Wednesday, June 24, 2009

पावसाळी चप्पल

सध्या मुंबईत पडलेल्या किंवा न पडलेल्या पण पावसाळ्याच्या गप्पा सुरु आहेत. कधीतरी मोठा पूर येणार म्हणून शाळांना आधीच सुट्टी पण दिली आहे असेही एका मैत्रीणीने मेल मध्ये लिहीलय या पार्श्वभूमीवर मला नकळत पावसाळी चपलेची आठवण झाली. किती वर्ष झाली पावसाळी चपला घेऊन. इथे पावसाळा असा ऋतु नाही त्यामुळे पाऊस कधीही पडणार पण आपल्यासारखा नाही. मग पार्किंग लॉट ते मुक्कामाचं ठिकाण एवढं चालायला कुठलंही पादत्राण चालतं. असो. तर काय सांगत होते? पावसाळी चपल.
पावसाळा या माझ्या लाडक्या ऋतुमध्ये माझा छळ करणारी माझी पक्की वैरीण म्हणजे पावसाळी चप्पल. प्रत्येक वर्षीची ही रड होती. बाबा मजेने म्हणायचे पण, "काय अपर्णा या वर्षी पावसाळ्याच्या चपलेचं काय करणारेस?" मी मात्र हा छळवाद आता सुरु झाला म्हणून मनातल्या मनात दहा आकडे मोजत बसायची. आतापर्यंत वाट्याला आलेल्या प्रत्येक पावसाळी चपलेने मला त्रास दिला आहे. ज्या कुणी ऑल सिझन नामक प्रकार शोधलाय त्याला माझ्या इतके दुवा कुणी दिले नसतील. पण एक दोन ऑल सिझन चपलांनीही मला थोडा फ़ार दणका दिलाय.
माध्यमिकला शाळा बदलली तेव्हा अगदी नव्या फ़ॅशनचे म्हणून काळे, समोरच्या भागाला जाळी असणारे आणि मागून पुर्ण बंद असे बुट आणलेले बूट मला आठवतात. माझी ताई त्याला पाववाल्याचे बुट असं म्हणायची. पुर्वी तो सायकलवर खारी, पाव वगैरे विकायला यायचा त्याचे बारा महिने तसेच पुढुन जाळी नसून बंद असणारे बुट असायचे. शाळेच्या पहिल्या दिवशी पाऊस नसताना घालुन गेले आणि घरी येईस्तो करंगळीवर एक टमटमीत कातडीचा फ़ुगा आला होता. बाबा म्हणाले परत एकदा घालून दाखव आणि त्यांच्या मते मी जरा लुज फ़िटिंग घ्यायला हवं होतं. तर आईचं म्हणणं घालुन घालुन नीट होईल. काही नाही करंगळीवर एक पट्टी लावुन थोडे दिवस सरळ तसेच वापर. आपल्याकडे रिटर्न पॉलिसी नाही ना. म्हणजे माझ्यासारखा ग्राहक मिळाला तर ती रद्दच होईल कारण माझी प्रत्येक चप्पल परत दुकानात जाईल. असो.
त्यानंतरच्या वर्षी बुट प्रकार अर्थातच बंद झाला. आणि फ़ॉर अ चेंज साधी चप्पल घेतली. तसं बरं चाललं होतं पण या चपलांचा जो समोरचा भाग असतो ना म्हणजे साधारण पावलाच्या मध्यभागी येईल तिथे हळुहळु लाली चढू लागली आणि हुळहुळ चालु झाली. शिवाय शाळेच्या स्कर्टवरच चिखलाचं नक्षीकाम उतरवायला आईला खास काम होतं. म्हणजे आईलाही त्रास.
त्यानंतर मात्र एक वर्ष गमबुट घ्यावे (अजुन असतात का नाही देव जाणॆ) असं मलाच (मनातल्या मनात) वाटत होतं. पण आमच्या शाळेत सगळ्या मुली चपला, सॅंडल अशी मुलींची पादत्राणं घालत असल्यामुळे आपल्याला चिडवतील म्हणून मी त्याबद्द्ल चकार शब्द काढला नाही.
त्यानंतर कधीही माझ्या पावसाळी चपला खरेदीला बाबा आधीच दुकानदाराला हिच्यासाठी न लागणार्‍या चपला द्या असं फ़र्मान सोडत. जसं काय दुकानदार सांगणारच आहे की बाळ या नको घेऊस, तुला लागतील. असो. मग जमाना सॅंडलचा आला आणि हा प्रकारही बघुया म्हणून घेतला गेला. मला आठवतं बाटाची ही डिझाईन काळी आणि मरुन रंगात होती. समोरच्या भागातून अंगठा आणि करंगळी थोडेसे दिसतील आणि वरुन एकमेकांवरुन जाणारे पट्टे मागे जाऊन बंदाच्या जागी वेटोळा होईल असं काहीसं क्रिसक्रॉस. फ़ार छान दिसतात असंही नाही पण याचं मटेरियल एकदम लवचिक. दुकानदार आणि आम्ही सर्व जरा जास्त आशावादी होतो. आणि खरंच सांगते या सॅंडलने मला अजिबात त्रास दिला नाही. पुढच्या वर्षी हीच पुन्हा बाजारात येईल की नाही या भितीने मी पावसाळा संपल्यावर व्यवस्थित माळ्यावर ठेवुन दिली. आणि त्यानंतर तीन पावसाळे मी तोच जोड न दुखणार्‍या पावलाने वापरला. बाटावाल्यांना माझ्या सारख्या लोकांचा फ़िडबॅक मिळाला होता की काय माहित नाही पण बरीच वर्ष ती सॅंडल बाजारात होती. आणि मुख्य म्हणजे खुप पायात ती दिसे पण दुसर्‍या दुखर्‍या धोंडी गळ्यात मारुन घेण्यापेक्षा मी सरळ सत्यवानासारखी सात जन्म तोच पती असल्यासारखी नवी घेतली तरी तीच या प्रकारे वापरली. म्हणजे नंतर नंतर मला स्वतःलाच वाटायचे आपल्याला ओळखणार्‍या व्यक्तींना दर पावसाळ्यात आपण वर्षानुवर्ष एकच चप्पल वापरतोय की काय असं वाटेल.
आणि फ़ायनली एक दिवस ताई मला भर उन्हाळ्यात म्हणाली," बघ मी पार्ल्यात घेतल्यात; या नव्या सॅंडल ऑल सिझन आहेत". माझा पहिला प्रश्न म्हणजे पावसाळ्यात पण चालतील? "अगं, ऑल म्हणजे ऑल"..ग्रेट!...त्यावर्षी एकदाची दुसरी चपल माझ्या पावसाळी आयुष्यात आली. मध्ये कधीतरी फ़्लोट्स नावाने जे काही बाजारात आलं तेही चालुन गेलं. विशेष करुन पावसाळी सहलींसाठी.
आता सध्या पावसाळी काय फ़ॅशन आहेत माहीत नाही. आणि हो आता सर्व खरेदी आपलं शॉपिंग मॉल मध्ये होत असेल ना म्हणजे निवडी एकदम मॉलामॉल असतील. पण हा धागा खास जुन्या त्रासदायक नाहीतर सवयीने पावलांना आपलं म्हणणार्‍या त्या सर्व पावसाळी चपलांसाठी...

