत तिने कायम स्वहस्ते केलेला एखादा नवा, वेगळा पदार्थ आणि चहा-कॉफ़ी असे तर आजकाल बाहेरून ऑर्डर देऊन खायची रेलेचेल केली जाते. तिच्या मागे त्याच उत्साहाने गणपती उत्सव साजरा करणारा माझा मावसभाऊही प्रत्येक वर्षी मखराची कल्पकता तर कलाकार असल्याने जपतोच पण जागरणासाठी येणार्यांची सोय संगीताची साथ करणारा एखादा वादक बोलावुन आणि जिव्हा तृप्त करणारा आचारी समोर वडे तळून देतोय किंवा चाट बनतेय या सर्वांची सोय करतो. खरंतर फ़क्त या गणपती उत्सवावर एक वेगळी पोस्ट होईल.दीड दिवसांचा गणपती गेल्यावर मखरासमोरच्या फ़ळांचा एकत्रित केलेला प्रसाद म्हणजे तर काय देवाचीच कृपा. त्यात खाल्ल्या जाणार्या नारळ, टरबुज, खरबुज, पेरु, संत्री अशा अनेक फ़ळांनी एकमेकांच्या साथीने त्यांची चव द्विगुणीत केली असते असं मला नेहमीच वाटतं..अगदी थोडंसं कडवट तुरट असं ग्रेपफ़्रुटही आपण खाल्लं हे नंतरच कळतं..आणि या सर्वाला थोडासा उदबत्तीचा किंवा कापराचा असा तो मिक्स प्रसादी वास असतो दीड, पाच, सात की अकरा दिवसांचा मुक्काम हेही सांगून जातो.
गणपती गावाला गेले की मात्र जरा हळवं वाटे..पावसाळाही अनंत चतुर्दशीला बहुधा याच कारणासाठी हजेरी लावे. यानंतरचा पाऊस म्हणजे बोनस. पडला तर पडला नाहीतरी काही हरकत नाही...आणि खरं तर नंतर येणार्या घटस्थापनेच्या दृष्टीने तो न पडला तर बरंच असंच सगळ्यांना वाटतही असेल...सण आणि त्यानिमित्ताने होणारी खाद्ययात्रा काही इथे संपणारी नसते पण तरीही पावसाळ्याचे गेले तीन-साडेतीन महिने केलेली खादाडी आणि विशेष करुन शाकाहारी खादाडी माझ्या वार्षिक खाद्यजीवनात फ़ारच मोलाचं स्थान ठेऊन आहे...गेले कित्येक वर्षे तसे पावसाळे आले नाहीत किंवा मन तृप्त होईस्तोवर ती शेवळ्याची आमटी, उकडलेल्या शेंगा, अळूवड्या, उकडीचे मोदक, प्रसादाची एकत्रित फ़ळं खाणं झालं नाही असं ही पोस्ट लिहून झाल्यावर वाटतंय आणि थोडं उदासच व्हायला होतंय..पण तरीही या अमोल खाद्यठेव्याचा गेली अनेक वर्षे आपण भाग होऊ शकलो हेही नसे थोडके....
सर्व छायाचित्रे मायाजालावरुन साभार
Thursday, July 8, 2010
दर्शन
तसं पाहायला गेलं तर मी नास्तिक नाही पण फ़ार देव देव केलं जातं असंही नाही.रोज सकाळी आंघोळीनंतर देवाच्या पाया पडायचं आणि एक स्तोत्र म्हणायचं हे अंगवळणी पडलंय. त्यात आस्तिकतेचा भाग किती आणि खरा भाव किती असंही कधीकधी स्वतःबद्द्ल स्वतःलाच वाटत. पण तरी देवाच्या पाठी जाणार्यांपैकी नाही. खरं तर आमच्या भागातल्या एका सुप्रसिद्ध साईमंदिरापास्नं माझं घर फ़ारच जवळ तरीही जेव्हा लोकं स्टेशन ते देऊळ पायी असं काही गुरुवारी करायचे, तेव्हा मी त्या बाजुला फ़िरकतही नसे. मात्र एखाद्या मधल्या दिवशी वाटलं की गाभार्यात जाऊन बसायला चांगलंही वाटे.
देश सोडल्यानंतर मात्र उगाच देवळात जात नाही याची उगाच चुटपुट का हे मात्र कळत नाही.आतापर्यंत जिथे कुठे राहिलो तिथे देऊळ किमान ३० मैल तरी लांब त्यामुळे मग जाणं महिन्यात एकदा वगैरे. त्यात माझा नवरा पडला पक्का देऊळवाला म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी देवळात गेलं नाही की त्याला कसंतरी व्हायचं आणि मला ऑफ़िसमधुन आल्यावर पटापट स्वयंपाक करुन मग ते ३० मैल तुडवत जा आणि भुकेल्या पोटी परत या ही एक प्रकारची शिक्षा वाटायची..पण तरी जमेल तसं जायचो.
