Friday, April 23, 2010

ब्लॉगिंग विश्व आणि मी

शाळेतल्या निबंधासारख्या विषयावर त्यासारखंच रटाळ काही लिहुन पकवायचा अजाबात बेत नाहीये..पण दुसरं काही साधं किंवा वेगळं नाव सुचत नव्हतं म्हणून निबंध तर निबंध असुदे....वाचणारे (हे नमनाचं तेल संपलं की...(आणि तरी आज अगदी पणतीएवढंच आहे)) वाचतीलच...हुश्श..झालं संपली इमानदारी....


ब्लॉग लिहिण्यामागे मुख्य कारण तसंही दिपकचा झाडून सगळ्यांना माहित असलेला ब्लॉग "पु.ल.प्रेम".तेव्हा तर आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो पण या ब्लॉगनिमित्ताने त्याची ओळखही झाली..किती कौतुक करावं या ब्लॉगसाठी दिपकचं तितकं कमीच आहे. पण तरी त्यामुळे स्वतः ब्लॉग लिहावा असं (चुकुनही) मनात आलं नाही..कारण मुळात आपण काहीही ब्लॉगवर लिहू शकतो किंवा लिहावं असं काही वाटलंच नाही.उलट ब्लॉग म्हणजे असं पु.ल.देशपांडेंसारख्या नामांकित साहित्यिकांचंच साहित्य वाचण्याचा आणखी एक मार्ग असं काहीसं फ़िट्ट होतं डोक्यात. किंवा त्याच्या पुढे म्हणजे स्वतः कविता नाहीतर कथा लिहिले पण याबाबतीत लिखाण (आणि बर्‍याचदा वाचन) या बाबतीत मी म्हणजे ढब्बु पैसा...(हो थोडी फ़ार कबुली आहे की मी स्वतः कथा/कवितांच्या ब्लॉगवर फ़ार नसते याची नोंद घेतली आहेच पण तरी..इमानदारी आणखी काय??) पण दिपकशी कधीतरी बोलताना तो मागे लागला अगं तुझ्या भटकंतीबद्दल लिही नं...हे बघ म.ब्लॉ.वि. त्यात किती किती लोकं काय काय लिहितात आणि मग एकदम (माझी लेट) ट्युब पेटली आणि तडातड माझी भटकंती आणि दोन पोश्टा यावर जाऊन विझली...ट्युबच ती किती वेळ तग धरणार??

आणि नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या...काम,घर इ.इ....पण २००९ मध्ये पुन्हा एकदा ब्लॉग लिहावा असं वाटायला लागलं...काही काही आठवणी स्वतःभोवतीच रूंजी घालत होत्या त्यांना मांडावं आणि मग माझिया मनाचा जन्म झाला. खरं तर गप्पा मारण्याचेच विषय आणि स्वान्त सुखाय असंच या ब्लॉगचं स्वरुप आणि त्यामागे मागचा विषयाला वाहिलेला ब्लॉग सुरु करून मग ओढग्रस्तीला लावायचा एक स्वानुभव होताच.

सुरुवातीला (बावळटसारखं) मी लिहायचे आणि मग पुढच्या पोस्टचं मनात येईपर्यंत विसरून जायचे...खूपदा ओळखीच्यांच्याच प्रतिक्रिया यायच्या..मजा वाटायची...प्रतिक्रियामधल्या गप्पा-टप्पा...पण नंतर स्वतःलाच लक्षात आलं....(हो पेटली एक दिवस एकदाची) की आपणही जे ओळखीचे झालेले काही ब्लॉग वाचतो ते सोडून नवनवे ब्लॉग वाचण्यातही मजा आहे...कॉमेन्टाकॉमेन्टीतही गम्मत येते...आणि काहीवेळा एखाद्या पोस्टवर आपण जाईपर्यंत जर सगळ्यांनी त्यावर कॉमेन्टून अगदी कीस काढला असेल की मग खट्टूही व्हायला होतं..अरे माझी कॉमेन्ट आता इतक्या उशीरा काय टाकु?? असंही...काहीकाहीवेळा तर इतरांच्या पोस्ट्समुळे आपल्यालाही काही नवनवे विषय सुचतात..(तेवढंच खाद्य आपल्याही ब्लॉगला मिळतं...) या सगळ्या गदारोळात कधी हे सगळे (आता नावांची जंत्री देऊन उगाच ताणत नाही) ब्लॉगर्स आपल्या परिचयाचे झाले कळलंच नाही..अमेरिकेसारख्या परक्या आणि दुरच्या देशात राहूनही मायबोलीत बोलुन आपलंसं करणारी ही मंडळी घरगुतीच झाली...आणि आता वेळ आली आहे या सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याची...माझ्या ब्लॉगसाठीचा हा काहीतरी संकेत असावा की नेमका माझा मायदेश दौरा आणि ब्लॉगर्स मीट यांचा संयोग जुळून आलाय...दुधात साखर, एका दगडात दोन पक्षी नाहीतर आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन..आणि....जाऊदे स्कॉलरशीपच्यावेळी पाठ असलेल्या सगळ्या म्हणी एकापाठी एक लिहून उगाच चव घालवत नाही या निबंधाची....

थोडक्यात दोस्तहो जर वरच्या परिच्छेदातलं (एक ते ट्युबलाईट प्रकरण सोडलं तर) बरचंसं आपल्याही बाबतीत घडलं होतं असं वाटत असेल तर ब्लॉगर्स मीट बद्दल मी काही जास्त सांगायला नको...कार्यक्रम पत्रिकेचं विजेट उजवीकडे आहेच...मी ज्यांचे ब्लॉग वाचते आणि माझ्या ब्लॉगचे वाचक असणार्‍या त्याचबरोबर नवे ब्लॉग आणि वाचक माहित करुन घ्यायला (पुण्याच्या हुकलेल्या संधीनंतर) आणखी एक सुसंधी चालुन आलीय...त्यात मोठ्या संख्येने (रोहन माझं आडनाव संखे होतं...ख्ये नाही) सामील होऊया...आता या ब्लॉगवर भेटुया ब्रेक के बाद..तोपर्यंत डोंट टच दॅट ब्राउजर टॅब....आय मीन.....मी येतेच आहे पण माझिया मनावरचं आपलं प्रेम असंच वाढुदेत....