Monday, June 22, 2009

फ़ुलोरा... एक होती कोकिळा

मागं लिहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा फ़ुलोरामधुन अजुन एक कविता...उर्फ़ नवबालकविता. सारेगम लिटिल चॅम्प्स नंतर काही अतिउत्साही पालकांनी जर आपल्याही मुलाने गाणी गावीत म्हणून आग्रह चालु केला असेल तर त्यावर उतारा चांगला आहे.आजकाल गाण्यांचा स्टॉक कमी पडतोय आमच्या चिरंजीवांना त्यामुळे सर्व प्रकारच्या कविता वापरुन पाहातोय. या कवितेच्या कवयित्री आहेत सुनीता नागपूरकर.

एक होती कोकिळा
गोड तिचा गळा
पण गायचा करी कंटाळा
खेळाचा लागला तिला लळा ॥
आईला पंसंत पडेना चाळा
म्हणून शिक्षा केली तिला
उंच शेंड्यावर उभी केली
पंखावर चरारुन डाग दिला ॥
मग लागली भोकाड पसरुन रडायला
रडता-रडता म्हणते कशी आईला
लतादिदीच्या घालणार असशील क्लासला
तरच शिकेन मी गायला ॥

Sunday, June 21, 2009

आजचा मोठा दिवस

आज २१ जून म्हणजे शाळेत शिकलेल्या भुगोलातला सर्वात मोठा दिवस. आत्ता ही पोस्ट लिहिताना रात्रीचे सवा नऊ वाजताहेत, घरातली सर्व कामे आटोपलीत, बाळालाही झोपवले आणि लिहायला बसतेय तरी संधीप्रकाशाची शेवटची प्रभा आहे.
इथे आल्यापासून हे दिवसाच्या उजेडाचं महत्त्व इतकं जाणवतय ना...एकदा का डे लाईट सेविंग सुरु झालं, घड्याळ तासाभराने पुढे केलं की हा दिवसाचा प्रकाश वाढतो आणि आजच्या दिवशी तो सर्वात जास्त असतो. म्हणजे पहाटे जवळजवळ पाचापासुन सुरु झालेला दिवस नऊ वाजेपर्यंत मिळतो. कामं करायला, खेळायला, चालायला जायला, थोडक्यात नेहमीच्या सर्व गोष्टी करायला खूप उत्साह असतो. काही तासापुर्वी एका स्नेह्याला विमानतळावर सोडायला जाताना जाणवलं की तो वेस्ट कोस्टला चाललाय म्हणजे आमच्यापेक्षा तीन तासांनी त्यांचं घड्याळ मागे म्हणजे हा तिथे पोहोचणार तेव्हा तिथे नवाच्या आसपास वाजले असतील. याचा अर्थ याच्यासाठी मोठा दिवस जरा जास्तच मोठा वाटेल नाही??
पण तरी आता जसजसा काळोख वाढतोय तसतसं जास्त उदास वाटतंय. उद्यापासून थोडा थोडा करुन हा दिवसाचा उजेड कमी कमी होणार आणि पुन्हा ते अति काळोखाचे दिवस येणार असं आजच का जाणवतय काय माहित?
शाळेत असताना पाठ करायचं म्हणुन केलेला हा दिवस खर्‍या अर्थाने इथे आल्यावरच कळला. भारतात इतकं ते जाणवलं नाही आणि मुख्य म्हणजे हिवाळ्यात साडे चारलाच सुर्यास्त होत असल्यामुळे अंगावर येणारा अंधारही मुंबईत नाही त्यामुळे सर्वात मोठा दिवस काय आणि काय काय सारखंच वाटायचं. आपल्याकडे तर पावसाळी वातावरणामुळे तो तितका जाणवलाही नाही. इथे मात्र २१ जूनला उन्हाळाही ऑफ़िशियली सुरु होतो. म्हणजे खरतर चैतन्य आलं पाहिजे. मला वाटतं सध्या मंदीचं वातावरण आहे म्हणूनही ही उदासिनता असावी. असो..
प्रयत्न करतेय उन्हाळारुपी उर्जा आणण्याचा पण जमत नाहीये. माझिया मनाला, जरा थांबना सांगावसं वाटलं की सध्या तरी ह्या ब्लॉगचाच आधार आहे.

