Thursday, November 22, 2018

सात माळ्यांची कहाणी - तिसरा माळा

"जो जो वर जावे तो तो हवा थंड होत जाते", या थंड हवेला वेळ असतो; पण "हलणाऱ्या हवेला वारा म्हणतात", इतपत वारा लागावा असा हा तिसरा माळा. 

या माळ्यावर पूर्व-पश्चिमेला दरवाजा म्हणजे जिना चढून आलं तर समोरचंच घर. या घरात सावेकाका राहतात. खरं तर त्यांना मी आईशी बोलताना "उघडा माणूस" म्हणूनच संबोधायचे/ पण नंतर मलाच विचित्र वाटलं म्हणून झाली फ्लॅट क्रमांक पाहून आडनाव बघून ठेवलं. तर या फ्लॅटचं वैशिष्ट्य म्हणजे दरवाजा आणि सावेकाका कायम उघडे. नशीब आजकालच्या काळात मोठ्या दरवाज्याबाहेर एक जाळीचा दरवाजा असतो ते. पण त्या जाळीतूनही दिसेल, असे खुर्चीवर ते उघड्याने कायम बसलेले असतात. त्यांची कचऱ्याची टोपली बाहेर असते. तिच्यात कचरा टाकणे किंवा पेपर आत घेणे अशी कामे जाळीचा दरवाजा उघडून करताना निदान जाळीचा बनियन तरी घालावा? पण नाही. यांना सतत गरम होत असणार. तरी नशीब तिसरा माळा आहे. दार उघडल्यावर तरी वारा वाहतो. 

चाळीतून ब्लॉक आणि ब्लॉकमधून मग टॉवर अशी संक्रमणं होताना आपल्या अंगावर जाळीचं बनियनही न चढू देणाऱ्या सावेकाकांचं कौतुक करावं का राग हेही नीट कळत नाही. 

तिसऱ्या माळ्यावर सावेकाकांचं इतकं प्रस्थ की इतर बिऱ्हाड नसल्यातच जमा असं आपल्याला वाटावं. पण असं नाही. त्यांच्या बरोबर शेजारी कोण राहतं हे महत्वाचं नाही तर प्रसंग महत्वाचा. सावेनी उघड्या अंगाने दार उघडलं की या घरचा दरवाजा आतमध्ये उघडून खाड्कन पुन्हा लावला जातो. तसं पाहिलं तर हे घर त्यांच्या बाजूला म्हणावं तरी मध्ये एकमेकांचे दरवाजे दिसणार नाहीत असा भिंतीचा पुढे आलेला भाग आहे. पण हा दरवाजा आपटायचा प्रसंग मी तीन-चारदा तरी अनुभवला आहे आणि मला हे कोडं उलगडलं नाही. म्हणजे, तिकडे सावेकाकांनी खुर्ची सरकवून दरवाजा उघडणे आणि या घरातल्या "त्या"  व्यक्तीला त्याची चाहूल लागणे. काय योगायोग? पण मी म्हणते अशी दरवाजाची हानी करण्यापेक्षा त्यांना एखादा भोकवाला बनियन द्यावा पाठवून. कसे? 

ही दोन बिऱ्हाडं अशी. उरल्या दोन फ्लॅट्स मध्ये कोण राहतं असं ठळक पाहिलं नाही. चढून आल्यावर डावीकडे म्हणजे लिफ्ट जवळच्या दुसऱ्या घरातुन एक चिमुरडा मुलगा आत-बाहेर करताना दिसतो. साधारण नऊ-दहा वर्षांचा असेल. एकदाच तो आम्ही बाहेर जाताना मला त्यांच्या बाबांसोबत दिसला होता. खाली खेळताना भरपूर दंगा-मस्ती, आवाज करणारा हा गोट्या इतक्या शांतपणे आणि अगदी एकही प्रश्न न विचारता चालताना पाहून मला मात्र फार आश्चर्य वाटले. 

त्या फेरीत तो मला खाली फारसा दिसत नव्हता. मला वाटतं नुकतीच शाळा सुरु झाली असणार. त्यावेळी नेमकी माझी मुलं माझ्याबरोबर होती. म्हणून मी हसून त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला होता. "काय रे? आजकाल खाली कुणी खेळताना दिसत नाही? नाही, माझी मुलं पण खेळली असती." मी चेहरे वाचून स्पष्टीकरण. अर्थात समोरून काहीच प्रतिसाद नव्हता. Do not talk to strangers, घरी शिकवलं असणार. 

त्यानंतर त्या गोट्याच्या बाजूच्या घरात म्हणजे लिफ्टजवळच्या घरात कोण राहातं हा प्रश्नच मला पडला नाही. कदाचीत भाडेकरू किंवा सकाळी लवकर बाहेर पडून रात्री खूप उशीरा येणारे चाकरमानी असावेत. आपल्याला काय? 

शेजारधर्म वगैरे पुस्तकी भानगडी प्रमाण न मानणारा, आहे तो वारा झोकात खाणारा असा हा तिसरा माळा.

#AparnA #FollowMe