Thursday, April 22, 2010

वसुंधरा दिवस २०१०

आज २२ एप्रिल म्हणजे जागतिक वसुंधरा दिवस...ही पोस्ट वाचेपर्यंत भारतात साजरा होऊन संपलाही असेल कदाचित.पण मराठी मंडळीवर वेळेवर एक पोस्ट टाकली होती. ती इथे आहे...त्यातलचं या पोस्टमध्ये लिहिण्यापेक्षा एक पृथ्वीच्या वाढत्या तपमानाबद्दल एक माइंड मॅप आला होता काही दिवसांनी तो (ज्यांनी कुणी बनवला त्यांचे आभार मानुन) आज टाकते आहे..बाकी याच विषयावर मागच्या वर्षीही लिहिलंय आणि दरवर्षी उल्लेख होईल..तेवढीच एक माझी या save earth साठीच्या सागरातली छोटीशी ओंजळ..

Wednesday, April 21, 2010

गाणी आणि आठवणी २ - तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हुं मैं

काही काही गाणी एकदा भिडली की कायमच आपल्या आठवणींच्या कप्प्यात राहतात आणि मग वेगवेगळ्या वळणावर पुन्हा पुन्हा आपण त्यांना आठवत राहातो...माझ्यासाठी असंच एक गाणं आहे मासुममधलं ’तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हुं मैं.’ खरं म्हणजे अगदी लहान वयात ’लकडी की काठी’ या गाण्यामुळे पाहिलेला हा चित्रपट त्यावेळी कळणं शक्यच नव्हतं पण नंतर जेव्हा कळत्या वयात हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यातलं हे गाणं खूपच भिडलं.काव्य आणि चाल यांचा इतका सुरेख मिलाप आहे की गुलजारना श्रेय द्यायचं की आर.डी.चं गुणगान करावं हा प्रश्नच पडावा...
त्यातले हैरान व्हायचे प्रसंग तर इतक्यांदा आले की मी या गाण्याची आठवण आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा काढली असेल..अगदी कॉलेजजीवनातले आता लल्लुपंजु वाटणारे पण तेवढा प्रचंड दडपण आणणारे छोटे छोटे प्रसंग असो...इंजिनियरिंग मेडिकल अशा वेगवेगळ्या शाखा निवडल्या गेल्यामुळे होणारी मित्र-मैत्रीणींची ताटातूट असो किंवा घरात झालेले काही वाद असो...काही मनाला भिडणारे पराभव पचवताना, नको असताना घ्यावे लागणारे निर्णय स्वतःला पटवताना हे गाणं ऐकुन डोळ्यात पाणी आलेलं या गाण्यानेच अनुभवलंय.
जाण्यासाठीच येणारी माणसं खरोखरंच गेली की पुन्हा पुन्हा म्हणावसं वाटतं हैरान हुं मैं...किती गृहित धरलेलं असतं आपण सगळं आपल्या मनासारखं होणार म्हणून आणि मग ते तसं झालं की पडणार्‍या छोट्या छोट्या प्रश्नांमुळे ’परेशान हुं मैं’ चा तो आकांत या गाण्याने कितीदा हलका केलाय...त्याचवेळी खूपदा पटलंय ही की ’जीने के लिए सोचा ही न था दर्द भी संभालने होगे’..आणि मुख्य म्हणजे ’मुस्कराने के भी कर्ज उतारने होगे’.........हसता हसताच हे आठवलं की डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहात नाही...
अलिप्तपणे कधी कधी विचार करुन पाहाते की काय काय सांगितलंय या गाण्यात आणि किती मोठ्या मोठ्या प्रसंगांना साक्ष हे गाणं होऊ शकतं आणि तितकीच जास्त गुरफ़टत जाते या प्रत्येक शब्दात....कधी कधी वाटतं "एक आसु छुपाके रखा था’ म्हणून आणि मग तो या गाण्याच्या रुपाने बाहेर येतोय...त्यातलं "गम ने हमें रिश्ते नये समझाए" सुद्धा किती खरं आहे....आणि "धुप में मिले छाव के ठंडे साए" आठवले की थोडं बरंही वाटतं...
कधी तरी हे गाणं नुसतं गुणगुणलं तरी ती आर्तता डोळ्यातून पाणीच काढते...तसंही "आज अगर भर आयी है बुंदे बरस जाएगी" या गाण्यातही आहेच नं....अगदी सगळं काही सुरळीत सुरु असेल तरी हे गाणं ऐकलं की मी आपसूक आठवणींच्या जगात जाते आणि आजवर जितक्या वेळा ऐकलंय त्या त्या वेळा कुठल्यातरी अनामिक दुःखाने भरुन यायला होतं पण तरी ते दुःखी न वाटता आपल्याबरोबर चालतंय असंही भासतं...

Monday, April 19, 2010

जाहिरातींचं युग?????

जाहिरातींच युग हा निबंध उलटून युगं गेल्यासारखी वाटतात..का म्हणजे च्यामारिकेत (साभार: मीनल) आल्यापासुन जाहिराती म्हणजे वॉर्निंग बेलच वाटतात...म्हणजे या देशातली तमाम जनता कुठच्या नं कुठच्या आजारानं पडिक आहे आणि आता त्यात मोठमोठ्या फ़िया (शक्यतो इंश्युरन्स कंपन्याकडून) उकळणारे डागदर तुम्हाला काय सांगतील त्याच्या आत तुम्हीच त्यांना हे औषध सांगा आणि लगे हातो थोडे पैसे आमच्या कंपनीकडे पोचते करा असा काहीसा संदेश देऊन वर मग side effects include या नावाखाली हा मुख्य आजार सोडून उरलेले डोकेदुखीपासुन ते डायरियापर्यंत (मुद्दाम मराठी शब्द टाळलाय...डायरिया त्यातल्या त्यात सभ्य वाटतोय...) सगळे आजार हे औषध घेतल्यावर होऊ शकतील...हे सगळं ऐकल्यावर झीट येऊन पेशंट मुळचा आजार पण विसरेल.....