Friday, June 19, 2009

टिकमार्क

पुन्हा एकदा वॉशिंग्टन डि.सी. ला जायचं म्हटल्यावर कोण उत्साह संचारला वगैरे काही नाही. पण भारतातून कुणीही आमच्याकडे आलं की हे चार-पाच माझ्या भाषेत टिकमार्क आहेत तिथे भोज्ज्या करावाच लागतो. मी स्वतः पहिल्यांदा सर्व ठिकाणे पाहायचे तेव्हाचा तो पहिलेपणा आता येणं कठीणच आहे तसं पण असो. तर दोन आठवडयापुर्वीच्या शनिवारी अशी एक डि.सीवारी लागु झाली होती. मला वाटतं नवराही आता थोडा करायचा म्हणून काही टिकमार्क करतो म्हणून यावेळी निघेनिघेस्तोवरच जवळ जवळ अकरा वाजले. म्हणजे जरी वट्ट दोन तासात पोहोचलो तरी साडे-पाचला तिथली म्युझियम्स बंद होतात म्हटल्यावर साडे-चार तासात दोन महत्त्वाची तरी पाहुया आणि बाकी ड्राइव्ह थ्रू असा होरा होता.
आता दुपारच्या वेळेला खायची विश्रांती तर हवीच ना? मग काय पोहोचायलाच जवळ जवळ दोन वाजले. आणि भरीस भर म्हणुन पार्किंगची एखादीही जागा सापडेना. घारीसारख्या दोन-तीन घिरट्या घातल्यावर मात्र मी नवर्‍याला म्हटले की आम्हाला रस्त्यात सोड. आम्ही एखाद्या म्युझियम मध्ये सुरु करतो आणि तू गाडी लावुन तिथे आम्हाला भेट. नॅचरल हिस्टरी हे एक आणि नॅशनल एरॉनॉटिक्स ही आवर्जुन पाहण्यासारखी म्युझियम आहेत म्हणून त्यातल्या पहिल्यात आम्ही जाऊ असे सांगुन एका सिग्नलला मी, माझी नणंद आणि मुलगा विथ स्ट्रोलर असा छोटा लवाजमा उतरलो. अशा प्रकारे मध्येच ऊतरण्याचा मुख्य उद्देश माझ्या बाळाने मधल्या वेळेत जे काम तमाम करुन ठेवले होते ते निस्तरण्याचा होता. आधी कधी एकदा तो डायपर बदलुन घेते असं झालं होतं.
आता या भागात इतक्यांदा आलो आहोत की चुकुच शकत नाही असा जो काय एक अति आत्मविश्वास होता ना तो उतरल्या उतरल्याच जरा ढेपाळला. नेमकं त्या विभागाचा नकाशाही घेतला नव्हता जो खरंतर तिथं अगदी सहज मिळतो. डोक्यात सारखं डायपरचं चालु होतं त्या गडबडीत रस्त्यातल्या मार्गदर्शक नकाशावर साधारण म्युझियम कुठे आहे ते पाहिलं आणि रस्ता क्रॉस केला.
पहिल्याच इंटरसेक्शनला आत जाणार्‍यांची गर्दी पाहुन झटकन नाव पाहिले आणि आत जाण्यासाठी वळलो. आत शिरता शिरता नवर्‍यालाही फ़ोनवर सांगितले की बरोबर जातोय फ़क्त मागच्या बाजुने शिरतोय म्हणून. सर्वात पहिलं डायपर बदलण्याचं काम करुन पुन्हा एकदा नवर्‍याला तिथेच आतमध्ये एका बाकावर बसून फ़ोन केला. तो म्हणतोय मीही आत शिरतोय म्हणून आमचं थांबण्याचं ठिकाण सांगून वाट पाहायला लागले. थोड्या वेळाने त्याचा पुन्हा फ़ोन मला तुम्ही सापडत नाही आहात तू पुढच्या भागात नाहीतर कॅफ़ेमध्ये येशील का? मला कॅफ़े जास्त सोपं वाटलं म्हणून आम्ही तिथे निघालो.
