Wednesday, February 29, 2012

.......

एक चौसोपी वाडा....आजोबांच्या काळातला...तीन मुलं आणि त्यातल्या एकाच्या वाट्याला आला मधला हिस्सा....घर जुन्याकाळचं  कुडाचं ....कधी कधी दोन दिवस बाहेर गेलं तर बाजूची दोन्ही कुडं एकमेकांशी गप्पा मारायला यायची...असं करता करता या मधल्या घराचा मधला भाग म्हणजे एक छोटा बोळ झाला होता...शेवटी एकदाची भिंत आली पण बोळ तसाच राहिला...त्याची तक्रार त्या घरच्या मालकाने कधीच केली नाही...उलट त्याऐवजी मागच्या वाड्यात चिंचेच्या झाडाखाली खाट घालून उन्हाळ्याच्या रात्री चांदण्याशी गप्पा मारत नैसर्गिक एअर कंडीशनरमध्ये आरामात झोपला...त्याच्या विनोदी गप्पा सुरु झाल्या की हसता हसता झोप कशी यायची कळायचं पण नाही...कुठल्याही गंभीर विषयाला विनोदाकडे कसं वळवायचं हे त्याच्याकडून शिकायला हवं म्हणूनच त्याच नाव त्याला साजेसं होतं...
पावसाळ्यात गावची नदी त्याच्या आंब्याच्या झाडाला भेटायला यायची...तस झाल की कामावरून घरी जायचा त्याचा रस्ता बंद व्ह्यायचा मग "नदी आली", म्हणून तो आमच्याकडे यायचा...त्यात पाचवी ते दहावीसाठी त्याची मोठी मुलगी आमच्याकडे होती त्यामुळे तिला भेटायला पण त्याच्या फेऱ्या व्हायच्या..त्याची परिस्थिती कशीही असली तरी आमच्या घरी येताना त्याचा हात रिकामा नसे...कधी बिस्कीटचा पुडा तर पावसाळ्यात परसात लावलेल्या ताज्या भाज्या किंवा भात झाला की घरचे जाड पोहे काही ना काही गम्मत असे...आणि तो परत गेला तरी एक गम्मत असे....एक दोन दिवसांनी घरात कुठे तरी एक चिट्ठी मिळे...कुठल्यातरी घरगुती ताज्या घडामोडीवर आपले विनोदी मौलिक विचार त्यात असत..नाही तर कधी कधी त्याच्या मुलीसाठी त्याच्याच विनोदी ढंगात काही सूचना..हसून हसून मुरकुंडी वळे....दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत त्याच्या घरी गेलं तरी कुणाला तरी बकरा बनवून एक चिट्ठी अशी निघे आणि त्यात तर चिट्ठी लिहिणाराही कुणी तिथे हजर नसणारा नातलग असे....दुपारच्या चहाला करमणुकीचा फराळ...
सुटीचा वार आला की काहीवेळा त्याच्या अंगात बल्लव संचारे. अशावेळी एकीकडे कापून मुरायला ठेवलेल्या कोंबडीचे काही तुकडे पळून चुलीत जात आणि काही वेळाने आमच्या हातात गरम काळसर तुकडा पडला की "ताटात वाढून खा" असले आयांचे नियम धूडकावून ते मट्ट करून वर आणखी काय भाजलंय रे?” असं म्हणून आम्ही अजून उसकवल्यासारखा माळ्यावर चढून कुठे करांदे काढ नाही तर रताळी, बटाटा, सुके बोंबील अशा सर्वांची आहुती आधी चुलीच्या आणि मग सगळ्यांच्या पोटात जाई...ती कमी झालेली कोंबडी वाढणाऱ्या बाईच्या लक्षात आली तरी आमच्या पोटाला त्याने काही कमी पडत नसे...आणि हे सगळं भाजकाम करताना त्या बाजूच्या आक्रमणाने  वेडावाकडा आकार केलेल्या घरात मोठमोठ्या ढांगा टाकत  वेगाने चालण्याची त्याची लकब...
वर्ष सरली आम्ही सर्व मोठे झालो आपापल्या उद्योगांना लागलो...हळू हळू गाव पण गावातली वस्ती सोडून पाड्यावर आला..म्हणजे हमरस्त्याच्या जवळ....आमच सुरुवातीला उल्लेख केलेलं मधलं घर मात्र नेहमी तसंच राहीलं  आणि त्यात होणार आमच आदरातिथ्यही....अगदी चार महिन्याच्या आरुषला घेऊन गेले तरी माझ्यासाठी ते सगळं तसच होत....बाळंतीण आणि जावई घरी येणार म्हणून पुन्हा खास सारवून घेतलेला वाडा, त्यातली खाट आणि नदीवरून येणारा गार वारा....
"मला राहायला यायचं होत रे"
"तू आता काय राहशील इथे आणि ते पण तुझ्या मुलाला घेऊन...इथे किती वेळ लाईट नसते..." त्याचा थोडा उदास सूर....
मी मात्र तशीच जुन्या शाळकरी मूडमध्ये...."चल असं काही नाही....आधी नाही का राहायचो..."
"थांब मी करांदे  भाजलेत...जावयाला माहित नसेल....त्याच्या देशावर हे सगळं मिळत नाही ना..." त्याने विषय नाही बदलला तो पण त्याच्या जुन्या अवतारात गेला....तसाही तो त्यातून बाहेर आलाच नव्हता म्हणा...
त्या दुपारी अप्रतिम चवीचं जेवून तृप्त झालेलो आम्ही निघालो तेव्हा गावच्या रीतीप्रमाणे तोच माझ्या पाया पडायला लागला....आणि पहिल्यांदीच एकमेकासाठी नेलेल्या गिफ्ट्स देताघेताना आम्ही खूप रडलो होतो.... पहिल्यांदीच.....
त्यानंतर मागची लग्नातली भेट खूपच जास्त धावती....त्याला बलसाड पकडायची होती......आणि मला दुसऱ्या दिवशीच विमान...
"तू खूप बारीक वाटतोयस...."
"हिला सांग जरा मला रोज कोंबडी करून घायला....नाही ग आता पूर्वीसारख्या कोंबड्यापण राहिल्या नाहीत ना....आणि मी बॉयलर खाणारा नाही तुला तर माहीतच आहे..." त्याचं आणि आमचं सर्वांच आणखी एकदोन विषयावरून चांगल हसून झाल्यावरच निरोप घेतला होता....
त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये नेतानाही असाच काही विचार त्याने केला असेल का की आता २६ जानेवारी आली आणि तिच्यापाठीच रविवार कशाला कुणाचे सुट्टीचे प्लान्स खराब करा...त्यापेक्षा ३० ला तस पण म. गांधी पुण्यतिथी आहे..लोकांना लक्षात राहायला पण बर आणि मुख्य म्हणजे तीस ते तीस असा महिना मोजायचा असेल तर मीच त्यांना सांगेन, "कुठे महिना झाला मला जाऊन....काय पण तुम्ही भाऊजी तरी तुम्हाला सांगत होतो जास्त मुलांना शिकवत जाऊ नका...आपलं गणित ती बिघडवून टाकतात...आमचं बघा बांधकाम खातं..म्हणून घराचं बांधकाम बिघडलेलं".....
रडता रडताही हसवून जाणारा असा माझा विनोद मामा...त्याच्या आठवणीनी हळवा झालेला महिना... आणि कदाचित हे वर्ष....