अरे काय सांगत होते...पाहिलं इथल्या जाहिरातींचा विषय काढला की असं भरकटायला होतं...बरं आता मंदीपण आहे, मोठी लोकं आजारी असतील..पण लहान मुलांचं काय तर त्यांनाही ADHD आणि सगळी एबीसीडी वाले आजार, त्याचं औषध आणि तेच ते वरचं रामायण ऐकुन ऐकुन कान किटलेत...एकही अशी जिंगल पण नाही की प्रॉडक्ट मरो पण गाणं आठवतंय...छ्या...प्रगत प्रगत म्हणताना या बाबतीत कसे इतके मागासलेले बुवा असला विचार येतो...

किती वेळा या असल्या रद्दड जाहिराती पाहुन वैतागलेले आम्ही (आमच्या वेळच्या) जाहिरातींच्या आठवणी काढत बसतो...अगदी "कुछ खास है" मधली स्लोमोशनमध्ये धावणारी ती मुलगी किंवा "जलेबी???" म्हणणारा मुलगा (पाणी आलं यार....(तोंडातुन हो...)) नाहीतर "बुस्ट इज द सिक्रेट ऑफ़ माय एनर्जी" हे कसं बरं लक्षात राहिलं......या पार्श्वभुमीवर आताच ताज्या मेलनी आलेल्या या जाहिराती मलातरी थोडं ताजंतवानं करुन गेला..हे फ़ोटो म्हणजे माझ्यासारख्या जाहिरातींसाठी आसुसलेल्या मनाला दुधाची तहान ताकावर...काय???

सशक्त दातांसाठी??


नेरोलॅक पेंट सुकलं सुद्धा....


धारदार चक्कु...

Karate school of Martial Arts.


If you drink don't drive


जाड केसांसाठी...


ये फ़ेविकॉलका मजबुत जोड है भैया..


थंडा मतलब???


हाय ये सफ़ेदी....

Saturday, April 17, 2010

अत्तराची बाटली

कालच काही राहिलेलं सामान इथे-तिथे करताना एक अत्तराची रिकामी बाटली हाताला लागली..मला अशा रिकाम्या बाटल्या जमवायचा सोस आहे असं नाही पण का कोण जाणे त्यांच्यातल्या सुवासाची आठवण म्हणून टाकवतही नाहीत मग कुठे क्लोजेट्च्या कोपर्‍यात नाहीतर एखाद्या बॅगेच्या तळाशी अशी एक एक बाटली ठेवली जाते...कधीतरी नेमकंच तो कप्पा, जागा समोर आली, हलवाहलवी झाली की तिथे ठेवलेली बाटली आपल्या अस्तित्वाने तिच्या वैभवाच्या काळाची आठवण देऊन जाते..


अत्तराची आवड तशी माझ्या आई-बाबा दोघांना आहे पण तरी अगदी लहानपणी अत्तर म्हणजे फ़क्त कुणाच्या लग्नाला जायचं असलं की कपडे घातल्यावर उडवायचं हे जास्त ठळकपणे आठवतं...त्यावेळी अर्थात मॉल्स मध्ये दिसणारी महागडी अत्तरं उर्फ़ परफ़्युम्स, डिओज हे सगळं अवतरलं नव्हतं..त्यामुळे आई-बाबा,छोकरा, छोकरी सगळेच सरसकट घरात असलेली एकमेव अत्तराची बाटली वापरत..आणि त्याने सगळेच एकाच वासाचं वलय घेऊन त्या लगीनघरी पोहोचले तरी कुणालाही त्यात काही वावगं वाटत नसे....

त्यावेळी अत्तर नेहमी नवनव्या बाटल्यांमध्ये घरात येत असंही नसे...पुष्कळदा जुन्या बाटलीत अत्तर रिफ़िल करुन देणारे असत ते स्वस्तही पडत असावं..शिवाय लगे हातो रियुजचं प्रिंसिपलही नकळत वापरलं जाई (हे अर्थात आता गो ग्रीनच्या जमान्यात असल्याने सुचतंय)...आमच्याकडे एक शेजारच्यांचा नातेवाईक होता तो हे काम कुठूनतरी नेहमी करुन आणून देत असे..त्यामुळे ते काका आले की आई नेहमी आपल्याकडची रिकामी अत्तराची बाटली तुझ्या खेळण्यांमध्ये आहे का ते मला लगेचच पाहायला लावी..पण काही काही वेळा ती बाटली नेमकीच मिळत नसे..त्यामुळे मग जर फ़ारच वाटलं तर त्याला त्याच्याच बाटलीत अत्तर भरुन आणायला आई सांगे..त्यावेळी तो थोडे पैसे जास्त घेई असं वाटतं..

माझ्या आठवणीत त्यावेळचं चार्ली हे एकमेव अत्तराचं नाव. आमच्याकडे चार्लीची एक रिकामी बाटली नेहमीच पाहिलेली मला आठवते..आणि ते वर म्हटलेले काका काय कुठल्याही बाटलीत अत्तर आणत आणि हा घ्या तुमचा चार्ली...कधी कधी वास वेगळाही वाटे पण चालायचं हो आता कंपनी मध्ये मध्ये वेगळा लॉट पाठवते असलं काहीही उत्तरही मिळायचं...पण तरी अत्तराची रिकामी बाटली आवर्जुन ठेवली जायची आणि मुख्य म्हणजे एक बाटली काहीवेळा वर्षभरपण चालायची..अजुन एखादं घेऊया असली चंगळ करावीशीपण वाटली नाही..

चार्लीनं बरीच वर्ष राज्य केलं पण ब्रुट-बिट पण आले नंतर..तरी मुलींचं आणि मुलांचं अत्तर वेगळं असतं किंवा असावं हे कळायला फ़ारच वर्षे जावी लागली..मला अजुनही ब्रुट म्हटलं की माझ्या दादरच्या मैत्रीणीचं संतुरच्या गल्लीतलं घर आणि खूप भिजुन घरी पोहोचलो आम्ही गरम पाण्याने अंघोळ झाल्यावर तिने आवर्जुन लावायला दिलेला ब्रुटचा तिचा हात आठवतो...आमच्या दोघींचा खूप आवडता ब्रॅंड होता तो.तो लावुन तिच्या स्कुटी आणि एम-एटीवर सगळी मुंबई अगदी बी.सी.एल.पर्यंतही जाऊन आलो..निव्वळ त्या अत्तराच्या साक्षीने..

मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा पहिल्या पगारात बाबांना अत्तर घ्यावसं वाटलं कारण आता इतक्या वर्षानंतर बाबांना अत्तर सगळ्यात जास्त आवडतं हेही लक्षात आलं.अजुनही बाबांना काय घ्यायचं तर अत्तर हे समीकरण माझ्या डोक्यात पक्कं बसलंय..

जेव्हा पुरुष आणि स्त्रीयांची अत्तरं वेगळी असतात हे कळायला लागलं तेव्हा सगळ्यात वाईट वाटलं कारण त्यामुळे ब्रुट आता लावता येणार नव्हता..त्याबद्दल एक लाडिक तक्रार मी एका मित्रापाशी केली त्यावेळी त्याने मला अत्तराचं भन्नाट लॉजिक नॅशनल पार्कवरुन बोरिवली स्टेशनला चालत येताना सांगितलं होतं. तो म्हणाला सोप्पं आहे अगं तुला ब्रुट आवडु देत नं..फ़क्त तू तो तुझ्या खास मित्राला दे आणि मग that's how you smell it... असो..आता तेवढं धैर्य असेल तर..जाउदे...लग्नानंतर वापरेन ही युक्ती हे मनातलं त्याला न कळता मी मात्र त्याच्या लॉजिकला (आणि अर्थातच इतकं साधं लॉजिक माहित नसलेल्या माझ्या डोक्याला) दाद दिली...

आता तर काय प्रत्येकजण अत्तराच्या बाबतीत जरा जास्तच जागरूक होतोय...शॉपर्स स्टॉप मध्ये इथल्या मेसिजसारखे परफ़्युम सॅंपल घेऊन पुतळ्यासारखे उभे असणारी मुलं-मुली आणि चार आकडी अत्तरांच्या बाटल्या घेणारे लोक हे दृष्य खूपच कॉमन झालंय. पुर्वीची आवड आता खतपाणी मिळाल्यामुळे तर्‍हेतर्‍हेची अत्तरं माझ्याही कपाटात निवांत पडून आहेत..पण तरी स्पेनच्या ट्रिपच्यावेळी पॅरिस एअरपोर्टवरून नवर्‍याने आणलेल्या बरबरीला अजुनही इवलु इवलुसं करुन जपतेय...त्यावेळी मला माझा अमेरिकेतला विसा ट्रान्स्फ़र मोडला असल्यामुळे जायला मिळालं नव्हतं पण त्याने अगदी आठवणीत ठेऊन माझ्यासाठी आणलेलं ते गिफ़्ट आहे...त्यातले शेवटचे थेंब कदाचित त्यात तसेच राहतील असंही वाटतं किंवा नुस्त्या बाटल्यातरी...

पण आजची अत्तराची बाटली भेटली, ती होती ती कुणा एका थॅंक्सगिव्हिंगच्या सेलला सियर्समध्ये उगाच २०% डिस्कॉंन्ट होता म्हणून..खरं तर त्यांच्याकडे ओपन सॅम्पलही नव्हतं आणि त्या सेल शॉपिंगच्या गडबडीत बाटली आवडली म्हणून घेतलेलं ते अत्तर. नंतर खरंचही आवडलं आणि मनसोक्त वापरलंही..त्याचा वास मला माझ्या शिकागोजवळच्या नेपरविलमधल्या ऑफ़िसमध्ये घेऊन जातो..मला ते ऑफ़िस का कोण जाणे कधीच आवडलं नाही पण तिथे भेटलेल्या दोन भारतीय मुलींनी मात्र या अत्तराचं नाव आवर्जुन विचारलं होतं आणि मग अत्तरांसाठी नावाजलेला ब्रॅंड नसल्याने मला उगाच अवघडल्यासारखं झालं होतं...आज त्याच त्या जुन्या अदिदासच्या बाटलीने मला मात्र लहानपणीच्या सर्व जणांत एक ते आताच्या एकाकडे अनेक अत्तरांच्या बाटलींच्या राज्यात झकासपणे फ़िरवुन आणलं...

Tuesday, April 13, 2010

ट्युलिपोत्सव...

"अगं आपणं या शनिवारी जाऊया का ट्युलिप फ़ेस्टिव्हलला??" इतक्यात ओळख झालेल्या एका मैत्रीणीचा मागच्या आठवड्यातला फ़ोन; पण बाहेर पडणारा पाऊस पाहून कळत नव्हतं काय म्हणायचं.तसंही ट्युलिपच्या बागांबद्दल यश चोप्रांच्या चित्रपटांतील गाण्यांनी निर्माण झालेलं कुतुहल केव्हापासुन आहे...आणि दुधाची तहान ताकावर प्रमाणे घरी ट्युलिपचे जमतील तितके बल्ब्स लावुन आठ आठवड्यांचा त्यांचा वसंतातील वावर काही वर्षे अनुभवलाय..पण तरी ट्युलिपच्या शेतीबद्दल कुतुहल होतंच...आमच्या नशीबाने वरुणदेवाने चक्क विकांताला सुट्टी घेतली आणि आम्ही आमच्या मोहिमेवर निघालो...किती रंग किती रांगा म्या पामराने काय वर्णन करावं..ट्युलिपांचा उत्सवच जणू इतकंच म्हणेन...फ़ोटो टाकते...बास....यंज्व्याय..(हेरंबा चांग भलं रे तुझ्या शब्दांना...)


Sunday, April 11, 2010

चीजकेकची फ़ॅक्टरी...

