Wednesday, July 20, 2016

गुडबाय मॉसी पॅनकेक

मॉसी पॅनकेक हा माझी दोन्ही मुलं ज्या पाळणाघरात गेली, तिथे मागच्या मोठ्या यार्डात असणारा त्यांचा पेट ससुल्या. या पाळणाघरात महिन्याभराच्या बाळापासून पाच वर्षाच्या आतली येणारी मुलं त्यांचे वाढीचे टप्पे पूर्ण करून प्रिस्कूलमध्ये गेली की मग खऱ्या शाळेत केजीच्या वर्गात जायला तयार होईपर्यंत इकडे असतात. माझ्या धाकट्याचं इथलं हे शेवटचं वर्ष म्हणजे खरं सांगायचं तर ऑगस्टमध्ये आम्ही या सुंदर फॅसिलीटीलाच गुडबाय म्हणणार .मागे जानेवारीमध्ये ज्या फ्रोझन दिवसांचा उल्लेख झाला तेव्हा विंटर ब्रेकसाठी पाळणाघर बंद होतं आणि ती थंडी सहन न झाल्यामुळे मॉसी गेला. 

त्याच्यावर प्रेम करणाऱ्या छोट्या छोट्या मुलांना हे सत्य पचवण्यासाठी आधार देणाऱ्या आमच्या शिक्षकांची ही पोस्ट असं म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. रोज त्यांच्याकडून येणाऱ्या इमेलमध्ये मी ही इमेल वाचली आणि हेलावून गेले. त्यांची परवानगी घेऊन आणि त्यांनीच दिलेले फोटो वापरून, त्यांनी केलेल्या डॉक्युमेंटेशनचा हा मराठी अनुवाद. यातलं माझा मुलगा ऋषांक हे नाव वगळता नावं आणि काही तपशील वगळला आहे. ही कहाणी शिक्षकांच्या शब्दात. 

८ जाने. २०१६
आमचा शाळेचा लाडका पेट मॉसी पॅनकेक मागच्या आठवड्यातली भयानक थंडी सहन करू शकला नाही. आज आम्ही मुलांना ही बातमी सांगितली आणि त्यांना काय झालं असेल त्याबद्दल चर्चा करायला वेळ दिला. आम्ही हा संवाद वर्गात असुरू केला आणि त्यांना काही सांगितले पण मुख्य करून आम्ही त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकलं. हा तो संवाद. 

शिक्षिका -  आम्हाला आज तुमच्याशी मॉसी पॅनकेकबद्दल काहीतरी बोलायचं आहे. 
बबलु -      तो मेला.  
ऋषांक -    तो मेला? 
शिक्षिका-    आपण  बाहेर त्याच्या घरी जाऊ या आणि त्याच्याबद्दल बोलुया. 
इला -        आपण आपली जर्नल्स घेऊन जायला हवं. 
रसेल-        मला वाटतं मॉसी पॅनकेक पिंजरा तोडून फेन्सवरून उडी मारून पळाला. 
चार्ली -       मग आपण त्याला शोधलं पाहिजे. 
शिक्षिका-    मुलानो आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मॉसी पॅनकेक पळाला नाहीये. मुख्याध्यापिका बाईंनी त्याला पाहिलं आणि तो जिवंत नव्हता. 
इला-         तुला कसं माहित?
शिक्षिका-    तो त्याचे डोळे उघडत नव्हता, तो आता उड्या मारत नव्हता आणि तो काही खात-पीत नव्हता. 
रॉन-         तो खात नव्हता. 
सोनिका-    तो खात आणि पीत नव्हता. 
ऋषांक -   तो पुन्हा जिवंत होऊ शकेल का?
शिक्षिका-  जेव्हा कुणी मरून जातं आणि  खाणं बंद करतं, जेव्हा ते श्वास घेणं बंद करतात आणि हालचाल करत नाहीत, तेव्हा ते परत जिवंत होत नाहीत. 

