Tuesday, October 2, 2018

सात माळ्यांची कहाणी - पहिला माळा

रिबिल्डींग प्रोजेक्ट्समधल्या इमारतींचा थोडा अभ्यास केल्यावर आमच्या टीमच्या असं लक्षात आलं की पहिल्या माळ्यावर घर घेणाऱ्याचे काही विशेष प्रकार आहेत. सर्वात पहिलं आधी जे लोकं तळमजला किंवा पहिला माळ्यावर राहत होते त्यांच्या नशिबात  शक्यतो पहिला माळा येतो. काही कुटुंब बरेचदा पुढचा विचार करून पुढे मागे जिना चढावाच लागला तर पहिला माळा बारा म्हणून हाच माळा पसंत करतात (आणि मनातल्या मनात कधी लिफ्ट बंद पडते याची वाट पाहतात - सातवा माळा उवाच).काही कुटुंबाना खरं तर वरचा कुठलाही माळा चालणार असतो किंबहुना हीच एक संधी आहे असं समजून त्यांनी बिल्डरसोबत आधीच बोलणी केलेली असते पण प्रत्येक माळ्यावर चौरस फुटाचा भाव वाढतो हे ऐकताच त्यांनी पाय मागे घेतला असतो. 

आमच्या इमारतीत प्रत्येक माळ्यावर थोड्याफार फरकाने सारखे असे चार ब्लॉक्स आहेत. पहिला माळाही तसाच. फक्त चारपैकी तीन कुटुंब मालक राहणारी आणि एक घर भाड्याने. पैकी एका घरात एक बहीण भाऊ शांतपणे राहतात तर एका कुटुंबात एक ज्येष्ठ नागरीक आजी आपल्या कुटुंबासहित असतात. आजी अधे मध्ये आजारी पडल्यामुळे इमारतीत कधीही ऍम्ब्युलन्स येते आणि जेव्हा केव्हा ती येणार असते इमारतीचा वॉचमन युद्धभावनेने ज्याला त्याला खाली ते सांगत राहतो. त्याचा उद्देश जरी खाली कुणाची गाडी किंवा ट्राफिक येऊ नये असला तरी आजकाल इतरांना मात्र त्याची लगबग "लांडगा आला रे आला" सारखी वाटते. 

बहीण भावांची जोडी कुणालाही एकत्र दिसत नाही पण ते तिथे असतात. पैकी भावाची नोकरी फिरतीची आहे पण AGM साठी मात्र भाऊ नेहमी वेळ काढतो. या भावाने यावं असं बरेच लोकांना वाटतं कारण सोसायटीचा जुना जाणता मेंबर म्हणून बरेच पैशाचे व्यवहार त्याला चांगले माहीत आहेत. त्यात काही चांगल्या सुधारणादेखील तो सुचवतो आणि त्या मान्यही होतात. फक्त संचालक मंडळावर यायला मात्र याचा नकार असतो. माझी सही हवी असेल तर आठवडाभर थांबावे लागेल हे एक नेहमीचं कारण पुढे केलं जातं. त्यांना वेळेवर स्वतःची महिन्याची बिलं देखील भरता येत नाही. सोसायटीचा मेंटेनन्स तर ते सहा महिन्यांनी एकदा भरतात. त्यांना मंडळावर घ्यायचा मूळ उद्देश त्यांनीच वेळेवर बिलं भरावीत असा असावा असा संशय घ्यायला इथे काहीही हरकत नाही. 

तिसरं घर नक्की कुणाचं हे मला तरी कळलं नाही पण या घरच्या बाई आपल्या घरी पाळणाघर चालवतात असं लक्षात आलं. त्यांचा हॉल नेमकं समोरच्या रस्त्याकडे तोंड असलेला आहे. सकाळी पहिला माळा फार बिजी असतो. बाळाला घेऊन एक बाई नेहमी जिना चढून जातात. हातात बाळ, त्यांची ऑफिसची एक आणि बाळाची एक असा दोन बॅग्ज एवढं सगळं घेऊन लिफ्टचं दार उघडणं कठीणच म्हणा. आणखीही दोन तीन जण आपल्या मुलांना या घरात ठेवून जातात. दुपारी कुणाचं बाळ रडलं तर आजींची झोपमोड होत असेल अशी मला आपली उगीच काळजी.  

उरलेलं चौथं  बिऱ्हाडं दर अकरा महिन्यांनी बदलत असल्यामुळे कुणाला फार लक्ष द्यायला वेळ नसतो. फक्त या अकरा महिन्यात सामानाच्या चढ-उतारीत इमारतीची लिफ्ट त्यावेळीस बंद पडते असं लक्षात आल्यावर सरसकट सर्वांनाच जड सामान लिफ्टमधून वर खाली करू नये हा नवा नियम लागू करण्यात आला. 

बाकी ती पाळणाघरातली लगबग सोडली तर तसा पहिला माळा शांतच म्हणायचा. अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी पाणी मागितलं तर आजी नाही म्हणणार नाहीत किंवा त्याची तक्रारही नाही. ती बहीण भावाची जोडीदेखील शांतताप्रिय. पाळणाघराचं दार तर फक्त मुलांच्या वाहतुकीच्याच वेळेत उघडतं  आणि बंद होतं असा दाट  संशय. तर  ते बिलाचं सोडलं तर मला वाटतं असा माळा मिळणं हे या इमारतीचं भाग्यच.     
   


No comments:

Post a Comment

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.