आता ओरेगावात मात्र देऊळ त्यातल्या त्यात जवळ म्हणजे साधारण १०-१२ मैलावर आहे त्यामुळे दर आठवड्याला जायचा प्रयत्न करतोय तरीही काहीना काही तरी कारण निघतेच आणि जाणं राहातं...परवा मात्र ठरवलंच जायचंच. मग निघालो आणि हिंदु टेम्पल की स्वामी नारायण हा पुढचा प्रश्न होता.(अरे हो सांगायचं राहिलं इथे एकाच गावात ही दोन देवळं आहेत.) मला स्वतःला स्वामी नारायणाच्या देवळात जायला आवडत नाही आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे तिथे अगदी चपला काढायच्या जागेपासून स्त्री-पुरुष अशी विभागणी असते. मग दर्शनालाही तसंच वेगळं वेगळं राहायचं आणि जास्त गर्दी असेल तर मग परत चक्क बाहेरच भेटायचं.
शिकागोला एक मोठठं स्वामी नारायणाचं देऊळ आहे आणि त्याचा जीर्णोद्धार करुन बाजुला पुन्हा जवळ जवळ महालासारखं दुसरं देऊळही बांधलंय. तिथे मी निव्वळ खालच्या कॅफ़ेटेरियात समोसा चांगला मिळतो आणि त्यांची शुद्ध तुपातली मिठाई, फ़रसाण इ. नवर्याला आवडायचं म्हणून दोन-तीन महिन्यांत एकदा जायचे. असो.
या पार्श्वभूमीवर जेव्हा नवरा म्हणाला की आज स्वामी नारायणाच्या देवळात जाऊया तेव्हा मी विचार केला "जाऊया आणि येताना काही विकतचा खाऊ घेऊन येऊया". पोहोचलो तेव्हा नेमकं दर्शनाचे पडदे बंद करण्यात आले होते. मला वाटतं सायंआरतीच्या आधीची काही पद्धत असावी किंवा तिथल्या एका बाईचं गुजराती कानावर पडलं त्याप्रमाणे "भगवान जमेछे" म्हणजे देव जेवताहेत त्यासाठी असेल. मग आम्ही आपापल्या विभागात खाली बसलो. मी सवयीने मनातल्या मनात गणपती स्तोत्र म्हणायला लागले. कधी उघडणार यासाठी नवरा नेत्रपल्लवी करतोय (याला देवळात येण्याइतकीच बाहेर पडण्याची पण हौस) तोच सरकन पडदा बाजुला झाला आणि सोन्याचा मुलामा दिलेल्या दालनात पिवळ्या धमक प्रकाशात निळी वस्त्रं ल्यालेलं राधा-कृष्णाचं रुप इतकं मोहक वाटत होतं की बाकीच्या जगाचा विसर पडावा. त्यांच्या बाजुला दिमाखात उभे असलेले स्वामी नारायण आणि आणखी एक स्वामीही त्याच निळ्या वस्त्रात जणू आपल्याकडे पाहुनच स्मित करताहेत असं वाटावं. त्यांच्या उजवीकडची राम-सीतेची जोडीही पिवळ्या तेजात न्हाऊन स्मितहास्य करून त्यांचं लक्ष फ़क्त आपल्याकडेच असावं असं भासवत होती.अगदी डावीकडचे गणपती आणि शंकर-पार्वतीची जोडीही इतकं सुंदर हास्य ल्याली होती की आपला सगळा अहंकार गळून पडावा. "ठीक आहे गं तुला या देवळात यायला मनापासून आवडत नाही पण आम्ही तर तेच आहोत नं आणि सदैव तुझ्या पाठीशी" असं काही ते सांगत तर नसावेत नं? आज नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळ मी या मुर्ती आणि त्यांचा साजशृंगार अगदी मनापासून पाहात, सरळ लक्ष केंद्रित करुन बसले होते.
इथे अमेरिकेत याआधी काही दाक्षिणात्य पद्धतीच्या देवळांमध्येही हा अनुभव एक-दोनदा आल्याचं आठवलं. काही पुजारी इतकं छान सजवतात की देवाला अगदी पाहात राहावं आणि भान हरपावं. डेलावेअरच्या हिंदु टेम्पलमध्ये पडदा उघडल्यानंतरचं लक्ष्मीचं रुप एकांतात आठवलं तर शहारा येतो. एकदा सोमवारी पिंडीला अभिषेकानंतर भस्म विलेपल्यानंतरचं रुपही पाहिलं आणि मंत्रमुग्ध झाले. आज स्वामी नारायणाकडे हाच अनुभव आला.
