Saturday, January 1, 2011

सरत्या वर्षाच्या आठवणी...बाळ उतरे अंगणी

कुठल्याही वर्षात भलं-बुरं दोन्ही वाट्याला येणार हे कुणी न सांगता ठाऊक असलेलं सत्य. गेल्या गोष्टीच्या बेरीज-वजाबाकीला अर्थ किती याचा हिशेबही तसा व्यक्तिसापेक्ष बदलणार त्यामुळे हा आढाव घेतला तरी येत्या वर्षात पुन्हा नवी गोळाबेरीज होणार हेच खरे. २०१० कडे या दृष्टीने पाहिले तर माझ्याकडे घडलेल्या मुख्य घटनांचं सार म्हणजे एका नवीन जीवाचा जन्म.
त्याच्या आगमनाची सूचना ते त्याला हातात घेणं सारंच पुन्हा एकदा नव्याने अनुभवताना हे वर्ष कसं संपलं कळलंच नाही...अगदी आजुबाजुला होत असलेल्या काही कटू घटनांसकट...हा एकच जीव पण त्याच्यामुळे हे वर्ष कायम आठवणीत राहावं असंच..
त्याला यायचं होतं २५ डिसेंबरच्या दिवशी..म्हणजे scheduled arrival होतं सांताक्लॉजबरोबर...शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रीणी सर्वांना या तारखेची उत्कंठा असताना प्रत्यक्षात मात्र काही कारणांमुळे आमच्या लाडक्या डॉ. केनेडींनी २० डिसेंबर नक्की केली. अर्थातच हे आम्हा तिघांमधलं गुपीत होतं...घरी येऊन कालनिर्णय पाहिलं तर हे planned arrival होतं नेमकं दत्तजयंतीच्या दिवशी..खरं तर नाताळपेक्षा ही तारीख मलाही आवडली..मागच्या पोस्टमध्ये ही दत्तजयंती स्पेशल असल्याचं का म्हटलं होतं कळलं ना??
पण पठ्ठ्याने सगळ्यांना चकमा दिला आणि स्वारी १० डिसेंबरच्या दुपारी अवतरलीच...scheduled, planned अशा सगळ्या arrivalsना आपल्या जागी ठेऊन "ऋषांक" बाळाने आपण आपलं actual arrival स्वतःच ठरवणार याचा जणू ऐलान केला आणि सगळं विश्व पुन्हा एकदा बाळपावलांनी व्यापलं....



प्लान्ड सी सेक्शन, त्यात आम्ही दोघंच नव्या बाळाचं आणि अडीच वर्षांच्या आरुषचं कसं करणार या सर्व विवंचना माझ्या बाळानेच नैसर्गिकरित्या जन्माला येऊन सोडवल्या आणि दुसरं अपत्य, त्यातही मुलगा(च) असला तरीही पुन्हा एकदा आई होताना मी सारं काही विसरले...ते ’आपलं’ बाळ असतं ही एकच गोष्ट आईला पुरेशी असते आणि आईला सारी मुलं सारखी असतात हे माझ्या आईने मला बरेचदा सांगितलेलं तत्व या बाळाच्या जन्मांनंतर त्याला हातात घेतल्या घेतल्या लगेचच उमजलं.
खरं तर या ब्लॉगमध्ये मागचे काही महिने सारख्या सारख्या येणार्‍या खादाडी पोस्टांमुळे कदाचित ’दाल में कुछ काला है’ चा वास काहीजणांना लागलाही असेल पण ते नेमकं कसं सांगावं हे कळत नव्हतं..आणि ते अगदी छान प्लान करुन सांगुया म्हणून अगदी दत्तजयंती पर्यंत ब्लॉगवर टाकायचे ड्राफ़्टही नोव्हेंबरच्या शेवटी करत होते..अर्थात everything happens for a reason असं जे म्हणतात त्याप्रमाणे आत्ता या पोस्टद्वारे ते गुपित ब्लॉगवाचकांसाठी उघड करुन एका सुट्टीची सुरुवात (जी खरं तर आधीच झालीय) करतेय..
म्हणायला सुट्टी..पण हे न संपणारं आईपण खरं तर पहिल्यांदी आई झाले तेव्हाचंच आहे..आता त्या जबाबदारीत आणखी एका गोड बाळाच्या आगमनाने भर पडलीय. या बाळाच्या आगमनापासून आता त्याला पाळण्यात घालताना जे गाणं घरी वाजतंय त्यानेच रजा घेते.

या ब्लॉगवरचा आपला लोभ असाच ठेवाल ही आशा आणि २०११ साठीच्या शुभेच्छा....