उन्हाळ्यातल्या शनिवार-रविवारी इथल्या म्युझिअममध्ये एकावेळी निदान दोनेक हजार लोकं असतील. त्यातून स्ट्रोलर घेऊन किती ठरवलं तरी पटापट फ़िरता येत नाही. सगळीकडे फ़िरता जिना असतो त्याचाही वापर करता येत नाही. कुठे फ़टी कोपर्‍यात लिफ़्ट असेल तीच शोधावी लागते. आणि ही लिफ़्ट इतकी स्लो होती की हवी तिथे लवकर येतही नव्हती. तशा परिस्थितीत तळाला कॅफ़े होता तिथे गेलो तर साहेबांचा कुठे पत्ता नाही. तिथे मोबाइललाही लिंक नाही. वाट पाहुन कंटाळलो तर परत वर जायला लिफ़्टचाही पत्ता नाही. ती आपली सारखी वरच्या वर फ़ेर्‍या करत होती. शेवटी मी एकटीने एस्कलेटरने वर जाऊन त्याला शोधावे असे ठरले.
वर गेले तर मागच्या बाजुने पुढच्या बाजुला जायचा रस्ताच मिळेना. आणि चक्क त्या मजल्यावरही फ़ोनला लिंक येईना. आधी फ़ोन ज्या जागी केला होता तिथे परत जाऊन पाहिले तर तिथली लिंकही गायब?? घडयाळाचा काटा जसजसा पुढे जात होता तसतसा माझा संयम संपत होता. शेवटी मी परत खाली जाऊन माझ्या नंणंदेला म्हटलं याचा तर काही पत्ता नाही, फ़ोनही लागत नाहीये. आपण असं करुया आपणच एकट्याने पाहायला सुरुवात करुया आणि मध्ये फ़ोन लागला की भेटही होईल. चला आता कंटाळल्या मनाने मी पाहायला सुरुवात केली. एक दोन दालनांसाठी मोठ्या रांगा होत्या तिथुन चक्क पुढच्या माळ्यावर असं करता मला काही काही दालनं एकदम नवीन वाटु लागली. एका ठिकाणी ओबामा राष्ट्रपती झाले त्याचे फ़ोटो माहिती असं सर्व होतं. नेहमी इथे माहिती बदलतात वाटतं हा विचार करता करता माझी एकदम ट्युब पेटली. मी अमेरिकन नॅशनल हिस्टरी मध्ये घुसले होते आणि नवरा बरोबर नॅचरल हिस्टरीमध्ये आम्हाला शोधत होता.
आता काय...मग उगाच म्हटलं आपण बाहेर जाउन लिंक येईल तिथे फ़ोन करुन भेटु आणि मग उरलेलं डि.सी. पाहु. नाहीतरी इथे गर्दीपण आहे.
हुश्श. बाहेर येऊन इमानदारीत नवर्‍याला कळवलं आहेस तिथुन ह्या ह्या रस्त्यावर ये आणि मग आपण एकत्र फ़िरु. तो आल्यावर त्यालाही कळलं गोंधळ पण बिचारा जास्त तक्रार न करता फ़क्त आज म्युझियम साडे सात पर्यंत चालु आहेत ही बातमी देऊन पुन्हा आम्ही आमचा टिक मार्क आपलं ते...प्रेक्षणीय स्थळे पाहायला लागलो....