एक निवांत दुपार/संध्याकाळ मिळालीय आणि कुठेतरी थोडं एलेगन्ट, अपस्केल तरी फ़ॅमिलीश रेस्टॉरन्ट हवं असेल तर चीजकेक फ़ॅक्टरी हा त्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल..बाहेरून पाहिलं तर थोडंसं मिडल इस्टर्न राजवाड्यासारखा लुक आत गेल्यावरही नजरेत भरेल असा ऍंबियन्स आणि मुख्य म्हणजे अप स्केल रेस्टॉरन्टमध्ये असणारी भयानक शांतता नावालाही नाही. सगळीकडे चहलपहल...आतमध्ये गेल्याक्षणीच आवडेल अशी ही अमेरिकन चेन मी जवळपास सगळीकडेच पाहिली. फ़क्त फ़िलीत आम्हाला जरा अर्धा तास तरी लांब होती इथे थोडी जवळ आहे म्हणून खास लक्षात ठेऊन जाऊन घेतलं.


१९४० च्या दशकात डेट्रॉईट मध्ये एव्हलिन नावाची एक महिलेने स्वतःच्या चीजकेक रेसिपीने एका छोट्या चीजकेकच्या दुकानाने सुरुवात करुन मग पोटापाण्यासाठी दुकान गुंडाळून सरळ मोठ्या दुकानांना चीजकेक पुरवणारं हे जोडपं १९७१ च्या सुमारास सगळा बोजा बिस्तारा लॉस एंजल्सला हलवुन मोठं म्हणजे ७०० चौ.फ़ुटाचं चीजकेकचं दुकान काय थाटतात आणि अगदी अथक परिश्रमाने आपले हे केक सगळ्या होलसेल दुकानांमध्ये पोहचवता पोहचवता शेवटी १९७८ ला त्यांचाच मुलगा डेव्हिड कॅलिफ़ोर्नियाच्या बेव्हर्ली हिल्स भागात चीजकेक फ़ॅक्टरीचं पहिलं रेस्टॉरंट उघडतो आणि तेही या व्यवसायाचा विशेष अनुभव नसताना, आपल्यासाठी सगळंच नवल. त्यानंतर तीसेक वर्षांनंतर संपुर्ण अमेरिकेत असलेली त्याची १५० रेस्टॉरंन्ट्स हा यशाचा दाखलाच नव्हे का? आणि चीजकेक ही जरी इथली नावाजलेली डेलिकसी आहे तरी इथलं साधारण सगळच अन्न खाऊगल्लीत फ़िरणार्‍यांनी जरुर चाखावं असं निदान आमचं मत.

साधारणत: अशा रेस्टॉरन्टमध्ये बार आणि रेस्टॉरन्ट असे दोन विभाग असतात..आता नावातच चीजकेक आहे म्हटल्यावर इथे बेकरीचाही एक छोटा विभाग आहे जिथे अनेक पद्धतीचे चीजकेक आणि इतर काही बेकरी विकत घेता येऊ शकते. साधारण २०० पदार्थ असणारा त्यांचा मेन्यु इतका मोठा आहे की तो वाचण्यातच केवढातरी वेळ जाऊ शकेल म्हणजे एकंदरितच होऊ द्या निवांतसाठी संधीच....अर्थात गरज पडल्यास मदतीसाठी तुमच्या टेबलचा वेटर/वेट्रेस सज्ज असतात म्हणा..

यांच्या लंब्या चौड्या मेन्युबद्द्ल छोटंस उदा. द्यायचं तर नुस्ते ऍपेटायजर्सचेच अगदी मेक्सिकन केसिडियाज इ. पासून ते एग रोल्स, क्रॅब केक, लेट्युस रॅप्स अशा असंख्य तर्‍हा उपलब्ध आहेत. आणि काही काही शाकाहारी पर्याय जसं स्वीट कॉर्न केक, वॉकॉमोली, नाचोस हेही खाता येईल...आज मात्र अगदी आयत्यावेळी ठरल्यामुळे आम्ही तडक जेवणावरच हल्ला करायचं ठरवलं त्यामुळे जास्त त्या भानगडीत न पडता कामाची पानंच चाळली...तोवर फ़क्त एक जास्मिन आइस टी मागवला आणि फ़ारसं कधी हिरव्या चहाच्या वाटेला न जाणार्‍या माझ्या नवर्‍याला चक्क तो आवडलाही. तसंच तिने फ़ॅक्टरीवाल्यांतर्फ़े पाव आणि बटर आणून दिले. त्यातला ब्राउन ब्रेडवर लोणी लावलं की केकला मागं सारील अशी चव आहे. दुसरा साधा ब्रेड इतकाच काही मला आवडत नाही.पण हे खात बसलं की तडक जेवलेलंच बरं म्हणून आम्हीतरी यावेळी ऍपेटायजरच्या फ़ंदात पडलो नाही.

मेन्युवर स्मॉल प्लेट्स आणि स्नॅक्सचाही पर्याय होता पण त्यात काही आम्हाला रस नव्हता. मुख्य पदार्थातही तर्‍हेतर्‍हेचे पिझ्झे, काही लंच स्पेशल्स, पास्ता, बर्गर, खास स्पेशालिटी आणि स्टेक्स इ. पर्याय होते. पैकी पिझ्झाच खायचा तर इथं कशाला आणि बीफ़,पोर्क खात नाही म्हणून निदान आम्ही उरलेल्या मेन्युवरच लक्ष केंद्रित करु शकलो तरीही लंच स्पेशल्स मधलं रेनेज (रेने ही एव्हलिनची मुलगी) स्पेशल मला त्यादिवशी थोडं खुणावत होतं. सुप, सलाड आणि चिकन किंवा टर्की सॅंडविच असा साधा-सोपा पण आता इथं बाहेर खायची सवय झाल्यामुळे आवडणारा पर्याय आहे. एक म्हणजे त्यात आपल्याला सगळं थोडं थोडं खायला मिळतं, पुर्ण जेवल्यासारखंही होतं आणि नाहीच त्यातलं काही आवडलं तरी निदान ट्राय करु शकतो असा एकंदरित अनुभव आहे. त्यामुळे मी तरी तेच घ्यायचं ठरवलं. स्पेशालिटीमधुन व्हाइट चिकन चिली मला टेम्प्टिंग वाटलं होतं पण नवरोबाची पसंती क्रिस्पी चिकन कॉसोलेटाला होती.कदाचित त्याबरोबर साईडला मॅश पोटॅटो आणि फ़क्त ऍस्परॅगस (शतावरी) असल्यामुळे असेल अशी एक (कु)शंका मला आली कारण इथल्या पद्धतीने उकडून मीठ-मिरी लावलेल्या भाज्या खाणं त्याला आवडत नाही आणि मग त्या फ़ुकट जातात त्यापेक्षा कशाला ती अनेक भाज्यांची भाऊ(की भाजी)गर्दी??