त्यानंतर मुलांना आम्ही मॉसीचं रिकामी घर पाहायला बाहेर घेऊन गेलो. 

अनु -     तो कुठे गेला? तो हलत का नव्हता? तो मरून गेला होता का?
लॉय  -    जेव्हा तो श्वास घेत नव्हता तेव्हा तो कसा दिसत होता?
चार्ली -    मला मॉसीची काळजी वाटतेय. मला त्याची आठवण येतेय.
इला -     त्याला थंडी आवडत नाही. 
लॉय -    आपल्या बाईं कशा त्याला काढायला गेल्या?
रॉन -     मॉसी कुठे आहे? तो इथे का नाहीये?
ऋषांक -  मला वाटतं मॉसीला बर्फामुळे खूप थंडी वाजली. मला माहीत आहे थंडीमध्ये बर्फामुळे बनीजना खूप थंडी वाजते, ते बाहेर पडू शकत नाहीत आणि म्हणून ते मरून जातात. 
किरण -  मग आपण जसे गरम कपडे घालून बंडल अप करतो तसं ते का करत नाहीत?
एल्विन -  मला वाटतं मॉसी अंगावर बर्फ पडल्यामुळे मरून गेला. 
केंट -    मला वाटतं मॉसीच्या अंगावर तो राक्षस आला जो तुम्हाला श्वास घ्यायला देत नाही आणि तुमचं हृदय बंद पडतं. 
ऋषांक -  मला मॉसी परत जिवंत व्हायला हवा आहे. 

बाहेरून परत आल्यावर मुलांना त्यांच्या जर्नलमध्ये  मॉसीबद्दल काही न काही लिहायचे होते. कुणीतरी मॉसीसाठी चित्ररूपी गुडनाईट गाणं लिहिलं, कुणी तो जिवंत,आजारी आणि मरून गेलेला असा त्याचा जीवनप्रवास रेखाटला तर कुणी त्याला मुलं पाहायला जायची तेव्हा त्यांचा घोळका आणि त्यांच्याबरोबर एखादं मोठं माणूस  चित्र रेखाटलं. याचं एक प्रेझेंटेशन त्यादिवशीच्या इ-मेलने आम्हाला आलं. 






त्यादिवशी ऋषांक घरी आला आणि मी त्याच्याशी मॉसीबद्दल बोलले तेव्हा तो अगदीच भावूक झाला नाही असं नाही, पण त्याने ते स्वीकारलं होतं. मॉसी परत आला तर त्याला नक्की आवडलं असतं पण तो येणार नाही हे त्याला माहीत होतं. त्याने त्याच्या  मॉसीच्या आठवणी त्याला जमतील त्या भाषेत म्हणजे रेखाटनात त्याने व्यक्त केल्या, आपले शिक्षक,मित्र यांच्याबरोबर त्या आठवणी जागवल्या आणि त्यामुळे त्याचं मन मोकळं झालं होतं. 


इथे दिलेलं प्रत्येक चित्र कुठली आठवण सांगतं हे त्याला पक्क आठवतं आणि ते त्याने मला अगदी काल हा ड्राफ्ट पूर्ण करायचा म्हणून ही चित्र पुन्हा पाहताना त्याबद्दल सांगितलं देखील. मी आजवर कुठच्याही कारणाने जसजसे काही संपर्क गमवले त्यावेळी त्याबद्दलच्या जुन्या आठवणींमध्ये मी जास्त गुरफटले किंवा त्यातून बाहेर यायला मला जरा जास्तच वेळ लागला.  मॉसी  पॅनकेकच्या या घटनेकडे त्रयस्थ नजरेने पाहताना इतक्या लहान वयात त्यांच्या छोट्या मित्राला कायमचा निरोप देऊ शकण्याचं या मुलांचं धैर्य बघून त्यांचा एक प्रकारे हेवाच वाटतो.