Sunday, June 14, 2009

अलास्काच्या जंगलातून

गेले काही दिवस डिस्कव्हरीवर "आउट ऑफ़ द वाइल्ड" सिरीज पाहताना कळलंच नाही की किती गुंतत गेलेय त्यात ते. आज त्याचा शेवटचा भाग पाहिला आणि त्यात भाग घेऊन यशस्वीरित्या जंगलाबाहेर आलेल्या चार जणांसाठी नकळत डोळ्यातून पाणी आलं.
सध्या कुठलेच कार्यक्रम तसे वेळच्या वेळी पाहिले जात नाहीत. पण डी.व्ही.आर.प्रणालीचे विशेष आभार की त्यामुळे आपल्या आवडीचा कार्यक्रम रेकॉर्डिंगसाठी ठेवला की प्रत्येक वेळी त्याचे एपिसोड त्यात राहतात आणि निवांत पाहता येतात. तर या रविवारी शेवटचा भाग पाहुन झाला. डिस्कव्हरीचे कार्यक्रम म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असते. हा नेहमीपेक्षा हटके आवडलेला म्हणून खास ही पोस्ट.

अलास्कामधील जंगलात नऊ वेगवेगळ्या क्षेत्रातील अमेरिकेत राहणार्‍या माणसांना एक मोठं पाठीवर बोचकं ज्यात थंडीपासून सामना होईल असं आणि इतर थोडं सामान व नकाशा देऊन निसर्गाचा सामना करायला पाठवलयं. त्यांच्या मार्गावर काही विश्रामगृहं आहेत ज्यात जुजबी सामान असेल आणि जर त्यांना या प्रवासातून बाहेर पडायचं असेल तर प्रत्येकाकडे एक जी.पी.एस. आहे त्याचं बटण दाबलं की थोड्याच वेळात एक हेलिकॉप्टर येऊन त्यांची सुटका करेल. थोडक्यात एक प्रकारचा रिऍलिटी शो. पण हा प्रवास जो शेवटपर्यंत पुर्ण करील त्याला बक्षीस वगैरे नाही...हा प्रवास करायला मिळणं हेच त्यांचं बक्षीस. .