चला थोडं गप्पा मारतोय तोच जेवण समोर आलं आणि ताटं पाहुन नाही म्हटलं तरी भूक खवळलीच. माझी ऑर्डर देताना मला एकच प्रश्न होता तो म्हणजे आज नेमकं सुप ऑफ़ द डे क्लॅम चाउडर होतं आणि आतापर्यंत जिथे जिथे ते मी खाल्लंय तिथे त्याच्या वासामुळे मला ते कधीच खूप आवडलं नव्हतं. त्यामुळे ते बहुतेक नवर्‍याच्या पानात जाईल असा माझा अंदाज होता. पण नेमकं पहिल्याच चमच्याला अहाहा...अगदी क्रिमी आणि कुठलाही वास न येणारं ते सुप आम्हाला दोघांनाही आवडलं..सॅलडही ओव्हरड्रेस नव्हतं, बहुतेक बल्सामिक व्हिनेग्रेट असावं आणि गरम सॅंडविच ज्यात सढळहस्ते मेयो असतं ते छानंच लागतं हे वेगळं सांगायला नको...आणि त्या स्पेशालिटी चिकनचं वर्णन काय करावं..चिकन ब्रेस्टला चांगलं ठोकुन(फ़ुड टि.व्ही.वर तरी मी त्यांना ठोकतानाच पाहिलंय म्हणून इतकं आत्मविश्वासाने लिहिलंय) पातळ करुन ब्रेडच्या चुर्‍यात घोळवून लेमन सॉसवाली, बटरमध्ये खरपुस (जवळजवळ) तळलेली ती चिकन अगदी क्रिस्पी, छानच होती...मॅश पोटॅटोला लाल बटाटाची स्किन अधेमधे दिसत होती आणि चवही अति क्रिमी नव्हती. शतावरी खायला मला असंही आवडतं त्यामुळे तो नाही तर मी तरी ती खाल्लीच असती.

आजचा एक खादाडी दिवस खर्‍या अर्थाने सार्थकी लागला होता..निमित्त असं काहीच नव्हतं पण मागच्या मायदेश दौर्‍यावरून परत आल्यापासुन म्हणजे दिड वर्षांनी चक्क दोघंच जात होतो आणि नेहमीप्रमाणेच जास्त प्लानिंग न करता...लेकरू त्याच्या पाळणाघरात आणि आम्ही दोघं घरी असा समसमासंयोग जुळून आल्यामुळे हे सारं जमलं होतं..या दोन गच्च प्लेट खाऊन पोटोबा इतके भरले की जोतिबाला जाऊन भंडारा न लावल्यासारखं चीजकेक न खाता आम्ही बिल मागवलं. पण जाता जाता पावलं बेकरीकडे कधी वळली आणि घरच्यासाठी चीजकेक कसा हातात आला कळलंच नाही....

Friday, April 9, 2010

फ़ुलोरा झुकझुक झुकझुक...

या गाण्यामागे प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतील..आपल्या आई-वडिलांनी आपल्याला शिकवताना त्यांच्याही..तशाच माझ्याही कारण पळती झाडे पाहात मामाकडे जायचे दिवाळी आणि मे असे दोन सुट्ट्यांचे माझे लाडके महिने होते...या वर्षी त्याची मजा माझा लेकही चाखील...तसंही घोडा मैदान फ़ार दूर नाहीये...पण आम्ही तयारी कधीची केलीय..फ़क्त काळ बदलला तसं आमचं बछडं झुकझुक गाडीच्या ऐवजी घुंघुं विमानाने (निदान मला तरी चार + पंधरा तास हाच आवाज येणारे असं वाटतं..) जाणार...काश मुझे कविताए आती...नाहीतर "घरघर विमान करी, बेल्ट बांधा म्हणे सुंदरी, ढगात गिरकी घेऊया मामाच्या गावाला जाऊ या"...(हम्म्म कळतंय जुळलंय...) असं या गाण्याचंही काही वेगळं करुन मांडता आलं असतं..
पण तसं नकोच..कारण तसंही सुट्टीकी याद में हे गाणं मी आजकाल त्याला (कदाचित स्वतःसाठी) म्हणते...आणि हा चक्क या गाण्यावर झोपीही जातो..म्हणजे इतकं मी छान आळवू शकते असला काहीही गैरसमज व्हायच्या आधी मी मायाजालावर चेक केलंय..हे गाणं भैरवीतलं आहे..(म्हणजे नॉर्मल आहे तर ..माझं गाणं आणि काय???) आणखी एक ग.दि.माडगुळकरांचं माझं आवडतं आणि गायिका अर्थातच आशा भोसले आणि संगीत आहे वसंत पवार यांचं हे गाणं यावेळच्या फ़ुलोरात..आणि सुट्टीमध्ये गाणी म्हणायची का हे ठरवलं नाही म्हणून पुढच्या महिन्यात एकंदरितच विराम असू शकेल....



झुकझुक झुकझुक अगीन गाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया


मामाचा गाव मोठा
सोन्या चांदीच्या पेठा
शोभा पाहु्नी घेऊया मामाच्या गावाला जाऊया


मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया


मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामन खाऊया मामाच्या गावाला जाऊया


मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी घेऊया मामाच्या गावाला जाऊया

Sunday, April 4, 2010

My prison, my home

"One Woman's Story of Captivitiy in Iran" आणि त्यानंतर लाल अक्षरात ठळकपणे लिहिलेलं शीर्षक MY PRISON, MY HOME....असं लिहिलेल्या मुखपृष्ठाने लक्ष वेधलं आणि लायब्ररीमधुन नव्या फ़िक्शन विभागातून हे पुस्तक उचललं आणि सुरूवातीपासुन शेवटपर्यंत त्याच उत्कंठेने वाचलं.शक्य असतं तर संपुर्ण वाचेपर्य़ंत खालीच ठेवलं नसतं इतकं छान लिहिलंय...