देवळात गेल्यावर देवाचं दर्शन हा तसा देवळात जायचा उद्देशच पण देवानं आधी वाट पाहायला लावून नंतर दिलेलं आताचं हे आणि अशीच दर्शनं मात्र कायम मनात राहतील आणि मग आपण आस्तिक नास्तिक की मधले? असे प्रश्न आपसूक विसरले जातील.उरेल तो निस्सीम भाव आणि कुठल्या तरी अकल्पित जागी पोहोचलेलं मन.

Thursday, July 1, 2010
मेरी मराठी....
हा प्रसंग घडला आहे तो खरं तर अमेरिकेत...इथे आधीच या राज्यात आम्ही नवे त्यात आपल्या देशातले लोक भेटणार म्हणजे काहीतरी वेगळं आणि त्यातही जर एक नवीच ओळख निघालेला एखादा मराठी निघाला तर?? हम्म्म...जसं दोन गुजराथी भेटले की गुजराथीतच बोलतात तसंच निदान परदेशात तरी दोन मराठी भेटले तर ते मराठीच बोलणार नं? तस्संच घडलं..पण नेमकं तिथे एक अशी व्यक्ती मला भेटली जिला हे आमचं असं इतर अमराठी लोकांत मराठी बोलणं रुचलं नाही...बरं नाही तर नाही दोन मिन्टं गप्प बसायचं की नाही??
अगदी सगळ्यांसमोर आता हे मराठी बंद करा...थोडक्यात ऐकवत नाही आहे तुमची भाषा मला अशा अर्थाचं फ़टकळ बोलणं...तसं पाहायला गेलं तर अरे ला कारे करणं खूप सोप्पं असतं पण उगाच कशाला म्हणून मी थोडं प्रेमानेच म्हटलं की बाई मला मराठी बोलायला इतकं आवडतं आणि सहज जमतं की मी हिंदी (खरं तर तुझी हिंदी म्हणणार होते पण आवरलं) सुरू केली तर तुच म्हणशील मला की मराठीच बोल बाई....
नकळत दोन व्यक्तींमध्ये एक अदृष्य़ रेषा आखली गेली...पुढे निदान त्या व्यक्तीशी तरी बोलणं जड गेलं..का कुणास ठाऊक त्यादिवशीचं बाहेरचं खाणं मलातरी महागातच पडलं...अख्खा आठवडा मी या गोष्टीचा विचार करत बसले की काय चुकलं आपलं चटकन मराठीत बोललो ते?? बरं बोलणं ते काय तर जुजबी.... अमेरिकेत केव्हा आलांत?? इटालियन या आधी खाल्लंय का असलं....म्हणजे त्या तिसर्या व्यक्तीचा काहीही संबंध नसलेलं...तरीही ते इतकं टोचलं जावं...
मग खूप खूप जास्त डोकं खाल्लं आणि अचानक ट्युब पेटावी तसं पेटलं..की तुम्ही मराठी बोलु नका पण हिंदी बोला, असं हे जे कुणी सांगतंय याचा अर्थ असा नाही आहे की हिंदी सगळ्यांना कळेल...याचा अर्थ फ़क्त इतकाच आहे की हिंदी त्या व्यक्तीची मातृभाषा आहे...म्हणजे पटकन मी तिथे पडले तर मी जसं "आई गं" म्हणेन तसं ती व्यक्ती "ओ मॉं’ असं काही म्हणेल...मला जर कुणी विचार करायला सांगितला तर मी तो मराठीत करते अगदी लिहिताना इंग्रजीत लिहायचं असलं तरी, तसंच ही व्यक्ती हिंदीत करत असेल...आणि मग माझ्यासमोर जर दुसरी मराठी व्यक्ती किंवा खरं तर स्वतःच्या तंद्रीत असताना कुणीही समोर आलं तर मी मराठीत बोलेन तसंच ही व्यक्ती हिंदीत बोलेल..मग उगाच चवताळून सगळ्यांवर हिंदीची जबरदस्ती नाही चाललीय तर स्वतः मातृभाषेतून व्यक्त व्हायची सोय चाललीय....माझं हे लॉजिक आता मला पटतंय आणि जसा इतरांना आपापल्या मातृभाषेत व्यक्त व्हायचा अधिकार आहे तर तो मला का नसावा आणि तेही कामाचं ठिकाण नाही आहे हे..फ़क्त श्रमपरिहार चाललाय आणि अशा ठिकाणी उगाच भाषेचा बडेजाव करुन स्वतःचं वेगळे(?)पण सिद्ध करणार्या लोकांच्या काय नादी लागायचं...फ़क्त पुन्हा असलं महागडं जेवण आणि तेही स्वतःच्या पैशाने जेवायला जायचं नाही एवढं मात्र ठरवलंय....

Labels:
स्वैर....
Subscribe to:
Posts (Atom)