Tuesday, January 29, 2019

सात माळ्यांची कहाणी - पाचवा माळा

या ज्या इमारतीचं मी गेले चार माळे वर्णन करतेय त्यातल्या सर्वात महत्त्वाचा माळा म्हणजे पाचवा माळा. का हे वेगळं सांगायला हवंच का? अस्मादिकांचं मुंबईतलं घर पाचव्या माळ्यावर आहे. पण अर्थात तेच काही महत्वाचं कारण नाही. असंही साऊथ मुंबईमध्ये टॉवर संस्कृती यायच्या आधीही चार माळ्याच्या (बिना लिफ्टवाल्या) इमारती होत्या.थोड्या फार इथे उपनगरातही असाव्यात. पण इमारतींची उंची वाढली ती पाच माळे आणि त्यापुढून म्हणजे खऱ्या अर्थी टॉवर ही व्याख्या पाच माळ्यांच्या पुढे सुरु होते. 

तर अशा या महत्वाच्या मजल्यावर आमचं घर आणि आणखी दोन घरं आहेत. इथे जरा सर्वधर्मसमभावाचं वातावरण आहे. आमच्या शेजारी राहतात ते मराठीच कुटुंब शेणवे म्हणून आणि लिफ्टकडचे दोन फ्लॅट्स एकत्र करून तिथे मिसेस डिकॉस्टा आपला नवरा आणि तीन मुलं यांच्याबरोबर राहतात. 

मी म्हटलं तर फक्त व्हिसीटींग फॅकल्टी त्यामुळे मला या शेजाऱ्यांनी ओळखायचं काही काम नाही. शेणवे बाई अगदी तस्सच माझ्याशी वागतात. लिफ्टच्या उजव्या बाजूच्या घरात त्या राहतात आणि त्यांना एक गोजिरवाणी मुलगी आहे पण बिलकुल हास्य नाही. एकदा मी शनिवारी बाहेर पडताना स्वतः हसून काही बोलायचा प्रयत्न केला तर फक्त "आज विकेंड" म्हणजे काय ते आपण अर्थ काढा असं काहीसं. तर ते असो. त्या कुठेतरी नोकरी करतात आणि त्यांचा नवरा आयटीत आहे ही आईने दिलेली मौल्यवान माहिती. 

पण समोरचं डिकॉस्टा कुटुंब तसं त्यामानाने चांगलं. केव्हातरी आई आजारी होती म्हणून मी एकटीच गेले होते तेव्हा माझ्याशी खास ओळख करून तब्येतीची चौकशी केली. नंतर एका रेस्टॉरंटबाहेरच्या दाबेली स्टॉलकडे आंटी दिसल्या तेव्हा त्यांच्याबरोबर मुलगा होता त्याच्याशी ओळख करून दिली. केव्हातरी ते अंकलपण लिफ्टमध्ये भेटले की मुलांची चौकशी. मुलांना घेऊन गेले तेव्हा त्यांचं कौतुक वगैरे केलं. 
नेमके काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे रात्री मोठया आवाजात गाणी आणि दुसऱ्या दिवशी बाहेर कचऱ्यात ठेवलेल्या बाटल्यांचे थर पाहून मी लिफ्टमध्ये अंकलना विचारलं "काय मोठी पार्टी की काय?" त्यावर अंकलनी मला सांगितलं "माझ्या मुलांच्या गर्लफ्रेंड्सबरोबर त्यांना पार्टी करायची होती. मी म्हटलं की काय ते घरीच करा. आपली मुलं कुठे बाहेर जाऊन काही भलत्या बातम्या यायच्या ऐवजी मला वाटलं आपलं इतकं मोठं घर आहे ते केव्हा कामाला येणार?" मलाही त्यांचं म्हणणं पटलं. 

आता राहिलं माझं घर. कोणे एकेकाळी इन्व्हेस्टरचा असलेला हा फ्लॅट मी मुंबईत माझं घर असावं म्हणून घेतला आणि मग अनेकांनी भरीस घातल्यामुळे भाड्याने दिला. दोन-तीन वेळा भाडेकरू बदलून आणि घराची यथेच्छ वाट लावून घेतल्यावर काही इतर घरगुती अडचणींमुळे थोडं काम करून मग रिकामीच ठेवला. काही वर्षांपूर्वी मग थोडं बेसिक फर्निचर करून आईबाबांना इथेच राहा म्हणून सांगितलं. घर राहतं राहतं आणि मी जाते तेव्हा मलाही राहायला मिळतं. या घराशी माझं वेगळं नातं आहे. माझी पहिली सरप्राईज ट्रीप मी याची चावी माझ्याकडे होती त्यामुळे करू शकले. घरात कुणीच नव्हतं आणि बॅग्ज तिथे ठेऊन मग आई आणि ताईकडे मी गेले होते. एकटीने तिथून तीनेक आठवडे काम करून आईच्या एका शस्त्रक्रियेच्यासाठी मी थांबूही शकले. एकदा माझी एक कोल्हापूरची मैत्रीण मला भेटायला आणि थोडीफार मुंबई भटकंती (आणि मुख्य शॉपिंग) साठी आली होती तेव्हा एक विकेंड आम्ही दोघीच मस्त राहिलो आणि भटकलो. अजूनही कधी एकटीने राहायची वेळ आली तर माझी पहिली पसंती पाचव्या माळ्यावरच्या माझ्या घरालाच असेल. 

माझ्याकडे मदतीला येणाऱ्या दोन्ही तायांना मी सांगितलं आहे या घरात आई-बाबा असो वा नसो मी आले की तुम्हीच माझ्यासाठी यायला हवं आणि सध्या तरी त्यांनी ते मान्यही केलं आहे. माझं घर तसं इमारतीच्या मागच्या भागात येत त्यामुळं मुख्य रस्त्याची वर्दळ मला पाहायला मिळत नाही पण मुलं खाली खेळत असतील तर ते वरून दिसतं. तसही हा घरांना बाल्कनी नाही आहे त्यामुळे बाहेर जायचा फील नाही. ही एक तक्रार सोडली तर माझं घर मला फार आवडतं. 

या माळ्यावर एक खडूस आणि एक नॉर्मल कुटुंब आणि एक आमचं, अर्थात कसं ते स्वतःच काय सांगणार अशी त्रिकूट राहतो. पण या माळ्यावर मी ती एक पार्टी सोडली तर कुणाचाच आवाज वाढलेला कधी ऐकला नाही. एकच लहान मुलगी आणि ती बहुतेक आईबरोबर राहणारी असल्यामुळे तोही आवाज नाही. अशा शांत माळ्यावर राहायला कुणाला आवडणार नाही? 

 
#AparnA #FollowMe

No comments:

Post a Comment

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.