ही कथा आहे ६७ वर्षीय Haleh EsFandiari या मूळच्या इराणी आणि आता अमेरिकेत स्थायिक असणार्‍या एका इराणी महिलेची. इराणमध्ये असताना पत्रकार असणारी ही स्त्री अमेरिकेत प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत शिकवायची शिवाय काही मोठ्या फ़ेलोशिपच्या आधारे तिने Reconstructed Lives: Women and Iran's Islamic Revolution हे पुस्तकही लिहिलंय आणि सध्या वॉशिंग्टन डि.सी.च्या वुड्रो विल्सन सेंटरच्या मध्यपुर्व कार्यक्रमाची मुख्य सचिव.या केंद्रासाठी ती मुख्यतः मध्यपुर्वेकडच्या इराणसकट अन्य देशांच्या प्रतिनिधींची व्याखानं,कॉन्फ़रंसेस यावर काम करायची.थोडक्यात अमेरिका आणि इराण यांच्यात सुसंवाद होण्यासाठीच्या प्रयत्नांमध्येही एक कार्यकर्ता म्हणून तिची भूमिका. पण आपलं हे काम आपल्यासाठी तुरुंगाचा रस्ता दाखवील हे तिच्या कधी स्वप्नातही आलं नसेल.

२००६ च्या ३१ डिसेंबरच्या रात्री इराणमध्ये असलेल्या आपल्या आईला भेटून परत अमेरिकेला निघताना एअरपोर्टच्या एक्सिटला तिच्या टॅक्सीवर हल्ला होऊन तिचे दोन्ही(अमेरिकेचा आणि इराणी) पासपोर्ट आणि सगळं सामान लुटलं जातं. वरवर लुटारुचं वाटणारं हे काम असतं इराणी सरकारच्या इंटेलिजंस मिनिस्ट्रीचं. पासपोर्ट परत मिळवण्याच्या हेलपाट्यात आपल्याच देशात बंदिवान म्हणून आणि तेही तब्बल १०५ दिवस इराणच्या बदनाम एविन तुरुंगातून सुटका करून २००७ च्या सप्टेंबरमध्ये म्हणजे जवळजवळ आठ महिन्यानंतर परत अमेरिकेत जाईपर्यंतच्या लढ्याची ही चित्तथरारक कथा आहे.

२००६ म्हणजे पाहायला गेलं तर आत्ता आत्ता घडलेली गोष्ट...तसं तर त्यावेळी मीही अमेरिकेतच होते आणि त्यामुळे मला हे पुस्तक वाचताना सारखं आत्ताच काळात इराणमध्ये असं चालतं?? हा प्रश्न निर्माण झाला..एक स्त्री आणि त्यातही वय ६७ म्हणजे जवळपास माझ्या आईच्या वयाची ही स्त्री मानसिकदृष्ट्या किती खंबीर राहू शकली आणि इंटेलिजंस मिनिस्ट्रीचे वेगवेगळ्या पद्धतीने चालणारे शोधकामाचे वार झेलुनही त्यांच्या दबावाला बळी पडली नाही याचं कौतुकच आहे...

हे पुस्तक या लुटीने सुरु होतं पण लेखिकेच्या बालपणीचं इराण ते तिने अमेरिकेला यायचा निर्णय घ्यायच्या वेळेपर्यंतचं इराण याचा इतिहास डोळ्यापुढं उभा राहातो. कधी न पाहिलेला हा देश, जास्त इतिहासही मला माहित नव्हता पण त्यावाचुन अडत नाही इतकं वास्तववादी चित्र निव्वळ शब्दांतुन डोळ्यापुढे उभं केलंय. जसा इराणचा इतिहास आहे तशीच अमेरिका-इराण संबंधांची अगदी क्लिंटनपर्यंतच्या प्रत्यत्नांचं वर्णन, लेखिकेची त्यावरची मतंही थोडक्यात सांगितली गेलीत....

सुरुवातीला नुस्तं मिनिस्र्टीच्या ऑफ़िसमध्ये जाऊन प्रश्नोत्तरांना तास तास सामोरं जाता जाता, एक दिवस अवेळी घर तपासणी आणि शेवटी तुरुंगात अनिश्वित काळासाठी रवानगी होते आणि मग एक वेगळं इराण डोळ्यापुढं दिसतं..तुरुंगातल्या प्रत्येक प्रसंगाचं, पहारेकर्‍याचं इतकं विस्तृत वर्णन करायला ६७ व्या वर्षी मन खरंच खूप खंबीर हवं..घरची आठवण होऊ नये म्हणून केलेल्या काही त्यागांचं वर्णन डोळ्यात पाणी आणतात...खंबीर असलं तरी त्या मनात एक आई,आजी, लेक आणि अर्थातच पत्नी दिसत राहाते आणि काहीतरी सलत राहातं...खरंच कसं सहन केलं असेल सगळं? स्वतःच्याच देशात, आपल्याच सरकारकडून न केलेल्या गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी केलेलं कुटिल कारस्थान...

एका व्यक्तीचं जवळजवळ आत्मचरित्रच वाचावं आणि मग तिची सुटका झाली म्हणून आपणही निश्वास टाकावा आणि संपलं एवढ्यावरच नाहीये..शेवटच्या epilogue मध्ये अजुन एक धक्का आहे...हे सगळं लेखिकेच्याच शब्दात वाचलं गेलं पाहिजे म्हणून खूप मोह होतोय पण तरी पुस्तकातला एकही परिच्छेद मी इथे लिहित नाहीये...