या समुहाला अलास्काच्या जंगलात एका अज्ञात ठिकाणी सोडण्यात आलं. आता इथून कशा प्रकारे शहरात परत येता येईल याचा एक नकाशा ज्यात काही थांबे खास तयार केले होते त्याच्याकडे एकत्र कुच करणं नाहीतर वर सांगितल्याप्रमाणे सुटका एवढंच त्यांच्या हाती. अगदी आदिमानव नाही पण ज्याला आपण किमान वस्तु असताना जगणं म्हणतो तसं. जंगलातुन सारखं चालणे, हाय एलेव्हेशनला चढणे आणि दिवसभरची कामं यासाठी अंदाजे ४५०० कॅलरीची गरज पण वेळप्रसंगी एक खार चारजणांमध्ये ही लोकं खातात.
अलास्कामधलं सतत खाली जाणारं तापमान आणि दिवसाचा प्रकाश कमी व्हायच्या आधी मुक्कामाचं ठिकाण आणि खाणं शोधण्याची गरज इतकं महत्त्वाचं की पाहता पाहता आपणही कधी त्यांच्या खाण्याची अन झोपण्याची काळजी करु लागलो कळलं नाही.
हा प्रवास सुरु करण्याच्या आधी या सहभागी लोकांचं एक छोटं सर्व्हायवल ट्रेनिंग झालं होतं ज्यात त्यांना नदी ओलांडणे, शिकार आणि प्राण्यांची कातडी सोलणे, सर्व सामान एकत्र करुन त्याची सॅक सारखी घडी करणे इ. शिकवलं होतं. पण मुख्य मानसिक तोल जो शेवटी स्वतःच सांभाळायला लागतो त्याच्याशी सामना करता न आल्यामुळे काही लोकं हळुहळु गळायला लागले. एकदोन जण अति श्रमाने दमुनही कंटाळले. त्यात एक तर पोलिसाची नोकरी करणारा होता. पण एकवेळ अशी आली की त्याला दमुन चक्कर आल्यासारखे व्हायला लागले आणि शेवटी त्याने हेलिकॉप्टरला बोलावले.
एक एक जण गळाला की बाकीच्यांना मग सुरुवातीला प्रश्न पडे कारण प्रत्येकजण अंदाजे साठेक पौंड सामान वाहात असे आता या मध्येच गळालेल्या व्यक्तीमुळे मग आता काय कमी करायचं याची चिंता. काही काही निवासाच्या ठिकाणी मग यांनी कधी भांडी कधी दुर्बिण असं जडपैकी सामान कमी केले.
प्रत्येक थांबा यांना रस्ता शोधुन वेळेत पोहोचलेत असं नेहमीच झालं नाही. एका ठिकाणी अंगावर अक्षरश: जाडं प्लॅस्टिक त्यात सामान बांधुन त्याची सुरळी आणि त्याला पाठिवर अडकवायला सॅकसारखं करत तेच पांघरुन उपाशी झोपण्याची वेळही आली आणि त्याच अवस्थेत बाहेर बर्फ़ाचं वादळ चालु. काही निवासाची ठिकाणं आधी राहाण्यालायक करावी लागत. कुठे धुराची चिमणी नीट करा किंवा शेल्टर लावा. मुख्य म्हणजे आसपास जे काही मिळेल ते शिकार करुन खा. एका ठिकाणी प्रत्येकाला झोपायला वेगळी गादी व पांघरायला चादरी आणि जीवघेण्या थंडीपासुन बचाव म्हणुन थोडी दारू होती तर सर्वांनी काय जल्लोश केला होता!
पंचवीस वगैरे दिवसांनी फ़क्त पाचजण राहिले ज्यात एक तरुण वकिल मुलगी जी वंशाने एशियन होती (बहुधा जॅपनीज), एक घोड्यांना शिक्षण देणारा, एक पर्सनल ट्रेनर तरुणी, एक स्कुलबस ड्रायव्हर बाई आणि एक हाउसिंग धंद्यातला तरुण. ही सर्व एकमेकांना धरुन चांगलं चाललं होतं. कुणी एखाद्या दिवशी शिकार करत, पुष्कळदा ती जॅपनीज प्राणी सोलणे आणि त्यात इतर काही म्हणजे सुके वाटाणे इ. भिजवून घालुन त्याच एकाच मोठ्या भांड्यात सुप बनवी म्हणजे ते सर्वांना थोडं थोडं करुन पुरवता येई. होता होता त्यांना एके दिवशी ओव्हरहेड वायर आणि काही प्रायव्हेट केबिन्स (जंगलात तात्पुरतं राहायची लाकडी घरं) दिसली म्हणजे आता आपण शहराच्या आसपास असु असं त्यांना वाटलं. पण त्यारात्री त्यांना राहण्याचा जो थांबा दिला होता तो म्हणजे नुस्त तंबुचा सांगाडा आणि त्याला लावायचा कपडा खाली सरकवुन ठेवला होता. ह्यांनी तो लावुन कसाबसा तो तंबु उभा केला पण त्याच रात्री भरपुर बर्फ़ झाला.. आणि सकाळी अचानक त्या जॅपनीजने सुटकेचा मार्ग स्विकारला. मला तर पाहाताना त्यांच्यातलीच एक असल्यासारखं दुःख झालं..

