Thursday, September 13, 2018

सात माळ्यांची कहाणी - तळमजला

तळमजला हा एक पूर्वीच्या इमारतीतील नांदता माळा नवीन टॉवरच्या मालकांनी भावी गाडयांची पार्किंग नावाखाली खरं तर खाऊन टाकला आहे. काही सुरुवातीच्या इमारतीत ज्यांना एकंदरीत चढणे मग ते लिफ्टने का असेना वेळखाऊ काम वाटते अशा ठिकाणी बहुतेक तळमजले शिल्लक आहेत पण ते फार मोजके ठिकाणी. मुंबईत घरटी एक चारचाकी आणि प्रत्येक डोई निदान एक दोन चाकी अशी वाहनसंख्या आल्यामुळे तळमजले नकोच असा एक संघ असावा अशी शंका वाटते इतकं पार्किंग नावाचं प्रस्थ बिल्डर आणि मालक लोकांनी जोपासलं आहे. 

"अरे तेव्हा लक्षात आलं असतं तर आधीच पार्किंगचे दोन लॉट घेतले असते आणि नाही त्या केसकरला अद्दल घडवली असती तर नावाचा श्रीकांत नाही" वगैरे डॉयलॉग ऐकू आले म्हणजे पूर्वाश्रमीचे तळमजलेकर असावेत हे हमखास समजून घ्यावं. खरं तर इथे तळमजलेकर हे आडनाव का असू नये असेही अस्मादिकांना वाटते पण ते असो. 

तर पार्किंगमुळे तळमजला आपलं पूर्वीचं अस्तित्व गमवून वगैरे बसला नाही तर आता त्याला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला आहे. त्यात मुख्य मालक म्हणजे इमारतीचे किमान दोन किंवा असतील तितके वॉचमन उर्फ गुरखे अरे पण हे काम आता सिक्युरिटी एजन्सी नामक संस्थेकडे गेल्यामुळे गुरखे नामशेष झाल्यासारखेच मला या ट्रीपमध्ये तरी वाटले. असो उगाच डिस्क्रिमिनेशन नकोच. तर हे नवे मालक तळमजल्याला प्राप्त झाल्यामुळे या मजल्यानेच कात टाकली. 

एका कोपऱ्यात सोसायटीचं (कधीतरी) रविवारी वगैरे आणि मुख्य AGM ला उघडणारं ऑफिस आणि दुसरीकडे साधारण मध्यभागी एखाद्या पिलरला धरून वगैरे बांधलेलं वॉशरूम जे या दोन मालकात शेयर होणार आणि मध्येच कुणाचं लक्ष नाही असं समजून एखादा त्यांचाच मुंबईत नवा असलेला नातेवाईक पोटभाडेकरू म्हणून येऊन वापरतही असेल. अर्थात ही बातमी ज्या क्षणी सोसायटीतला चाणाक्ष सदस्य माहित करून घेतो त्या क्षणी मालक बदलले जातात हे सांगणे नलगे. 

तर हे वॉचमन लोक या जागेला ठेवले तर स्वच्छही ठेवतात; नाही असं नाही पण मुख्य पाणी भरमसाठ वापरतात हे एक जाता जाता लक्षात आलेलं ठळक वैशिष्ट्य. बरं सगळी इमारत यांच्या भिस्तीवर त्यामुळे कोण त्यासाठी त्यांना बोलणार अशी सातही माळ्यावरच्या लोकांची श्रद्धा. 

इथेच पार्किंग नामक ठिकाणी बऱ्याच गोष्टी चालतात. नाही नाही इमारतीतली प्रकरणं वगैरे नाही ते सगळं जुन्या चाळीतल्या अडगळीतल्या जागी. आजकाल त्यासाठी खास जॉगर्स पार्क वगैरे आहेत असं ऐकते. 

इथे कुणाच्या गाडीवर प्रेम आपलं ते राग काढणे किंवा आपल्या पार्किंगच्या जागेत दुसऱ्याची गाडी तसूभरदेखील आत आली तर लगेच वर वॉचमनतर्फे निरोप पाठवणे आणि मुख्य म्हणजे कधी आपण चेयरमन किंवा सेक्रेटरी असलो (किंवा नसलो तरी) समोरच्या बाजूला थोड्या वेळासाठी गाडी पार्क करून मग बाथरूममध्ये जाऊन ती गाडी विसरून जाणे असे प्रकार तळमजल्याची रंगत वाढवतात. 
 
अशा काही घटनांमुळे तळमजला तास नांदताच असतो पण खरी गंमत असते ती संध्याकाळी.  तेव्हा इमारतीतली मुलं तिथे (व्हिडीओगेम्स मधून वेळ मिळाल्यास) खेळतात आणि त्यांच्या आई-बाबा किंवा आजी वगैरे इमारतीकर जर आधीपासूनचे शेजारी असतील तर आणि नसतील तरीही गप्पा-गॉसिप करतात. त्यांच्या आवाजाने तळमजला थोडा सुखावतो. नाहीतरी आधी खाली राहत असलेल्यांच्या वऱ्हांड्यात या गप्पा रंगायची त्याला सवय असते. 

याला अपवाद पावसाळा. कारण तेव्हा शक्यतो कुणी उगीच चकाट्या पिटायला खाली उतरत नाहीत. मग शांत पडून राहणे हे एकच सत्य या मजल्याकडे उरतं. आजकाल तर मॉल  आणि रात्री उशीरा बाहेर खाणे संस्कृती आल्यापासून तर तळमजला आमच्यासारख्या एन आर आय लोकांच्या मुलांच्या गडबडीची वाट पहात राहोत असे म्हणतात. खरं खोटं त्या इमारतीला किंवा वॉचमनला माहित. तोही रात्रीचा झोपण्यासाठीच वापर करत असेल तर मात्र हा मजला सर्वार्थाने दुःखी मजला म्हणता येईल. अर्थात पुन्हा बाकीचे इमारतीकर आपापल्या चाळीशी आणि पन्नाशीतून बाहेर येतील आणि खाली पेन्शनर म्हणून (टवाळक्या करत) बसतील तेव्हा खरी गंमत पुन्हा सुरु होईल अशा आशेवर तळमजला पुराण संपवते. 

  #AparnA #FollowMe

No comments:

Post a Comment

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.