Saturday, October 27, 2018

सात माळ्यांची कहाणी - दुसरा माळा

चढून जाऊ शकणारा, उंच तरी त्यातल्या त्यात बरा म्हणजे दुसरा माळा. दुसऱ्या माळ्यावर चार बिऱ्हाड आहेत. चारी वन बी एच के आहेत. त्यातील चढताना जिन्याजवळचं बिऱ्हाड विंचवाचं आय मिन भाड्याचं. 

सध्यातरी तिथे एक गुजराती कुटुंब राहतं. त्यातल्या गोलमटोल मुलगा दुपारी शाळेतून आल्यावर बहुदा एकटा असतो किंवा त्याची आई झोपा तरी काढत असावी. "मैं रोज स्नॅक्स घर पे ही मंगाता हूँ", हे त्याचं बोलणं एकदा लिफ्टमध्ये मी ऐकलं आणि अवाक झाले. त्याचं आकारमान पाहून याने खरं तर चढ-उतार केली तर बरं असा एक टिपिकल "आई" विचारही माझ्या मनात येऊन गेला. असो. 

त्यांच्या बाजूच्या घरात कोण राहतं यापेक्षा त्यांच्या वृत्ती, याविषयी संपूर्ण इमारतीत कुतूहल आहे. मागे बरेचदा लिफ्ट उगाच वरखाली होते असं लक्षात आलं. शिवाय ती वरचेवर बंदही पडायला लागली तेव्हा जी काही तपासणी, मेंटेनन्स कम्पनीच मत वगैरे सोपस्कार झाले, तेव्हा कुणीतरी मुद्दाम लिफ्टची बटणं दाबून पळ काढतं असं लक्षात आलं. आता हा आरोप सर्वानुमते या घरावर कशाप्रकारे आला ते मला नेहमी इथे राहत नसल्याने माहित नाही. पण कुणीतरी पहिले असेल वा त्यानंतर लावलेल्या कॅमेरामध्ये तो आला असेल. तेव्हापासून "तो माणूस" हा एक वाक्प्रचार इमारतीत अस्तित्वात आला. हा "तो माणूस" मी/इ आजतागायत "तो माणूस" म्हणून पाहिला नाही. पण "तो" आहे याची जाग जशी लिफ्ट देते, तसेच इमारतीतील माणसे एकमेकांशी बोलताना किंवा विशेष करून "ए जी एम" ला दहा मिनिटे तरी "तो माणूस" विषयावर बोललं नाही तर ती मीटिंगचं फाऊल धरली जाईल असं वाटते. 

राहिले दुसरे दोन फ्लॅट, त्यातील एकातला "बाबा" इतरवेळी साऊथ आफ्रिकेला अकाउंट्सचे प्रोजेक्ट्स करतो आणि सुट्टीवर फक्त घरी येतो. आई बहुतेक कामाला जाते. हा "बाबा" घरी असला कि हे कुटुंब जवळजवळ दररोजच संध्याकाळी नटून-थटून (अर्थात त्यांच्या आई) बाहेर जेवायला किंवा गाडी घेऊन फिरायला जातात. यांना एकच मुलगा आहे आणि तो दिसायला/वागायला तरी अतिशय सभ्य/अभ्यासू वाटतो. 

चौथं, म्हणजे चढायच्या दरवाज्याजवळच्या कुटुंबाबद्दल काही कळलं तर मलाच सांगा. मी कितीतरी वेळा जिना उतरून जाते. पण इथे काही हालचाल पाहिली नाही. नाही म्हणायला एक कामवाली बाई काहीवेळा बाहेर येताना दिसते. 

थोडा फार हॅप्पनिग, थोडा कनिंग असा हा दुसरा माळा. आपण वारा खाणाऱ्या वरच्या मजल्यांवर नाही म्हणून असूया की लिफ्ट बंद पडली तरी आमची चढ-उतार सोपी आहे याचा आनंद याच्या कात्रीत अडकलेला. माळा खात्री आहे बऱ्याच ठिकाणचे दुसरे माळे असे अधांतरी लटकणारे असतील. नाही? 

No comments:

Post a Comment

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.