पण अर्थात बाकीच्यांचा होसला कायम होता. मजल दरमजल करत ते एका रेल्वे ट्रॅकपाशी पोहोचतात. त्यांना ट्रॅकवर बर्फ़ दिसत नाही म्हणजे ट्रेन येईल या भरवशावर ते तिथंच थांबायचं ठरवतात.
खर तर अलास्कामध्ये काही काही ठिकाणी आठवड्यात आणि बर्फ़ात महिन्यात एकदा अशीपण ट्रेन सर्विस असु शकते. पण आदल्या रात्रीच्या तंबुप्रकरणामुळे पोटात अन्नाचा कण नाही संपुर्ण चालुन शहरात पोहोचु शकु माहित नाही म्हणुन अगदी लहान मुलांसारखे ते त्या ट्रॅकवर पाहारा करत राहतात. ट्रेन आपल्यासाठी थांबावी म्हणुन एकजण तिचा पांढरा शर्ट काढुन दुसर्याचे कपडे घालुन त्या पांढर्या शर्टाचा बावटा करुन एका काठीला लटकवुन ठेवतात. शेवटी संध्याकाळी तिथे एक ट्रेन येते आणि ती त्यांच्यासाठी थांबतेआता हे पुढे काय दाखवणार याचा विचार करत असताच जेव्हा ते पहिल्या स्टेशनपाशी पोहोचतात तेव्हा चक्क त्यांचे नातेवाईक खास त्यांच्या स्वागतासाठी उभे असतात. त्यांच्या बरोबर मलाही भरुन आलेलं असतं की हा खडतर प्रवास या चारांनी तडिस नेला.

Monday, June 8, 2009

ग्रॅज्युएशन





जून महिना आला की अमेरिकेत ग्रॅज्युएशन पार्ट्यांचं पेव फ़ुटतं. कुणाही भारतीयाला वाटेल की जिथं आपल्याइथली मुलं अमेरिकेत शिकायला जायला मरतात तर साहजिक आहे तिथं वर्षाखेरीस मुलं पदव्या मिळवणारच...पण एक मिनिट... असं काही वाटलं असेल तर ते काढुन टाका. जसं मी मागे ग्रॅंड ओपनिंगच्या बाबतीत म्हटलं होतं तसच आहे ह्याही शब्दाचं. म्हणजे तुम्ही आपले मारे ज्या कुणाच्या ग्रॅज्युएशन पार्टीला जालं ते कार्ट आत्ताच शेंबुड पुसून पहिलीत गेलं असेल...म्हणजे आपलं किंडरगार्टन ग्रॅज्युएशन हो...आलं ना लक्षात? जिथे बालवाडीपासून मुलं ग्रॅज्युएट होतात तिथं एलिमेन्ट्री स्कुलचं ग्रॅज्युएशन म्हणजे एखादी हौशी शिक्षिका कागदी टोप्या बनवुन काय त्यांच्या डोक्यावर ठेवेल आणि पालक मग शाळेत त्या समारंभासाठी हजेरी काय लावतील...माझा नवरा म्हणतो बाई हे फ़ारिन आहे फ़ारिन...:)
अगदी पहिल्यांदा एका मैत्रीणीकडून हा नवा शब्दार्थ कळला ना तेव्हा फ़ारच मजा वाटली होती. आता माझ्या आईला पण जास्त स्पष्ट करुन सांगावं लागत नाही. मागच्या वर्षी ती इथे होती त्यावेळी ऐकुन ऐकुन तिलाही व्यवस्थित कळायला लागलय.


या दिवसांत इथे काय दृश्यं पाहायला मिळतील सांगता येत नाही. येता जाता अमुक तमुकच्या ग्रॅज्युएट्स्चे अभिनंदन ही पाटी तर जळी-स्थळी असतेच. पण काही घरांबाहेर GRADS लिहिलेला हेलियमचा फ़ुगा कुठे लटकताना दिसला की समजा संध्याकाळी घरीपण पार्टी आहे किंवा किमानपक्षी मुलगा शाळेतुन ग्रॅज्युएट होऊन घरी तरी येतोय. गाडीच्या मागच्या बाजुला विद्यार्थ्याचे नाव आणि अभिनंदन लिहिलेलं वाचावं तर आतमध्ये ती काळी टोपी घालुन सजलेला ग्रॅज्युएटपण दर्शन देईल. त्यादिवशी तर चक्क पार्किंग लॉटमध्ये एक बया ती टोपी डोक्यावर ठेऊन तशीच भटकत होती. बरं चेहरा पाहुन वाटत नव्हतं हे कॉलेज पुर्ण झालेलं वय असेल.

