Friday, June 19, 2015

निळी निळी परडी

उन्हाळा चांगला लागला, म्हणजे पोरांच्या शाळा बंद झाल्या की मग डोळे दुरच्या प्रवासाची वाट पाहायला लागतात. त्यात  काही ठिकाणं इकडे आल्यापासून नोंदणीत होती पण जाणं झालं नव्हतं. मागच्या वर्षी आई-बाबांची मदत असल्यामुळे ती यादी पुन्हा हातात घेता आली. या यादीवर अग्रभागी होता "क्रेटर लेक". विकीपेडियावर याबद्दल भरपूर माहिती आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगायचं, तर एका उद्ध्वस्त ज्वालामुखीमुळे तयार झालेला १,९४३ हजार फुट खोल तलाव, जो दरवर्षी पाऊस आणि वितळलेल्या बर्फाच्या पाण्याने भरला जातो. 


आम्ही निघालो आणि आजवर ओरेगावात जाताना दिसणारी गर्द हिरवळ इथेही काही सुंदर वळणे घेत, आमच्या सोबतीला होती. 




हळूहळू चढण दृष्टीपथात यायला लागली. 




जेव्हा पहिल्यांदी या निळाईला डोळेभरून पाहिलं, त्याच क्षणी या ठिकाणी यायचं सार्थक झालं. 


हिवाळ्यात एक बाजू बऱ्यापैकी बंद असते. मात्र उन्हाळ्यात गाडीने संपूर्ण प्रदक्षिणा करायची सोय आहे. 


आम्ही गेलो तेव्हा थोडा अजून न वितळलेला बर्फ दिसत होता. 



विझार्ड आयलंड, हे एक बेटही आतमध्ये दिसत. खाली जाण्यासाठी एक ट्रेकदेखील आहे आणि आतमध्ये बोटिंगची संधी. 




नैसर्गिकरित्या तयार झालेले काही दगडांचे आकार या निळाईवर उठून दिसतात. 


आमच्या प्रदक्षिणेतला हा थांबा मला मायदेशाची आठवण करून गेला. 




या निळाईची भूल पडताना सांज कशी झाली कळलंच नाही. कदाचित सूर्याचाही इथून पाय निघत नसेल. 




Friday, June 5, 2015

छोटी छोटी (पर्यावरण) की बातें

"आमच्यावेळी" ही टकळी सुरु केली की तुम्हाला काय आठवतं? मला आठवतं वर्षातून दोनच वेळा मिळणारा नवा फ्रॉक, शाळेच्या गणवेषात एक स्कर्ट आणि दोन शर्ट्स, एक पावसाळी तुटेपर्यंत किंवा साईज बदलेपर्यंत वापरली जाणारी चप्पल आणि एक उन्हाळी तिचेही वापरायचे नियम तेच, आदल्या वर्षीच्या उरलेल्या पानातून बनवलेली रफ वही, आधीच्या भावंडाने वापरलेली पुस्तकं, हे आणि असं बरचं काही. हे मी अशासाठी लिहिते कारण ही यादी काही मुलं सोडली तरी बऱ्याच जणांकडे सारखीच असायची. त्यामुळे आम्ही काही गरीब वगैरे ठरत नव्हतो, सारेच मध्यमवर्गीय आणि गरजांची कुवतही मध्यमवर्गीयचं. 

मग आमच्याकडे पैसे यायला लागले, कसे ते  पोस्टचा भाग नव्हे पण आम्ही शिकलो, प्रगत झालो का काय म्हणतात ते. मग आमच्या मुलांकडे वरचा आढावा घ्यायचा तर वरच्या प्रत्येक वस्तूला कितीने गुणायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. यातल्या किती वस्तू त्यांना खरंच गरजेच्या आहेत? त्यांचं सोडा, आपल्यासाठी आपण घेतलेल्या वस्तूंची यादी बनवायला घेतली  आणि त्यातल्या कुठल्या कमी केल्या तर आपलं अडणार नाही हे पाहिलंत तर आपण कुठेतरी आपल्या गरज अवास्तव वाढवतोय का?  हा प्रश्न नक्कीच  पडेल. 

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे तर त्यानिमित्ताने एक चितन करायला बसलं तर हे आठवायचं कारण म्हणजे मुबलक पैसा किंवा हवं ते उपलब्ध आहे म्हणून सगळं आपल्याकडे हवं या मोहापायी आपण नकळत पर्यावरणावर किती ताण देतो याकडे लक्ष द्यायची वेळ फार लांब नाहीये. बरं आजवर याकडे सरकार किंवा कुणी इतर माध्यमांनी काही करावं अशी अपेक्षा आपण बाळगतो आणि ते पूर्ण चुकीचं नसलं तरी आपला खारीचा वाटा आपण उचलणार का? 

वरती ते दैनंदिन जीवनातील उदा. द्यायचं कारण हेच आहे की तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांसाठी पर्यावरण दिन म्हणजे काही फार फॅन्सी प्रकारे साजरा केला पाहिजे असं नाहीये. हळूहळू एक एक गरज नियंत्रित केलीत, तरी बराच भर हलका होईल. आपलं योगदान दुसऱ्याच्या दारचा वृक्ष वाढवून देता येईल, तसच आपल्याला लागणारे काही कागद, काही कपडे कमी विकत घेऊनही दोन पाच झाडं कापायची थांबवीत. कुठे जवळपास चालत जाउन एखादं काम करता यावं म्हणजे तेवढाच पेट्रोलच्या साठ्यातलं आपले थेंब वाचावेत. हे आणि असं बरचं काही. बोले तो, छोटी छोटी बातें और सिर्फ ये ही नही बहुत कुछ और भी| जैसे आप सोचे और हो सके तो किसी और को सिखाये|