अमेरिकेने इतर राष्ट्रांकडून प्रचंड दबाव आणून तिला सोडवलं पण कदाचित असे कितीतरी नागरिक असतील ज्यांना आपल्याच देशात अशा प्रकारची वागणूक मिळून कधीच बाहेरही येत नसतील...त्या सगळ्या हिमनगाचं एक टोक म्हणजे ही कथा..सगळ्यांनी वाचायलाच हवं असं आजच्या काळातल्या घटनेचं डोळ्यात पाणी, अंगावर काटा आणि मनात अनेक प्रश्न निर्माण करणारं पुस्तकं my prison, my home....

Thursday, April 1, 2010

वाढदिवस...

आज माझा वाढदिवस आहे असं जर मी सांगितलं तर ही पोस्ट कुणी या एका ओळीच्या वर वाचणार नाही किंवा एक-दोन दिवसांनी एक एप्रिल संपुर्ण संपल्याची खात्री करून कदाचित वाचेल...म्हणजे आतापर्यंत आलेले अनुभव तरी तसंच काहीसं सुचवताहेत....


काही (आता किती ते विचारू नका...आणि विचारून खरं उत्तर दिलं तरी खोटं वाटेल...हे हे...) हां तर काही वर्षांपुर्वी अशाच एका एक एप्रिलला माझ्या बाबांना माझ्या मामाने असंच सांगितलं होतं,"भावजी अभिनंदन, मुलगी झाली"..."अस्सं का हा हा.." असं चक्क उडवुन लावत ते तीन एप्रिलला गेले होते...आणि तेही अजिबात असं न दाखवता की मुलगी झाल्याचं कळलय किंवा काय..उगाच आपलं कॅज्युअल व्हिसिट सारखं काहीतरी...पण मी अजुनही कधी कधी बाबांना, "बाबा खरं सांगा मुलगा हवा होता पण मुलगी झाली म्हणून उशीरा गेलात ना??" असं विचारुन पिडत असते....आता जिथे बाबांचाच विश्वास नाही तिथे बाकी पब्लिकचं काय बोलायचं...

पण ते काही असलं तरी मला माझा वाढदिवस फ़ार्फ़ार आवडतो...वाढदिवस विसरण्याच्या बाबतीत जितकी फ़ुल मी आहे तितकेच अगदी लक्षात ठेऊन मला वाढदिवसाला फ़ुल करणारेही माझे सगळे मित्र-मैत्रीणी,परिवार आहे...आणि मुख्य म्हणजे जितकं हक्काने मी ते वाढदिवस विसरू शकते तितक्याच हक्काने माझा वाढदिवस एकदा माहित पडल्यावर विसरणारे दिसले की मी रागवू शकते पण खरं तर कधी अशी वेळ आलीच नाही...

आई-बाबा शिक्षक असल्याने तशी परिस्थिती यथा-तथाच होती हे वेगळं सांगायला नको पण भावंडात शेंडेफ़ळ असल्याने माझा वाढदिवस नेहमी खास असायचा...आणि एके वर्षी तर मी आई-बाबांना न सांगताच शाळेतल्या मैत्रीणींना घरी बोलावुन आईलाच एप्रिल फ़ुल केलं होतं ते माझ्याही लक्षात आहे...आई बिचारी संध्याकाळी दमुन-भागून घरी आली आणि घरी हा घोळका...बिचारीला लगेच वेफ़र्स, चॉकोलेट्सचा भूर्दंड पडला...तरी नशीब केकचं फ़ॅड तोवर रूजलं नव्हतं ते...

माझी आता नाही आहे त्या मावशीची आठवण मला प्रत्येक वाढदिवसाला येते कारण माझी पहिली-वहिली खरोखरची स्टिलची भातुकलीमधली ताट-वाटी याचा सेट, एक स्टीलचा छोटा हंडा असं माझ्या चौथ्या वाढदिवसाला तिने दिलेलं जपून ठेवलेलं माझं बक्षिस अगदी माझी भाची पण खेळली इतकं छान टिकलंय....यापेक्षा चांगलं बक्षिस मला कधीच मिळालं नव्हतं असं मला नेहमीच वाटतं...

फ़क्त शाळेत असताना नेहमीच त्यावेळी वार्षिक परिक्षेचे वारे वाहात असायचे पण तरी शनिवार किंवा रविवार असला तर माझी मावसभावंडं वाढदिवस म्हटलं की हमखास येत आणि मग त्यांनी स्वतः परिश्रम करून बनवलेली खोटी बक्षिसं उघडायचं म्हणजे डोक्याला ताप असे...एकात एक बसणारे जमतील तेवढे बॉक्स आणि मग त्यात एप्रिल फ़ुल लिहिलेलं रंगीत चित्र असं त्यांचं पेटंट बक्षिस ठरलेलं असे..मुख्य मला त्याची आधीच कल्पना असली तरी केवळ आपला वाढदिवस आहे म्हणून थोडी मजा म्हणून मी ते उघडे....पण मावशीकडे माझ्यासाठी काही ना काही असे हेही माहित असे..मग नंतर जरा आठवीत वगैरे गेल्यानंतर हे खोका प्रकरण बंद झालं आणि सुरू झाली ती एप्रिल फ़ुलवाली ग्रिटिंग्ज...कधी कधी स्वतः केलेली किंवा कधी कधी विकतची..पण मूळ सुत्र तेच...एप्रिल फ़ुल...मला आतापर्यंत मिळालेली एप्रिल फ़ुलची ग्रिटिंग कार्ड जर एका ठिकाणी ठेवली असती तर खरंच छान कलेक्शन झालं असतं....अर्थात इ-कार्ड तर एकाला एक मागे टाकतील अशी येतात आता नेटच्य युगात..


आमच्याकडे एप्रिलमध्ये मी धरून तीन मावसभावंडांचे वाढदिवस आहेत..पण त्यात सगळ्यात स्पेशल माझा असं मला नेहमीच वाटतं....कुणीही एप्रिलचं भेटलं की "तुझा एक एप्रिल??सही आहे :)"....असं ऐकायचं म्हणजे काही भव्यदिव्य असं वाटायचे ते दिवस अजुनही तसेच आहेत..अगदी कुणी नवं जरी एप्रिलला जन्मलेलं असलं तरी मी पुन्हा माझ्या वाढदिवसाच्या आठवणीत शिरते...