गम्मत आहे नं इथल्या मुलांची? अगदी बालवाडी पास होऊन गेल्याचा पराक्रम पण शाळा, घरी, शेजारी साजरा करतात. त्या निमित्ताने तरी त्यांना पुढे जाऊन ड्रॉप आउट व्हायची उपरती होऊ नये याची खबरदारी घेतात का असं मला आपलं वाटतं कारण इथं ते प्रमाणही बरचं आहे. मास्टर्सला तर जास्तीत जास्त भारत, चीन अशी इतर देशांतलीच मुलं असतात. कधी कधी हे सर्व पाहताना मला आपण (हुशार असुन) मात्र बिचारे वाटुन जातो. लहानपणी जेव्हा मुलं हुशार असतात तेव्हा कधी असं ग्रॅज्युएशन साजरं केलं नसतं आणि मोठेपणी त्या जीवघेण्या स्पर्धेत सर्वच जण तेवढा प्रकाश पाडू शकले नाही तर तेव्हाही नाही. इथे एक परिक्षा दिली की लगेच फ़क्त दुसरीचा अभ्यास समोर. फ़ायनल झाली तरी सी.ई.टी. ची टांगती तलवार आहेच. बापडे नुसते. असो. इतक्यात एका ग्रॅज्युएशन पार्टीला जायचा योग आला. त्या मुलाला शाळेत एक स्पेशल अवॉर्ड असतं तेही मिळालं होतं म्हणून त्याच्या पालकांनी त्याला खास चकित करण्यासाठी अचानक पार्टी ठेवली होती. त्याची आजपर्यंतची सर्व अचिव्हमेन्ट्स, फ़ोटो इ. लावून छान सजवलं होतं. त्याच्यासाठी ग्रॅज्युएशनची थीम असलेला खास केक त्याचं नाव लिहुन आणला होता. त्याच्या आवडीचा मेनु. मग त्याच्याबद्दलचं आई-बाबांनी केलेलं छोटं भाषण ऐकलं आणि नकळत मलाही त्याचा हेवा वाटून गेला.

Friday, June 5, 2009

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा

ही पोस्ट जाईल तोपर्यंत भारतात पेपरमधले रकानेच्या रकाने भरुन पर्यावरण दिनानिमित्ते गळे काढून तो दीन झाला असेल. पण राहावत नाही म्हणून माझीच वसुंधरा दिनाची फ़ार जुनी नं झालेली पोस्ट वाचा ही कळकळीची विनंती.
आणि या पोस्टमध्ये फ़क्त माझ्या एका मैत्रीणीने फ़ार समर्पक चित्र पाठवलंय ते पाहुन काय ते ठरवा. बाकी आपण कसा साजरा करता पर्यावरण दिन?




Wednesday, June 3, 2009

आधुनिक अभिमन्यु

एखादा दोन वर्षांचा मुलगा उत्कृष्ट पूल खेळु शकतो यावर विश्वास बसणार नाही ना? पण न्युयॉर्कमध्ये राहणारा डायपरमधला किथ (ज्यु.) ओ’डेल या मुलाचा बातम्यामधला व्हिडिओ पाहुन नक्की पटेल. म्हणजे फ़क्त स्टिक हातात धरुन मटका शॉट नाही तर सांगितल्या रंगाचा चेंडुच फ़क्त पॉकेटमध्ये टाकण्याची करामतही करुन दाखवतो हा चिमुरडा. आपल्या बाबांना घरच्या पूलटेबलला खेळताना पाहुन शिकला म्हणायच तर दोन वर्षात किती खेळ इतका पाहणार सांगा ना? मला तर हा आधुनिक अभिमन्युचा अवतार वाटतो. म्हणजे हा पोटात असल्यापास्नं त्याची आईतर नक्कीच पाहात असेल ना बाबांना खेळताना?
ख्रिसमसाठी बक्षीस म्हणून याच्या पालकांनी त्याला छोट्या मुलांसाठी मिळणारं चाईल्ड साइज टेबल दिलं. त्याच्या बाबांच्या भाषेत सांगायचं तर त्याने मारलेला पहिलाच स्ट्रोक पाहताना विश्वास बसत नव्हता. आता स्वारी झटकन मोठ्यासाठीच्या टेबलपर्यंत पोहोचलीही (अर्थात खुर्चीवर उभं राहुन). शिवाय पूलच्या निमित्ताने त्याला रंग ओळखता येणं आणि थोडीफ़ार आकडेमोडही जमतेय. सही आहे ना?
अमेरिकन पूल असोसिएशनचा हा सर्वात लहान सदस्य आहे. आता पूल खेळायला बाहेर जाताना सर्वात कठीण गोष्ट त्याच्यासाठी फ़क्त त्या जागी पोहोचणं असतं.अहो असं काय करता? कार सीट मध्ये कुणीतरी बसवून सोडायला तर हवं ना?


किथाचे व्हिडिओ http://www.poolprodigy.com/इथे आहेत.