Saturday, January 12, 2019

सात माळ्यांची कहाणी - चौथा माळा

चौथा माळा म्हणजे, ज्यांनी ऑफिशियली लिफ्ट वापरली पाहिजे त्याची सुरुवात करणारा माळा. खरं तर तिसऱ्या माळ्याने तो मान मागायचा प्रयत्न केला होता पण चढउतारापेक्षा चढताना खरं दमायला होतं ते चौथ्या माळ्यालाच. त्यामुळे हा माळा यासाठी निवडला गेला तर नवल वाटायला नको. 

चौथ्या माळ्यावरच्या लोकांनाही या गोष्टीची जाणीव का अभिमान इतका की कुठेही लिफ्टमध्ये गेले की पहिले चार आकडाच दाबतील. माझी एक मावसबहीण तिच्या इमारतीत चौथ्या माळ्यावर राहते. ती आमच्याकडे पाचव्या माळ्यावरून खाली जाताना आधी चार आणि मग ग्राउंड दाबते. सवय आणि काय? :)

इतर माळ्यावर चार घरे असताना चौथ्या माळ्यावर लिफ्टजवळचे दोन फ्लॅट जोडल्यामुळे तशी तीनच बिऱ्हाड आहेत. यात चढताना जिन्यासमोरचं घर एका विक्षिप्त माणसाचं आहे असं मला वाटतं . विक्षिप्त अशासाठी की बरेचदा मी यांना लिफ्टमध्ये वर जाताना इतरांना उगाच "टुकटुक" करून जाताना पाहिलं आहे. 

एकदा मी लिफ्टमध्ये बहिणीबरोबर वर जात होते तर हा विक्षिप्त माणूस आला. मग वर जायच्या आधी उगाच दार उघडून मागून येणाऱ्या कुणालातरी "तुम्ही थांबा आता" म्हणून मग लिफ्ट वर नेली. लिफ्टमध्ये एकावेळी तीनच व्यक्ती जाऊ शकतात हा नियम आहे पण त्यासाठी अशाप्रकारे कुणालातरी खास सांगण्यासाठी लिफ्ट थांबवणे मला तरी विक्षिप्तपणाचे वाटते. 

उतरताना जिन्याजवळचं घर बाहेरुन पाहण्यासारखं इमारतीतलं एकमेव घर आहे असं म्हणायला हरकत नाही. हे घर एका कलाकाराचं आहे हे कळण्यासारखा बाहेरचा लाकडी सुबक दरवाजा. उजवीकडे लाकडी घनता आहे. जिला अतिशय सुरेख लाकडी लोलक असलेली दोरी आहे. या सर्वांपेक्षा सुरेख त्यांच्या आडनावाची पाटी  आहे. इथे चव्हाण कुटुंबीय राहतात. त्यांची मुलगी राधा आर्कीटेक्चर आहे. ही  पाटी तिनेच केली आहे. तिची आई मंत्रालयात मोठ्या पदावर आहे. त्या घरात असल्या की संध्याकाळी विशेषतः रात्री, त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच असतो. त्यांतून मिसेस चव्हाणांचा मोठा आवाज आणि टीव्ही सिरीयलचा आवाज आणि काही वेळा घरी आलेल्या पाहुण्यांचा आवाज अशी आवाजांची स्पर्धा सुरु असते. एकदा मी भारतात मुक्कामाला असताना या घरातून मला पुरणपोळी आणि मटणाचा नैवेद्य मिळाल्यामुळे मी या घरच्या कुठल्याच आवाजाची तक्रार करत नाही. या घराच्या बरोबर वर माझं छोटं घर आहे हे आणि राधानं माझ्या अमेरिकेच्या घरची आडनावाची पाटी बनवली आहे, हे सांगायचं राहिलं. आमची पाटी तिच्या घरापेक्षा छान झाली आहे असं मला वाटतं. त्यानंतर तिने माझ्या वरच्या घराची पण पाटी बनवावी अशी माझी इच्छा होती. पण तो योग अजून आला नाही आहे. 

लिफ्टच्या उजव्या बाजूला जोडलेले दोन फ्लॅट्स हे या इमारतीमधील पहिले जोडलेले फ्लॅट्स. या घरात एक दोन भावांचं एकत्र कुटुंब राहतं. "बहिणी-बहिणी, जावा-जावा" आईने पुरवलेली जादाची माहिती. मी या घरातून जा-ये  पाहिली नाही म्हणजे शांत कुटुंब असणार असं माझं गृहीतक. तसंही आजकालच्या जमान्यात कोण एकत्र कुटुंबात राहातं? ते तसं राहतात यातच बरंच काही आलं. माझ्या दोन मावश्या पैकी एक सख्खी जोडी आणि दुसऱ्या आईच्या मामेबहिणी याही जावा-जावा आहेत. पण मुलं मोठी झाल्यावर जागा पुरत नाही या कारणाखाली का होईना, वेगळी चूल मांडलीच. या पार्श्वभूमीवर मला या बिऱ्हाडाचं कौतुक वाटतं. 

या घरात मुलं असायला हरकत नाही. पण मी जाते तेव्हा शाळा सुरु असतात. त्यामुळे हीच काय इतर माळ्यावरची मुलंही विरळाच दिसतात. त्यामुळे खरं चौथा माल शांततेत गणला जायला हवा होता. 

पण आधी म्हटलं तसं हस्की आवाजातल्या चव्हाण बाईंचा आवाज, तसंच त्यांच्या रात्री मोठ्या होणाऱ्या टीव्हीचा आवाज आणि त्यांच्याकडे पूजा किंवा इतर निमित्ताने होणारी पाहुण्यांची रेलचेल या कारणांमुळे तसा एकंदरीत जागृत असा हा चौथा माळा. 

#AparnA #FollowMe

No comments:

Post a Comment

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.